Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 25 नवंबर 2014

ऑल इज वेल..!

विजयकुमार राउत 

"जागते रहो'... गुरखा असा मोठ्याने आरोळी देत रात्रभर जागा राहून गावभर फिरत असतो. आपण त्याच्या आरोळीवर भरोसा ठेवून बिनधास्त झोपी जातो. तो आपल्या विश्‍वासातील किंवा आपल्या नात्यातील नसतोच कधी. तरीही आपण त्याच्या भरवशावर निद्रेच्या स्वाधीन होऊन जातो. त्याच्या मागचं कारण हेच की कुणीतरी आपल्यासाठी जागतो, ही भावना अंतर्मनात ठाम असते. कुणीतरी आपलं रक्षण करण्यासाठी "जागते रहो' अशी आरोळी ठोकत आपल्याला संरक्षण देत आहे, याचा मनाला विश्‍वास असतो; पण समजा एखाद्यावेळेस गुरख्याला खरोखरच चोर दिसले आणि त्याला चोरांनी साधा चाकू जरी दाखविला तरी तो दुसऱ्याचे काय, स्वतःचे रक्षणदेखील करू शकणार नाही. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो पळून जाण्याचा हमखास प्रयत्न करणारच; पण तरीही आपण त्याच्यावर अंधविश्‍वास करून झोपी जातोच. तसंच असतं जीवनाचंही... आपलं कुटुंब गाढ झोपेत असते तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात खोलवर हीच भावना असते. कारण घरातील कर्ता पुरुष सर्वांसाठी झटत असतो. देशाच्या सीमेवर हाती बंदूक घेऊन रात्रंदिवस पहारा देत सैनिक देशाचे रक्षण करतात, ही भावनाच मनाला सतत बळकटी देत असते. देवाचं नावंही तसंच. "देव' हा साधा शब्द जरी उच्चारला तरी केवढा मोठा दिलासा येतो माणसाला ! म्हणून कित्येक युगांपासून माणूस पुरता देवाश्रित झालेला आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळी संकटापासून रक्षण करण्यास देवच धावून येईल, याची आपल्याला शंभर टक्‍के शाश्‍वती असते. संकटातून सुटका झाली तरी देव बरा, नाही झाली तरीही देवच बरा, अशी आपली भूमिका असते... काही "प्रॉब्लेम' असला तर तो फक्‍त आपल्यातच असतो. माझी प्रार्थना त्याने ऐकली नाही किंवा माझ्याच प्रार्थनेत काही उणीव असावी. आपले नशीबच खराब आहे.. देवाजीचा आपल्यावर कोप झाला असावा. मागणे कबूल झाले नाही तर सगळा पापाचा भार सहन करण्यासाठी मी तयार असतो आणि मीच जबाबदारही असतो.
"थ्री इडियट्‌स' या चित्रपटात आमिर खान असेच काही सांगून जातो. "दिल पर हाथ रखके बोलो.. ऑल इज वेल.' देवाचंच नाव कशाला? हृदयावर हात जरी ठेवला तरी आपण बिनधास्त होतोच की! मुळात मनुष्यप्राणी इतर प्राण्यासारखा पदोपदी प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो. डोळसपणे पाहिल्यास भयाचे काळेकुट्‌ट ढग त्याच्या संपूर्ण जीवनाला व्यापून उरलेले असतात. प्रत्येक जण कुणाला ना कुणाला, कशाला ना कशाला घाबरण्यासाठी किंवा घाबरविण्यासाठी तयार असतो. माणसाचे सगळे व्यवहारच "भय' या भावनेभोवती सुरू असतात. व्यवहाराच्या दुनियेत पोलिस त्याला दंडुकेशाहीच्या भरोशावर घाबरवितो. वकील त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून "सळो की पळो' करून सोडतो. पत्रकार त्याच्या चारित्र्याविषयी भीती दाखवून त्याची "पळता भुई थोडी' करून टाकतो. तर डॉक्‍टर त्याला आजारापेक्षा परिणामांनीच अर्धमेलं करून सोडतो. या व्यवहाराच्या मुळाशी भीतीसोबत स्वार्थ दडलेला दिसून येतो. मंदिरात जाणारा माणूस देवदर्शनासाठी जातो. तेव्हा नुसताच देवदर्शन करीत नाही. त्याला दुःखातून मुक्‍ती हवी असते. तो दुःखाने पुरता त्रस्त झालेला असतो. त्यापासून त्याची सुटका व्हावी, हा हेतू असतो. मग त्याच्या असहायतेचा फायदा कुणीतरी पुजारी किंवा ढोंगीबाबा घेत असतो. त्याची लुबाडणूक होत असताना आपण देवाचे कार्य करीत असल्याची माणसाला खात्री असते. म्हणून तो कुणावर शंका घेत नसतो. तो फसविला जात आहे, याचे त्याला भानही नसते. असे एकंदर व्यवहाराचे गणित मोठे गुंतागुंतीचे आणि फसवाफसवीचे असते. याच्या मुळाशी भीती आणि त्यापासून सुटका हेच असते. भावनिकदृष्ट्या त्याला त्यातून सुटण्याची कुणाकडून तरी हमी हवी असते.
ही भीतीच सोडून जगता आले तर? देवाचीही गरज पडणार नाही आणि जागोजागी फसवणूकही होणार नाही.
खरे तर आपणही देवाला फसविण्याचा जागोजागी मार्ग शोधून काढत असतो. एकापेक्षा एक नामी क्‍लृप्त्या शोधून काढतो. देवाला लाच देऊन त्याला आपल्या बाजूने वळवून घेण्यात तर आपला हातखंडाच असतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सोन्याचांदीच्या, माती व दगडधोंड्याच्या देवाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उभे केलेले आहे. या फाजील भीतीतून कर्मकांडाचा जन्म झालेला आहे. पाऊस आला नाही तर वरुणराजाच्या कृपेसाठी वेगवेगळी आमिषे दाखविणारेही आपणच असतो. "ये रे ये रे पावसा .. तुला देतो पैसा.. पैसा झाला खोटा ...पाऊस आला मोठा', असे बडबडगीत गाऊन पावसाला आपण पडण्यास भाग पाडताना त्यालाही पैशाची लाच देतो. फसवे बडबडगीत गाऊन आपण चक्‍क त्याला फसवतो. या बडबडगीतातला "पैसा'ही खोटा आणि त्या खोट्या पैशावर लुब्ध होणारा पाऊस मात्र मोठा! मुलगा पास झाला तर देवाला पेढेही कबूल करणारे आपणच असतो. समाजात कुठल्याही मागणीसाठी लाच देण्याचा हा सोपा मार्ग आपणच शोधून काढलेला असतो. खोट्या-खोट्या समजुती... अंधश्रद्धा, खोटे खोटे व्यवहार, आपले सगळेच वरवरचे आणि खोटे खोटे असते. पावसासाठी आर्जवे करणारा इंग्रजी शाळेत शिकणारा छोटा मुलगा ठरळप ीरळप-- से रुरू ---लोशी रसरळप रपीेंहशी वरू--श्रळीींश्रश क्षेपू ुरपीीं ीें श्रिरू " हे बालगीत गाताना कुठेच लाचलुचपत करीत नाही. कारण हे गीत आहे "साहेबां'च्या देशातले. त्यांच्या संस्कृतीत लाच घेणे म्हणजे मोठा गुन्हाच. आपली संस्कृती मात्र सर्वसमावेशक आहे. सगळं सामावून घेणारी.
ही संस्कृती खोट्या-नाट्या भ्रामक कल्पनांवर आधारित असल्यामुळे आपल्याभोवती खोट्यांचे जाळे विणत जाते. तरीही माझी संस्कृती, माझी परंपरा मोठीच असते. (मेरा भारत महान हैं !) देवाच्या नावाखाली आपण काय काय करीत नाही?
एक शुद्ध फसवी कथा पाठ्यपुस्तकात लहानपणी वाचली होती. एक गरीब शेतकरी असतो. पाऊस येत नसल्यामुळे तो देवाला विनवणी करतो. "देवा यंदा चांगला पाऊस येऊ दे.. पाऊस चांगला आला आणि शेतात पेरलेले पीक चांगले आले तर यंदा वरचे सगळे पीक तुला अर्पण करेन.' देव माणसाच्या भूलथापांना बळी पडतो. देवाला यावर्षी अर्पण करायला भुईमुगाची वरवरची टरफलं घेऊन जातो. कारण त्यावर्षी त्याने शेतात भुईमूग पेरलेला असतो. जमिनीतील शेंगा तो स्वतःसाठी ठेवून घेतो. देवाला शेतकऱ्याची चतुराई कळते. पण तो काय बोलणार? दुसऱ्या वर्षी पुन्हा दुष्काळ पडतो. शेतकरी डोळ्यात प्राण आणून देवाला विनवणी करतो. "देवा यंदा चूक झाली. यावर्षी तुला मी नक्‍कीच पिकाचा खालचा पूर्ण भाग देणार. शेतकरी पीक आल्यानंतर पिकाच्या खालचा सगळा भाग देऊन टाकतो. देव विचारात पडतो. परंतु देवापेक्षा माणूसच जास्त व्यवहारी असतो. तो त्याला व्यवहाराची भाषा बोलून प्रसन्न करतो. शेत पिकाने बहरून येते. पिकाची कापणी केल्यानंतर देवाला दिलेले वचन पाळण्यासाठी पिकाच्या खालचा भाग तो देवाकडे घेऊन जातो. देवाला आश्‍चर्य वाटते. पोत्यात भरलेले कडबाकुटार देवाला अर्पण करतो. देव हे पाहून स्वतःचा हात स्वतःच्या कपाळावर मारून घेतो. कारण शेतकऱ्याने या वर्षी ज्वारीचे पीक पेरलेले असते. मोत्यासारख्या ज्वारीची भरदार कणसं स्वतःसाठी तर कडबा कुटार देवाला देतो. देवाला पश्‍चात्ताप होतो.. परत तिसऱ्या वर्षी पावसासाठी काकुळतीला येऊन देवाला तो पुन्हा प्रार्थना करतो. देव ऐकायला तयार होत नाही; परंतु देवाला पटविण्यात माणूस मागे कसा राहील? येनकेन प्रकारेण तो देवाला खूश करतोच.
"देवा यंदा पाऊस आला आणि चांगले पीक आले, तर तुला पिकाचा खालचा आणि वरचा दोन्ही भाग देऊन टाकतो. देवा, आम्ही मानवजात तुझी शपथ घेऊन सांगतो की तुझ्याशी कधीही दगा करणार नाही.' देव खूश होतो. पुन्हा पाऊस पडतो. पीक शेतात बहरते. पिकाची कापणी करून तो देवाकडे घेऊन जातो. देव यावर्षी तरी शेतकरी आपला शब्द पाळेल म्हणून आनंदित असतो; परंतु शेतकरी बैलगाडीतून मक्‍याचा कडबा बाहेर काढतो आणि देवापुढे रिचवतो. देव विचारतो, "हे काय आहे?'
"मी दिलेला शब्द पाळला देवा, तुला जे कबूल केलं होतं ते तुला भक्‍तिभावाने अर्पण करीत आहे. यंदा मी मक्‍याचे पीक शेतात पेरले होते. तुला कबूल केल्याप्रमाणे यंदा खालचा व वरचा दोन्ही भाग तुला देत आहे. मी दिलेल्या वचनाप्रमाणे मधला भाग मी माझ्यासाठी ठेवून घेतला. आता खालच्या आणि वरच्या भागावर हक्‍क तो तुझाच आहे देवा!' असं म्हटल्यानंतर देव स्वतःची फसगत झाली म्हणून काळाठिक्‍कर पडलेला चेहरा कमरेवरचे हात सोडून झाकून घेतो! तर अशा प्रकारे चक्‍क देवाची फसवणूक करणारे महाभाग जागोजागी आहेत. जो परमेश्‍वर सगळ्या विश्‍वाचं संचालन करीत असतो, तो देवच इतका मूर्ख असेल तर त्याला देव तरी कसे म्हणावे? असा साधा प्रश्‍न उभा राहतो.
याच शेतकऱ्याचा नातू-पणतू पुढे राजकारणात गेल्यामुळे देवाला निवडणुकीत विजयी होण्यासाठी नवस बोलतो की हे देवा, मला यंदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येऊ दे. मग तुला मी सोन्याची टोपीच चढवितो. असे आश्‍वासन देऊन देवाला कामी लावतो. देव नेहमीप्रमाणे खुश होऊन माणसाला निवडणुकीत यश देतो. निवडणूक जिंकल्यानंतर माणूस मंदिरात जातो. इंच दोन इंच छाती फुगवून ताठ मानेने देवापुढे उभा राहतो. "देवा यापूर्वीची मानवजात तुझी लुबाडणूक करणारी असेल पण या युगातील माणूस मात्र दिलेल्या शब्दाला जागणारा आहे. मी तुला दिलेले वचन कुठल्याही स्थितीत पाळणार आहे. तुला निवडणुकीत जिंकल्यानंतर सोन्याची टोपी घालण्याचा मी नवस केला होता. आहे ना लक्षात का विसरलास? देव मुकाट्याने मान हलवितो. देव मनोमन खूशही होतो. मागच्या पिढीतला शेतकरी लबाड निघाला होता; पण या युगातील माणूस प्रचंड इमानदार आणि हुशार आहे. उगीचच नाही तो चंद्रावर पोहोचला! मंगळावर यान पाठवून जीवसृष्टीचा रात्रंदिवस वेध घेत आहे. सगळे शोध लावले आहेत. मी तर या सृष्टीची निर्मिती केली. परंतु मानव जातीने माझ्या बनविलेल्या सृष्टीसारखीच हुबेहूब दुसरी सुंदर प्रतिसृष्टीच निर्माण करून या दुनियेला "चार चॉंद' लावले आहेत. त्याचा यशाचे पवाडे उगाच त्रिभुवनात दुमदुमत नाहीत!' देवाने माणसाकडे कौतुकाने पाहिले. त्याला आपल्या छातीशी लावून त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले.
प्रसन्न वदनाने भक्‍ताला विचारले,
"सांग सांग मानवा, कुठाय तू कबूल केलेली सोन्याची टोपी? प्रश्‍न सोन्याच्या टोपीचा नाही रे. तू दिलेल्या शब्दाला जागतोस की नाही याचा आहे. मला फार अभिमान आहे. तो दुष्ट शेतकरी आता या जमान्यात दिसता कामा नये. पण तू खरोखरच दिलेल्या शब्दाला पाळणारा आहेस. शाब्बास पठ्‌ठे. जिओ हजारो साल...'
"देवा, थांबा थांबा असे उतावीळ होऊ नका.' आणि तो माणूस गालातल्या गालात हसत जोरात कुणालातरी हाक मारतो.
"सोन्याऽ सोन्याऽऽ'.... त्याच्या हाकेसरशी डोक्‍यात टोपी घातलेला लहानगा "सोन्या' लगेच धावत धावत येतो. माणूस देवाशी त्याचा परिचय करून देतो. लहानग्या बालकाच्या डोक्‍यातून टोपी काढतो. तिला व्यवस्थित केल्यानंतर विटेवर अठ्‌ठावीस युगांपासून उभा असलेल्या विठ्‌ठलाच्या डोक्‍यात टोपी घालून देतो. विठ्‌ठल गोंधळतो. "काय आहे?' हे विचारतो. माणूस गालातल्या गालात पुन्हा हसतो. "अरे, विठ्‌ठला हीच ती सोन्याची टोपी.' देवाला कुणीतरी टोपी घातल्याचं दुःख होतं आणि माणूस आपल्या चातुर्यावर मोठमोठ्याने हसतो.
अठ्‌ठावीस युगांपासून निमूटपणे उभा असलेला विठ्‌ठल गप्पकन डोळे मिटून घेतो! तर मित्रांनो, अशी लांबलचक आहे माणसाच्या फसवेगिरीची कहाणी. एक नव्हे तर अशा माणसाच्या वर्तनाच्या कथांनी अख्खे ग्रंथच्या ग्रंथ आणि पोथ्याच्या पोथ्या भरलेल्या आहेत. देवापुढे नारळ फोडताना आतलं खोबरं माणूस चवीने खातो. बाहेरची टरफलं देवाच्या चरणी वाहतो. माणसाने स्वतःच्या स्वार्थाभोवतीच सगळ्या चातुर्याच्या कथा निर्माण केलेल्या आहेत. तो देव असला तर अतिशय भोळा असावा. क्षमाशील असावा, अशी कल्पना करूनच माणूस "देव' या संकल्पनेशी खेळत असतो. आपण कसेही असू "तो 'मात्र प्रामाणिकच राहिला पाहिजे. तो दयावानच राहिला पाहिजे. "भगवान देता हैं तो छप्पर फाडके देता हैं' " मांगे मिले ना भिख , बिन मांगे मिले मोती', "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन', भगवान के घर देर है, अंधेर नहीं' अशा आशादायक आणि फसव्या म्हणी तयार करून त्याचा स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न सुरू असतो. कोणाचा देव मांसाहारी, कुणाच्या देवाला दारूचा नैवेद्य, कुणी रक्‍त पिणारा तर कुणाचा देव नुसताच भाव खाणारा...! अशा विविध रूपांत आपणासारखं देवावरही आरोपन करीत जातो. एकंदरीत, माणूस देवाला आपल्या प्रवृत्तीनुसार उभा करतो. व्यक्‍ती तितक्‍या प्रवृत्ती त्यानुसार व्यक्‍ती तितके देव.. आपण उभी केलेली "देव' ही संकल्पना इतकी बावळट किंवा आपल्यातील माणसासारखीच भूलथापांना बळी पडणारी, असे मानण्यापेक्षा स्वतःच्या हृदयावर हात ठेवून "ऑल इज वेल' म्हटले तरी नाही का चालणार?

 
**************************
 
Blogger Templates