* विजयकुमार राऊत
या भूतलावर मानव प्राणी जन्माला आला
आणि त्याने त्याच्या अस्तित्वाचा अमिट ठसा काळाच्या छाताडावर उमटविला. इतर
प्राण्यांच्या तुलनेत त्याची प्रगती आणि भरभराट फार अल्पावधीतील आहे. त्याच्या
कल्पनाशक्तीच्या बळावर अख्या ब्रम्हांडाला गवसणी घालण्याचा प्रयत्न त्याने केला.
खरंच अप्रतिम आहे, त्याची बुद्धीमत्ता. म्हणूनच अतिशय प्राचीन काव्य असलेल्या
वेदोपनिषेदांनीही त्याला सलाम केला. नदी-नाले, झरे, इंद्रधनुष्य , आकाश, मेघ,
फुलपाखरे पाहून तो अतिशय आनंदीत झाला तर विजांचा गडगडाट, सोसाटयाचा वारा, जोराचा
पाउस पाहून तो घाबरलाही. सृजनाचा सोहळा उघडया डोळयांनी पाहात असताना तो सृष्टीच्या
विविध रूपात अगदी हरखून गेला आणि मृत्यूचे तांडव अनुभवताना अतिशय दुःखीही झाला.
तरीही यातून स्वतःच्या बुद्धी आणि गुणवत्तेच्या जोरावर त्याने नेत्रदीपक यश
मिळविले, याचे आश्चर्य वाटायला नको. निसर्गतः अनुभव आणि स्मृतींचा साठा
त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्याला हे सगळं शक्य झालं. त्याने एवढी प्रचंड झेप
घेतली ती स्वकर्तृत्वाच्या बळावर. स्मृतितून ज्ञान जपून ठेवणे आणि आलेल्या
प्रसंगातून कसे सावधपणे जीवन जगायचे, याचा धडा घेणे, ही ज्ञान मिळविण्याची त्याची
अगदी साधी, सोपी पद्धत. जीवन जगत असताना तो सर्वात अगोदर निसर्गातील निरीक्षणे
डोळयांनी नोंदवित गेला. पुढे अनुमानातून त्याची वारंवार पडताळणी करीत गेला. त्यातून
मिळालेले ज्ञान जवळच्या लोकांना देत गेला. ज्ञानाची आदानप्रदान करताना त्याने
निवडलेली भाषा ही शिल्प, चित्र, नृत्य, काव्याची होती. हजारो वर्षे गेल्यानंतर
वेदोपनिषदांतून त्याने काव्यात्मक शब्दांत विज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. या
जगात अनुभवसंपन्न होण्यासाठी त्याच्या कित्येक पिढया अशा खर्ची गेल्या असाव्यात.
अर्थात त्यासाठी शेकडो वर्षाच्या कालावधीत त्याला बरेच चटके सोसावे लागले. मागच्या
माहितीत सुधारणा करून त्याला अद्यावत करण्याचे काम त्याच्या पुढच्या पिढीेने केले.
हे करीत असताना त्याचा सहोदर असलेल्या निसर्गातील सुत्रे त्याने शब्दांत मांडताना
त्याच्या माहितीचा साठा शिल्लक राहावा म्हणूनी कधी शिल्पकला, हस्तकला, काव्य,
प्रतिके यांचा आधार घेउन पुढच्या पिढीसाठी ज्ञान राखून ठेवले. त्यापैकी काव्य आणि
परंपरेने चालत आलेली प्रतिके यांचे उदाहरण घेता येईल. आता शिवलिंगाची पुजा
करताना कुठलाही भाविक त्यामागचे विज्ञान समजून घ्यायलाच तयार नसतो. शिवलिंग हे
सृष्टीतील एक सृजनाचे प्रतिक असल्याचे त्याला सांगीतले तर तो काहीसा नाक मुरडतो.
लिंग आणि योनीच्या माध्यमातून या सृष्टीतील सृजनाची पुजा करण्याचा आमच्या
पूर्वजांचा किती मोठा भाव होता. त्याबद्दल त्याने अतिशय आदरभाव बाळगला होता.
त्याने दहीदूधाने त्याचा अभिषेक केला होता. त्यासाठी दहीदुध वापरणे हेही
प्रतिकात्मक होते. संभोग हे सृजनशिलतेतील महत्वाचा टप्पा आहे, हे यातून सुचित
करण्याचा प्रयत्न आमच्या पूर्वजांनी केला. सगळी सृष्टीच त्याभोवती फिरत आहे. सगळे
सामाजिक, अध्यात्मिक, भौतिक व्यवहार, हे संभोगाच्या अवतीभवती सुरू आहेत. निसर्गानं
केलेली ही योजना आमच्या पूर्वजांना कळली होती , तर असो. दुसरे प्रतिक आहे
लक्ष्मी आणि सरस्वतीचे. या नावाच्या देवता कधीही जन्माला आलेल्या नाहीत, हे समजून
घेणे आवश्यक आहे. प्रतिभेचा स्पर्श झालेला माणूस हा नेहमी साध्या वेशात राहातो.
त्याला चमकदारपणा किंवा दिखाउपणा मुळीच पसंत नसतो. उलट श्रीमंत व्यक्तीला आकर्षक
वस्त्रे परिधान करून राहणे आवडत असते. किंबहुना आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून
घेण्याचा उपद्व्याप तो करीत असतो. म्हणून त्याच्याकडे सगळे आकर्षित होतात. हा गुण
प्रत्येक युगात , प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळतो. लक्ष्मी , सरस्वती ही निव्वळ
प्रतिके आहेत. अगदी ताजे उदाहरणच द्यायचे झाले तर भारतमातेचे देउ शकतो. भारतमाता
नावाची देवी सिंहावर आरूढ होउन हातात झेंडा किंवा कमरेला तलवार लटकवून असल्यामुळे
ती देवी कधीतरी जन्माला आली असल्याचा भाव अडाणी माणसांबरोबर शहाण्या लोकांच्याही
मनात उत्पन्न होउ शकतो. मित्रहो, जगाच्या पाठीवर असा प्रकार कुठेही बघायला मिळत
नाही. अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा चिन, जापानने असले काहीही केले नाही. आपण
मात्र मनात देशभक्ती कायम राहावी, म्हणून पुन्हा 36 कोटी देवांदिकांमध्ये पुन्हा
भर घालून एकेका देवतेची निर्मीती करीत राहतो. देवा-धर्माशिवाय आपल्याला चांगली
भावना जोपासताच येत नाही, हेही तितकेच खरे. देव निर्माण केल्यामुळे आपण किती
देवभोळे आहोत, याचा प्रत्यय जगाला पदोपदी आणून देतो. अर्धनारीनटेश्वराची
मूर्ती बघीतली तर आपले अध्यात्म हे दुसरे तिसरे काही नसून विज्ञानच असल्याचे
प्रत्यंतर येते. "एक्स ..एक्स' हे गुणसुत्र केवळ महिलांत असते. एक्स वाय
गुणसुत्रांची जोडी ही पुरूषात असते, हे आपल्याला शाळेत शिकविले जाते. हे ज्ञान
सुरक्षित ठेवण्यासाठी प्राचीन माणसाजवळ कुठलेच साधन नव्हते. अर्धनारीनटेश्वराच्या
प्रतिकांतून त्याने विज्ञानच सांगीतले आहे. भाषेचा उत्कर्ष झाल्यानंतर गेल्या
दहा वीस हजार वर्षात तो काव्य करायला शिकला. ज्ञान स्मृतीत राहावे म्हणून त्याने
काव्याचा आधार घेतला. श्लोकाच्या माध्यमातून काव्याच्या रूपात मंत्र, सुत्रे, गुढ
ज्ञान मांडण्याचा प्रयोग त्याने सुरू केला .. तो आजतागायत सुरू आहे. म्हणून
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली किंवा ज्ञानदेवाने रेडयाच्या तोंडून वेद वदवून घेतले,
असे आपण म्हणतो, तेव्हा त्यातील काव्य किंवा अर्थ समजून न घेता त्यांच्या केवळ
शब्दार्थावर जाउन संत ज्ञानेश्वरासारख्या प्रतिभासंपन्न महाकविंवर चमत्कारी
असल्याचा आरोप करतो. तसेच अगदी अलीकडच्या काळातही आपण संत तुकाराम, छत्रपती शिवाजी
महाराजांजबद्दल अफवा उठवून त्यांचे दैविकरण करणे सुरू आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांना लढाईत जिंकण्यासाठी आई भवानीनेच तलवार दिली, तिचेच नाव भवानी तलवार असे
साळसुदपणे सांगतो किंवा ऐकतो. तुळसीचं रोपटं आपण दारात लावतो, ते कशासाठी तर
त्यामागे ते प्राणवायुचा पुरवठा सतत चोविस तास करीत असते, हे त्यामागचं विज्ञान आहे
म्हणूनच ना ! ही प्रतिके हजारो वर्ष चालत आल्यानंतर त्यामागचा विचार पुसला
गेला. विज्ञान हरपलं. प्रतिकांची भाषा विसरून आपण एक अंधश्रद्धा म्हणून तिचा
स्वीकार केला. आताही प्रतिकांची पुजा करताना त्याचा विचार होताना दिसत नाही.
प्रतिकांमधील विज्ञान आणि मोठा ज्ञानाचा साठा कालांतराने मृतप्राय झाल्याचं जुन्या
प्रतिकांमधून दिसतं. अलीकडच्या काळात माणसांपेक्षा प्रतिकेच मोठी झालेली आहेत.
आधुनिक विज्ञानाने हा धोका ओळखून सुत्रांची भाषा अवगत केली. "एचटुओ' हे सुत्र
मांडले की त्यात स्पष्टीकरण देण्याची गरज उरत नाही. "एचटू ओ' म्हटले की पाणीच.
त्याखेरिज दुसरा अर्थ काढताच येणार नाही. महान रूषीमुंनींनी काव्यात मांडलेलं ज्ञान
सर्वसामान्य माणसाच्या डोक्यावर अंधश्रद्धा म्हणून नाचू लागताच विज्ञानानं
स्वीकारलेली पद्धत माणसाला डोळस करणारी आहे. त्यामुळे भविष्यात भौतिकशास्त्रासारखी
विज्ञानशास्त्रे सुत्रांच्या भाषेत ज्ञान मांडण्यास प्राधान्य देतील, हे निर्विवाद
सत्य आहे. |
|
* विजयकुमार राऊत
|