Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शुक्रवार, 3 जुलाई 2015

शार्टकट

                                                                             
                                                                                * विजयकुमार राऊत

आजचा जमाना "फास्ट फुड'चा आहे. पिज्झा, बर्गर खाणे मुलांना खूप आवडायला लागले आहे. लोकांना आता क्षणभर थांबण्याची मुळीच उसंत नाही. कुठलीही गोष्ट त्वरीत व्हायला पाहिजे. धावपळ, जिवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. उर फाटेस्तोवर धावणे हेच आजच्या यशस्वी होण्यामागचं सुत्रं ठरत आहे. ही एवढी दौड कुठून आली? ही अघोरी स्पर्धा कशाची? ती कशी निर्माण झाली? सामाजिक बदलातून, मनाच्या अधीरतेतून झालेले हे परिवर्तन आहे की झटपट यशस्वी होण्यासाठी "शार्टकर्ट' शोधण्यातला हा पुरूषार्थ आहे? आजूबाजूची परिस्थिती बदलली की समाजात, वातावरणात किंवा अवतीभवतीच्या एकंदर जीवनमानात त्याचे बदल हळूहळू जाणवायला लागतात. आज सगळयाच क्षेत्रात एकंदर हीच स्थिती आहे. मनाची अधिरता वाढली की एखादी वस्तू मिळविण्यासाठी उताविळपणा निर्माण होतो. "तू मेरी नही तो, औरो की भी नही हो सकती' हा डॉयलॉग फक्‍त चित्रपटातूनच ऐकायला मिळत नाही. त्याचा शिरकाव आता समाजातही झाला असल्याचं वेगवेगळया घटनांमधून वाचायला मिळते. मला मिळाले नाही तरी चालेल, परंतु ते त्यालाही मिळता कामा नये, ही क्षुद्र भावना वाढीस लागली. क्रिकेट शौकीन पूर्वी कसोटी मॅच पाहाण्यात चार पाच दिवस टिव्हीसमोर घालवित होते. आता हीच मॅच वनडे वरून ेट्‌व्नटी ेट्‌व्नटीवर आली आहे. तीन...साडे तीन तासांचा चित्रपट आता दीड दोन तासांवरूनही "शार्ट' होत चालला आहे. जे सांगायचं ते थोडक्‍यात सांगा... फापट पसारा नकोच. कुणाला वेळच नाही. वृत्तपत्रांचे वाचन करण्याची वेळ कमी होत चाललेली आहे. ही वृत्ती कशाचे द्योतक आहे? आजच्या स्पर्धेच्या मागेही हीच मानसिकता पहायला मिळते. या धावपळीच्या युगातील ही अपरिहार्यता आहे?

गेल्या वर्ष दोन वर्षातील ठळक राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर यावरून समाजातील एकंदरीत दिशा स्पष्ट होते. आपला देश हा अवतारांचा देश आहे. अवतारात एक तारणहार शोधण्याची हजारो वर्षांची सवय आपल्या जिन्समध्ये सामावलेली आहे. राजकीय क्षेत्रात अशा काही हालचाली झाल्यानंतर थोडफार सत्य गवसतं. कुणीतरी अवतार या पृथ्वीतलावर येईल आणि आमचं कल्याण करेल, केवळ याच कल्पनेत सगळे रंगून गेलेले दिसतात. अगदी ठळकच सांगायचे झाले तर दोन वर्षापूर्वी दिल्लीत रंगलेला अण्णा हजारे नामक तमाशा थेट चॅनलमार्फत घराघरात पोहचला. तेव्हा पुन्हा एकदा चार पाच दिवस चालणा-या कसोटी क्रिकेट मॅचची आठवण झाली. अण्णांच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये सगळयांना कोण उत्सुकता होती ! दिवसभर टिव्हीसमोर बसून आबालवृद्‌धांची उत्कंठा शिगेला गेल्याचे दृष्य पाहून अण्णा आता या देशाचे तारणहार होणार की काय, अशी शंका अनेकांच्या डोक्‍यात यायला लागली. त्यानंतर अण्णांना दुसरे गांधी असा शिक्‍का मारून त्यांना गांधीजींचाही एक नवा अवतार बहाल केला. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनाची घडी विस्कटली आणि केजरीवाल नावाचे तुणतुणे वाजायला लागले. केजरीवाल यांनाही लोकांनी डोक्‍यावर घेतले आणि अनिल कपूर यांनी भूमीका केलेल्या एका चित्रपटातील एक दिवसाचा मुख्यमंत्री जिवंत झाल्याचा भास जनतेला होउ लागला. "सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही , मेरी कोशिश है की यह हालात बदलने चाहिए' हा दुष्यंतकुमारांचा शेर त्यांनी केजरीवाल यांना पाहूनच लिहिला की काय, असे जनतेला वाटू लागले.
कविता आणि राजकाराणातलं फारसं काही कळत नसलेल्यांनाही केजरीवालांच्या भाषणावरून ते युगप्रवर्तक असल्याचे चित्र तयार झाले. तोपर्यंत दुसरा हिरो राजकीय पडद्यामागे एंट्रीची भक्‍कम रिव्हर्सल करीत होता. तो चेहरा होता मोदींचा. केजरीवालांची जादू "सरपे चढके' बोलत होती. मोदी फक्‍त केजरीवाल नावाच्या वादळाला शांत होण्याची वाट पाहात होते. देशभरात लगेच लोकसभा निवडणुका लागल्या. केजरीवाल यांनी लोकसभेच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मोदी घराघरात पोहचल्याने आणि केजरीवालचे जादू संपत आल्याची चाहूल लागताच मतदारांनी केजरीवाल यांची साथ सोडली व मोदी यांनी रंगमंचावर "एंट्री' केली. मोदी बहुमताने विजयी झाले. निवडून देणारेच आता मोदींविरूद्‌ध आरोळी ठोकायला लागल्याचे पुसट चित्र दिसू लागले आहे. जनतेचा यात दोष म्हणता येणार नाही. मोदींनी स्वतःची जी प्रतिमा निर्माण केली, ती निभावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
एकंदर या देशाला चटकन जादूची कांडी फिरविणारा कुणीतरी जादूगर हवा आहे की काय, अशी शंका निर्माण होते. अलीकडे चमकणा-या हिरोंचा कार्यकाळ केवळ क्षणभंगूर ठरला आहे. यावरून जनतेच्या मनावर आता दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारा नेता निर्माण करण्याची वेळ निघून गेली की काय, अशी शंका निर्माण झाली.

                                                            * विजयकुमार राऊत 

                                                             mob-8888876462
 
Blogger Templates