Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 27 मई 2015

वेदना

                           * विजयकुमार राउत  
फक्‍त माझ्या भावनांशी भेद झाला
मात्र त्यांच्या वेदनेचा वेद झाला !

मी उगा आलो तयांच्या पंगतीला
हाच मजला जिंदगीभर खेद झाला

केवढी ही शांतता होती सभोती !
हा कशाचा एवढा उद्रेक झाला !

मी इथे, तो धावतो वा-याप्रमाणे
काय रे,
वेडया मनाचा वेग झाला!

हा उन्हाळा तापला ऐसा अघोरी !
आणि माझ्या आसवांचा मेघ झाला!





                            * विजयकुमार राउत

सोमवार, 25 मई 2015

शस्त्रक्रिया !

शस्त्रक्रिया !

                                             * विजयकुमार राऊत

काळजाला फाडण्याची मस्त क्रिया चालली
आमुच्या संवेदनांची शस्त्रक्रिया चालली !!

चाचण्या खोटया निघाल्या,उपचार खोटेही तसे
जिंदगी हिसकावण्याची भ्रष्ट क्रिया चालली !!

कोठुनी संसर्ग आला?कोणता आजार हा?
माणसांना तोडण्याची दुष्ट क्रिया चालली !!

स्वर्ग या वस्तीत आणू? या छताला चांदणे!
कोरडया आश्‍वासनांची शब्द क्रिया चालली !!


शेवटी कोणी न आले, सांत्वनाला एकदा
ही कुणाला हासण्याची स्वस्त क्रिया चालली ?

जिंदगानी शाप ज्याला वाटली होती कधी
केवढी थाटात त्याची अंत्यक्रिया चालली !
Vraut90@yahoo.com



गुरुवार, 21 मई 2015

वेगळा



कोण कापून गेला मुळावेगळा !
मला वेगळा नी तुला वेगळा !!

केलीस कारे अशी वाटणी?
शिरापासुनी मी धडावेगळा ! 


तुझ्या रक्षणाला इथे कोण रे?
हाय, काटाच केला फुलावेगळा !!

कशाला
तुझ्या आज पंक्‍तित मी ?
हा मी असू दे बरा वेगळा !

तुझे शल्य जाणू तरी मी कसा?
इथे दूर आहे घरावेगळा !!

कशाला हवा मी कुणासारखा ?
जरा मीच आहे जगावेगळा !

                                          *विजयकुमार राउत                                 

वादळवारा

तुझ्यासोबती चालून येतो वादळवारा
तुला पाहता सूर्याचा बघ चढतो पारा !

तुझे वागणे गूढ असे की भूकंप येतो
तुझे हासणे इंद्रधनूचा नभी पिसारा !

मला भेटण्या रोज रोज तू लपून येते-
तुझ्या  भोवती अफवांचा हा सो-सो वारा !

अशा अवेळी मोसमात का पाउस येतो?
हवामान हे देते मज गंभीर इशारा !

 वीज होउनी या झाडांवर झेप घालते
 उभा आडवा जळून जातो उगाच सारा !!
                                                       *विजयकुमार राउत



बुधवार, 20 मई 2015

एका तळयात होती....


                                                                                       * विजयकुमार राउत
गीत रामायणकार गदिमाच्या गीतांचे स्वर कधीकाळी कानी पडले तर एका वेगळया भावविश्‍वात अंतर्बाहय रमून जाणेच मी पसंत करतो. काय सुरेख गीत आहे! समाजातील एक जळजळीत वास्तव्य गदीमांनी त्या गीतातून रेखाटलेलं आहे.

एका तळयात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक...

शेवटच्या कडव्यात मात्र गदींमा त्या पिलाला खोटया भ्रमातून बाहेर काढतात. .

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वा-यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

खरंच... समाजात यापेक्षा दुसरं काय होतं? सगळयांना मोजण्याची एक फुटपट्‌टी तयार केली या समाजाने. सर्वांना एकाच मापात मोजले जाते. त्याने किमान समाजाने ठरविलेल्या निकषातच जगावे, हीच समाजाची धारणा असते.
एक स्वतंत्र व्यक्‍ती या समाजात स्वतःचे विचार व्यक्‍त करीत असेल..तर त्याला त्याच्या अभिव्यक्‍तीपासून रोखण्याचा प्रयत्न समाजातील काही धुरिन पुढे येउन करीत असतात. सर्वप्रथम एक व्यक्‍ती म्हणून प्रत्येकाचं जन्मतःच वेगळं व्यक्‍तिमत्व असतं. निसर्गानं त्या व्यक्‍तीची जन्माला येताच एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणाच्याच हातांचे ठसे कुणाशीच मिळत नाहीत. म्हणून तर आता आधार कार्डवर प्रत्येक व्यक्‍तींची ओळख हे त्याच्या हाताचे ठसे ठरविण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्ष समाजात स्वतंत्र विचार किंवा ओळख निर्माण होण्याआधीच जमिनीतील कितीतरी अंकुर जमिनीतच दफन केले जातात. स्वतंत्र एका व्यक्‍तींसाठी समाज नेहमी शत्रूच असतो. कारण त्याचं स्वतंत्र व्यक्‍तीमत्व समाजासाठी धोकादायक आणि तितकंच आव्हानात्मक असतं. म्हणूनच व्यक्‍ती या समाजात जन्माला येताच त्याच्यावर संस्कार आणि रूढी , परंपरेचे ज्ञान दिले जाते. त्याला समाजाच्या चौकटीत जगायला शिकविल्या जाते. एखादे बंडखोर मुलं असेल तर त्याच्यावर भिती, धाक दपटशाने अंकुश घालण्यात येतो. समाजात वावरताना समाज काय म्हणेल, या गोष्टीची चिंताच अधिक केल्या जाते. बालपणातच त्याची प्रतिभा समाजास घातक ठरू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. आजपर्यंत झालेल्या महान व्यक्‍तींचा समाजाने खूप छळ केला असल्याच्या कथा इतिहासाच्या पानोपानी वाचायला मिळतात. स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात की, मी इतरांपेक्षा वेगळा म्हणून ते मला हसतात. आणि ते सर्व एकसारखे वागतात , म्हणून मी त्यांना हसतो.
समाजाला त्याचंच एक प्रॉडक्‍ट हवं असतं. त्या "प्रॉडक्‍ट' ची किंमत ठरविण्यासाठी त्याची सामाजिक मूल्ये आवश्‍यक असतात. समाजाचे व्यवहार मोठे अजब असतात. समाजात राहायचे असेल तर ते पाळण्याची एक अट व नियम समाजाने घालून दिलेले असतात. तिला व्यवस्था म्हणतात. समाजाची स्वतःची एक व्यवस्था असते. अवतीभवती दृष्य अदृष्य स्वरूपात असलेला समाज सर्वप्रथम व्यक्‍तीची प्रज्ञा गोठविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, समाजाचे आणि व्यक्‍तीचे विळा भोपळयाचे वैर असते. समाजापेक्षा व्यक्‍ती मोठा झाला तर त्याचा विरोध होतो. चाकोरीतील सामाजिक रूढी , परंपरा तोडण्याचा एखादयाकडून प्रयत्न झाला तर त्या व्यक्‍तीला समाजाच्या बाहेर काढून त्याच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अत्याचार केले जातात. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले यांच्यावरील हल्ले त्यातूनच झालेले आहेत. तर आजचे ख्यातनाम समाजसुधारक नरेंद्र जाधव किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी समाजाला काही वेगळे देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना गोळया घालण्यात येतात. काय गुन्हा होता त्यांचा? समाजात समाजाच्या भल्यासाठी वेगळे विचार करणे हा गुन्हा होता का? नाही. त्यांचे विचार हे आपल्या दुकानदारी व्यवस्थेला घातक असल्याचे दिसून येतात तेव्हा समाजातील खलनायकांचा आत्मा खवळून उठतो आणि मग ते हा मार्ग अलंबितात. या व्यवस्थेसाठी प्रत्येक स्वतंत्र विचाराची व्यक्‍ती ही विद्रोही वाटत असते. गॅलीलिओचे काय झाले? सॉक्रेटिसला विषाचा पेला कुणी दिला? महात्मा गांधींना गोळया कुणी घातल्या?येशूला क्रृसावर कुणी चढविले?बुद्‌धावर कुणी हल्ले केलेत? तुकारामाला कुणी सदेही स्वर्गात पाठविलं? या स्वतंत्र प्रतिभेच्या थोर पुरूषांचे विचार ज्या समाजाला पेलवत नाही. समाजाच्या नितीनियमांनी चालणारा समाज नवीन विचारांना जवळ करतो की काय, अशी भिती वाटत असल्यामुळे समाज अधिक हिंसक होउन विचाराचं उत्तर गोळयांनी देउ पाहतो. जन्म घेतला तेव्हापासून मरेपर्यंत आपण एकंदर समाजाच्या प्रभावाखालीच जगत असतो. म्हणून मग माणूसही समाजाचं एक बायोप्रॉक्‍ट होत जातो. म्हणूनच ओशो म्हणतात ते शंभर टक्‍के खरं आहे.
comparison is a very foolish
attitude because each person is unique and incomparble.
one this understanding settels in you jealouse disappears


विजयकुमार राउत
Vraut697@gmail.com
                                                                                              विजयकुमार राउत
                                                                                             Vraut697@gmail.com

मंगलवार, 19 मई 2015

सिर्फ अहसास है ये... !



                                                                                  * विजयकुमार राउत
सुप्रसिद्‌ध विचारवंत अनिल अवचट यांनी एकदा नागपूरमध्ये केलेले विधान मला फार आवडले. ते म्हणाले, की मला कुठला "वादी' किंवा "कट्‌टर' होणे कधीच पसंत पडणार नाही. त्यांच्या विधानाचा आधार घेउन मला असं म्हणायचं आहे की पुरोगामित्व म्हणजे सर्वज्ञानी असणे, असे नव्हे. पुरोगामी म्हणजे कुठल्यातरी चौकटीत अंतिम सत्य बसवून आपलंच म्हणनं खरं करून भ्रमात जगणारा एक हट्‌टी प्राणी आहे. काही सम्माननिय अपवाद वगळता पुरोगामित्वालाही बदनाम करण्याचं काम सतत काही नकली पुरोगाम्यांकडून होत असते. पुरोगामी म्हणवून घेण्याची गेल्या काही दशकांपासून फॅशनच झाली आहे. "वादी' किंवा "कट्‌टर' होणं हे दुस-याच्या चष्यातून जग पाहण्यासारखंच असतं.
विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करणा-यां संशोधक, वैज्ञानिकांजवळ सकारात्मकता अधिक असते. प्रत्येक नवा शोध लागल्यानंतर ध्येयाकडे केवळ चालत जाण्याची केवळ 000.09टक्‍केच वाटचाल झाली असल्याची कबुली संशोधक देत असल्यामुळे विज्ञान कधीच अंतिम सत्याचा दावा करीत नाही. शेवटी हा प्रवास असतो. येथे अंतिम असं काहीच नसतं. निसर्ग हा प्रत्येक वेळेस बदलत असतो. या परिवर्तनातच सृष्टीला खरी मौज आहे. म्हणून प्रत्येक पिढीत बदल पहायला मिळतात. उलट सृष्टीच्या नियमानुसार जो बदलत नाही तो संपतोच. डार्विनने हे अभ्यासाअंती त्याच्या सखोल संशोधनातून जगासमोर मांडलं. बदलास प्रतिसाद न देणा-या अनेक प्रजाती आतापर्यंत आपलं अस्तित्व गमावून बसल्याचे दिसून येते.
ख-या अर्थानं खूप शिकलेला माणूस सुशिक्षित होण्यापेक्षा अतिशहाणा होत जातो. त्याच्या अंगात पदव्यां व शिक्षणाविषयी अहंभावच अधिक असतो. सिद्‌धांतवादी किंवा कट्‌टर होणं, हेही अज्ञानाचंच लक्षण असतं. "देव , धर्म सब झुठ आहे...' वगैरे वगैरे म्हणत तो स्वतःला पुरोगामी किंवा नास्तिक म्हणविण्यात धन्यता मानतो. जे डोळयाने दिसते किंवा जे सिद्‌ध करू शकतो, त्यालाच तो मानतो. काही गोष्टी डोळयानें दिसत नाहीत. मग त्या मानायला नकोत का? सुक्ष्मदर्शक यंत्रानंही ज्या "बॅक्‍टेरियां'चं अस्तित्व सिद्‌ध होणे कठीण असते. अशा अनेक गोष्टीचं अस्तित्व सिद्‌ध करताच येत नाही.
शिक्षण घेतल्यानंतर सर्वच प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत, अशी प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. परंतु मित्रहो, शिक्षण मिळाले म्हणजे तुम्हाला देवाकडे पाहण्याची दृष्टीही प्राप्त झाली, असा त्याचा अर्थ होत नाही. देव आहे किंवा नाही, हा प्रश्‍न म्हणजे आपल्या खिशात कवडीही नसताना आपण विमान विकत घेण्यास चाललो, अशा प्रकारचा हा शिक्षित मंडळीचा स्वभाव असतो. इथे "देव' हा शब्द वापरणे हा एक नाईलाज आहे. महात्मा फुलेंना हा शब्द मंजूर नसल्यामुळे त्यांनी एक सुंदर शब्द मराठीला दिला तो म्हणजे "निर्मीक'. हा निर्मीक कोण आहे.. कसा आहे. हे प्रश्‍न फजूल आहेत. भगवान ओशो यांनी "रसो वैसः' म्हणून संबोधलं आहे. तो निगुर्ण, निराकार आहे, हे जगातील प्रत्येक धर्माने सांगीतले आहे. आपल्याला देव किंवा निर्मीक समजून घ्यायचा असेल तर थोडे वेगळे भांडवल कमाविण्याची गरज आहे. जसं काव्य समजून घ्यायचं असेल तर संवेदनशिलता हा गुण महत्वाचा आहे. त्याचा रसास्वाद बुद्‌धीच्या बळावर घेता येत नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उगाच का म्हणून जातात ? "देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. देव अशानं भेटायचा नाही रे..!' उठसुठ देव कोठे आहे ? देव दाखवा नाही तर श्राद्‌ध करा...तुम्ही देवभोळे, अशी धमकी देत जिंकल्याच्या अविर्भावात स्वतःलाच नास्तिकतेचं प्रमाणपत्र देणा-यांना ते या भजनातून समर्पक उत्तर देतात. ही सगळी उठाठेव कशासाठी? हेच कळत नाही. देवाचे स्वरूप समजून सांगण्यासाठी मला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. हा माझा नाईलाज आहे. तो निर्गुण आहे...निर्वीकार आहे, हे कुठल्या शब्दात बरे सांगता येईल? कारण मानवी बुद्‌धीला त्याही पलिकडे जाताच येत नाही. म्हणूनच तर सगुण साकाराची पुजा अस्तित्वात आली.
ंथिय साहित्यात "त्या 'निर्गुण- निराकार परमेश्‍वराच्या अस्तित्वाविषयी चार आंधळयांचा एक दृष्टांत आला आहे. त्या आंधळयांना हत्ती कसा असतो, हे विचारले असता एकमेकांना जसा जाणवला तसा ते सांगतात. कोणी म्हणतात हत्ती खराटयासारखा.. तर दुसरा आंधळा म्हणतो हत्ती सुपासारखा. तिसरा म्हणतो हत्ती घराच्या खांबासारखा.. प्रत्येक जण आपल्या मगदूराप्रमाणे उत्तर देतो. या लौकिक जगात वावरत असताना प्रत्येकाला "तो' ईश्‍वर कसा दिसतो, हे या दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. शेवटी त्याच रस्त्याने जाणारा एक डोळस पुरूष त्या सर्व आंधळयांचा भ्रम तोंडतो व हत्तीचे संपूर्ण अवयव म्हणजे हत्ती, असं सांगतो. तसंच परमेश्‍वराचं आहे. ज्या ज्या गोष्टी दिसतात , त्या त्या गोष्टीत परमेश्‍वरच सामावलेला आहे. आपल्यापैकी अनेक जण त्यालाच ईश्‍वर समजून बसतात. प्रत्येक वेळी आपण सर्वसामान्य त्या आंधळयांच्याच भूमीकेत असतो.
"जे पिंडी ते ब्रम्हांडी' तसंच त्याचं अस्तित्व अणूरेणूत सामावलेलं आहे. शेवटी हा प्रवास आपल्यापासून सुरू होतो आणि आपल्यावरच संपतो. कारण मीदेखिल या सृष्टीचा एक अणूच आहे. जे या सृष्टीत आहे, ते ते माझयात आहे. म्हणून परमेश्‍वराचा एक परिपूर्ण अंश माझयातही आहे. म्हणून मी अगदी रेणूपेक्षाही छोटा आणि आकाशापेक्षाही अतिविशाल आहे. प्रत्येक गोष्टीत पुरावा हवा कशाला? आणि पुरावा देण्याइतके आपण परिपूर्ण आहोत का? निसर्ग तर प्रत्येक वेळी आपल्यावर प्रयोग करतो. सृष्टीची उत्क्रांती करीत असताना प्रत्येक पिढीत तो बदल घडवून आणतोच. डोक्‍यातली विचारांची चिवचिव थांबवा आणि थोडे संवेदनशिल होउन त्याच्या अस्तिवाचा सूक्ष्म आवाज ऐका !
म्हणून गुलजारच्या शब्दात थोडासा फेरफार करून म्हणता येईल....
सिर्फ अहसास है ये, रूहसे महसूस करो.
प्यार को प्यारही रहने दोन कोई नाम ना दो'.
.
आता फक्‍त गुलजारच्या ओळीतून "प्यार' हा शब्द बाजूला करा आणि तेथे जो कोणी सृष्टीचं संचालन करणारा आहे, त्याला त्याठिकाणी बसवा. म्हणजे तुम्हाला जीवनाच्या सकारात्मकतेचा आनंद घेता येईल. कुठल्याही गोष्टीला आपण शब्दात पकडण्याचं धाडस करतो आणि अर्थाच्या सागरात गटांगळया खातो. अनेकदा प्रश्‍न बालिश स्वरूपाचे असतात. या जगात ईश्‍वराचा शोध घेण्यास गेलेले सर्वच शेवटी स्वतःपर्यंत पोहचल्यावर त्यांना या मागचं सुत्र समजलं. म्हणून देव बाहेर शोधायचा नसतो तर प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणात खोदायचा असतो.
आपल्याला जे इंद्रिये निसर्गाकडून मिळालेले आहेत, त्यांची काही क्षमता आहे. त्यापलीकडे जाण्याची क्षमता आपल्यात निसर्गानं निर्माण केलेली आहे. प्रयत्नांती ते साधता येतं. तेथे शब्दांची भाषा काम देत नाही. शब्दांच्या पलिकडे जावे लागते. एखाद्या मुंगीला आपण विचारले की बाई, हे विश्‍व केवढे आहे? तर तिच्या अवाक्‍यात जे आहे तेच तिचे विश्‍व आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या इंद्रियाचे असेच असते. त्याचा जितका अवाका आहे तेच त्याचं विश्‍व असतं.
परमेश्‍वर कसा आणि कुठे असतो, हे समजण्यासाठी अनेक विद्यांमध्ये पारंगत असलेला एक जण एका विख्यात महर्षींकडे जातो. महर्षींना विनंती करतो, की गुरूजी, आपली सगळीकडे ख्याती आहे. आपलं नाव चारी दिशांत पसरलेले आहे. इतक्‍या विद्यांमध्ये मी पारंगत असताना मला देव कुठेच मिळाला नाही. मी देव शोधण्याच्या इच्छेने आपणाकडे आलो. खूप विनवणी केल्यानंतर त्याला महर्षी एका तळयाशेजारी नेतात. पाण्यात उतरण्यास सांगतात. महर्षी त्याला खोल पाण्यात नेउन त्याचे डोके धरून पूर्ण ताकदीनिशी पाण्यात बुचकाळतात. तो शिष्य पाण्याच्या बाहेर निघण्यासाठी खूप धडपडतो. त्याला श्‍वास घेणंही कठीण होउन जातं. ते बलदांड महर्षी आणखी जोरात त्याला पाण्यात बुचकाळतात. तो युवक जगण्याच्या शेवटच्या उर्मीने उफाळून वर येतो. महर्षींना अद्‌वातद्‌वा बोलायला लागतो. "हे गुरूजी, आपल्याकडे मी देव कुठे आहे हे, विचारायला आलो होतो. तेव्हा तुम्ही माझा जिव घेत होता की काय?' युवक अर्धमेला झालेला असतो. महर्षी शांतपणे उत्तर देतात, "हे युवका, तुला देव दाखविण्याच्या तुझया इच्छेखातर तुला मी इथे आणले. तुला "तो' दिसला की नाही कोण जाणे ! तुला खरं तर देवाला बघण्याची तळमळच नव्हती. म्हणून तुझा जिव जाईस्तोवर मी तुला पाण्यात बुचकाळले. तहान लागल्याशिवाय तुला देवत्व कळणार नाही.' युवकाने योग्य तो धडा घेतला आणि रस्त्याने परत निघाला.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं रूप दाखविताना त्यालाही दिव्य दृष्टी बहाल केली. कारण सर्वसामान्य दृष्टीतून तो भगवंताचं रूप पाहूच शकत नव्हता. सगळी गीता शब्दात सांगून झाल्यानंतरही अजुर्न भगवंताला प्रश्‍न विचरतोच, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष रूप दाखविण्याशिवाय गत्यंतर नसतं. थोडं व्यापक विचार केला तर भगवंतांनी संपूर्ण जिवसृष्टीचे विज्ञानच येथे सांगीतलेले आहे.
कोणी म्हणतात की देव कुठे आहे? त्याला प्रतिप्रश्‍न असा की, तुझी भक्‍ती कुठे आहे? प्रत्येक गोष्ट बुद्‌धीने समजून घ्यायची नसते. हे म्हणजे अभ्यास न करता मला पहिल्या नंबरने पास करा, म्हणण्यासारखं आहे.
कोण कहता हेै भगवान होते नही
तुने दिलसे कभीभी पुकारा नही !!

भगवान बुद्‌धांकडे एकदा तिन वेगवेगळया स्वभावाच्या व्यक्‍ती आल्या. पहिली व्यक्‍ती सकाळी येउन भगवंतांच्या पाया पडली आणि विनंती केली, हे भगवन, देव असतो की नाही?
तथागत समाधीस्थ होते. त्यांनी मानेने नकार दर्शविला. ती व्यक्‍ती निघून गेली. त्यानंतर दुपारी दुसरी व्यक्‍ती दुपारी येते. बुद्‌धांना नमस्कार करून तिनेही हाच प्रश्‍न विचारला. भगवन, देव आहे की नाही? तेव्हाही भगवंतांनी समाधीस्थ अवस्थेत मानेने होकार दर्शविला. त्यानंतर सायंकाळी एक शेतकरी आला. त्याने ध्यानस्थ बसलेल्या भगवान बुद्‌धांकडे पाहून नमस्कार केला आणि शांत चित्ताने तो एका कोप-यात जाउन बसला. त्याच्या मनाचा तळ अविचल होता. तिथे कुठलेच प्रश्‍न नव्हते. कुठलीच अशांतता नव्हती. भगवान बुद्‌धांनी अर्धोंमिलीत नजरेने तिच्याकडे पाहून थोडे मंद स्मित केलं. तो शेतकरी मनाने अधिक प्रसन्न झाला आणि निघून गेला.
रात्री तथागतांचा अत्यंत निकटवर्तिय, प्रिय भिक्षूक आनंद बुद्‌धांना प्रश्‍न विचारतो की "भगवान, माझया मनात आज एक शंका आहे. आजवर मी तुमच्यावर प्रेम केलं. तुमच्यासोबत राहिलो. तुम्ही आयुष्यात खोटं कधी बोलले नाहीत. परंतु आज मी जे बघितलं ते तुमच्याबद्‌दल भ्रम निर्माण करणारे आहे. आज तुमच्याकडे तिन व्यक्‍ती येउन गेल्या आणि तिघांच्याही एकाच प्रश्‍नाला तुम्ही तीन प्रकारची उत्तरं दिलीत. भगवान, कृपा करून मला हे सांगा. मला स्वस्थ बसवणार नाही.' भगवान पुन्हा स्मित करून त्याला शांत राहण्यास सांगतात. परंतु आनंदाच्या मनाची चलबिचल काही केल्या शांत होत नाही. शेवटी त्याच्या अस्वस्थतेपुढे भगवान आपले मोैन तोडतात. "प्रिय आनंद.. पहिली व्यक्‍ती मला भेटून गेली ती आस्तिक होती. म्हणून मी त्याला मानेनेच नकार दर्शवून त्याचा भ्रम तोडला. दुसरी व्यक्‍ती ही नास्तिक होती. त्यालाही मी होकार दर्शवून त्याचाही गैरसमज दूर केला आणि सायंकाळी आलेल्या तिस-या व्यक्‍तीला या प्रश्‍नांशी काहीही देणेघेणे नव्हते, म्हणून तिनं मला कुठलाच प्रश्‍न केला नाही. तो शेतकरी समाधानी होउन परत गेला. आनंदा, आस्तिक असो नाहीतर नास्तिक. माझे प्रशस्तीपत्र घ्यायला आलेले ते दोघेही अहंकारी पुरूष होते. मी जर त्यांचा अहंकार अधिक फुलावा या दृष्टीने उत्तर दिलं असतं तर त्यांनी समाजात जाउन सर्वसामान्यांची दिशाभूल केली असती. मीच सांगतो म्हणून जनमाणसाला दाखले दिले असते. केवळ माझया चुकीच्या प्रशस्तीपत्राने त्यांनी खोटयाचा प्रचार केला असता. परंतु तिसरा जो माणूस सायंकाळी आला, कुठल्याच प्रश्‍नाशी त्याचं काही देणंघेणं नव्हतं. तो अहंकारी नव्हता. तो सामान्य शेतकरी असल्यामुळे केवळ श्रमावर त्याचा विश्‍वास होता.'
परमेश्‍वराचं अस्तित्व समजून घेण्यासाठी कलावंताचं काळीज आणि बालकासारखं निष्पाप असावं लागतं, शेवटी हेच खरं !
                                     * विजयकुमार राउत

                                            

सोमवार, 18 मई 2015

फेसबुक


 

      

                                     * विजयकुमार राउत
हातांमधुनी अर्थ निसटतो सुखासारखा !
"फेस' तुझा मी वाचत बसतो "बुका'सारखा !!

आयुष्याचे झाले असते सोने अमुच्या
सांगुन सांगुन थकून गेला तुकासारखा !!

आनंदाच्या लहरीवरती वितळून जातो
निराश होता गोठुन जातो तुपासारखा !!

तारिफ करता सौंदर्याची असेच होते-
चंद्रही जातो लाजुनि, तुझिया मुखासारखा !!

सारे आहे अनित्य इथले, बुद्‌ध म्हणाला-
बदलुन जाशिल कधीतरी तू रूपासारखा !!

या धरतीच्या कंठालाही कोरड पडली
पाउस येतो, वाहून जातो, मुतासारखा !!
                                            * विजयकुमार राउत

शनिवार, 16 मई 2015

"रेंज'च्या बाहेर...


                          

कशी वेळ आहे, कसा फेर आहे !!
तूही "रेंज'च्या आज बाहेर आहे !!

तुला वाटते, मीच खाली झुकावे
बरी या घडीला तुझी "टेर' आहे !

ख-या शायरीला कुठे भाव आहे?
म्हणा कोकरांनाच "तू शेर आहे'!!

कुठे न्याय आहे? कुठे "राम' आहे?
खुदाच्या घरी आज अंधेर आहे !

तुला "कॉल' देतो, तुझा हाल घेतो !
तसे मित्र येथे किती ढेर आहे !

अरे, जिंदगी काय "मिस कॉल' देते !
तशी काम संपायला देर आहे !!

                      * विजयकुमार राउत
                           8888876462

 
Blogger Templates