Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 8 अक्टूबर 2015

अस्तित्वाला स्वयंदीप करणे म्हणजेच बुद्‌धत्व

                                                                             विजयकुमार राउत

कृर काळोखाला चंद्राच्या शितल प्रकाशाने टोकदारपणे चिरत जावं, तसं एक प्रखर अस्तित्व वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आकाशातील निरव शांततेत स्वयंपूर्ण तेज घेउन उजाडलं, तेव्हा दाही दिशा प्रकाशमान झाल्या. आकाशानेही एक अर्थपूर्ण मौन धारण केलं. करूणा, शांती आणि अहिंसेचं परिपूर्ण ज्ञान घेउन ते अस्तित्व अवकाशाला व्यापून उरलं होतं. युगायुगांपासून उद्‌दामपणे नाचणारा काळोख केवळ शुद्‌ध प्रकाशाच्या भयाने पुन्हा शून्यात गडप झाला. तथागतांचा उदय हजारो युगांसाठी प्रेरणादायी ठरला. म्हणून तथागत जन्माने बुद्‌ध होउन कधीच अवतरित झालेले नसतात. तर माणसांतील संपूर्ण संभावनांचं पूर्ण रूपांतरण अखिल मानवजातीपुढे मूळ स्वरूपात प्रगट झालेलं असतं. बुद्‌धांचा जन्म, त्यांना ज्ञान प्राप्त होणं आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटनांकडे बारकाईनं बघीतलं तर बुद्‌ध एका प्रकाशयुगाचा प्रतिनिधी ठरतो.
सुमारे अडिच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्‌ध या मातीत जन्माला आले. त्यानंतर कितीतरी वर्षे अखंड भारतवर्षाचे क्षितीज त्यांच्या धम्मकायेने उजळून निघालेले असतानाचा काळ हा इतिहासातील सर्वात महत्वूपर्ण ठरतो. या काळात मानवातील अतिउच्च जाणिवा नेणिवेच्या दिशेने प्रसरण पावत असल्याचे दृष्य या जगात इतिहासाला पहिल्यांदाच पहावयास मिळालं. मधल्या काळात अडिच हजार वर्षांपर्यंत बुद्‌ध मात्र या मातीतून अचानक गडप झाल्याचा इतिहासही या मातीने वाचला आहे.
14 ऑक्‍टोबर 1956 या वर्षापर्यंत मानवतेला उत्थानाकडे नेणारा बौद्‌ध धम्म येथून कसा काय हद्‌दपार झाला, याचं उत्तरही इतिहासात सापडेल. परंतु इतिहास जाणने म्हणजे केवळ भूतकाळातील मृत अवशेषाचे उत्खनन करून त्यांची पूजा बांधणे नव्हे, तसं त्याचं स्वरूपही नसावं. इतिहास हा संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला जोडून त्याच्याशी नाते अबाधित करण्याचा संशोधनात्मकरित्या केलेला एक सुयोग्य प्रयत्न असावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो शोषित, पिडीत बांधवांना बौद्‌ध धम्माची दीक्षा देउन त्यांचे जीवन नुसतेच सुकर केले नाही तर ते स्वयंप्रकाशित केले. कारण केवळ बुद्‌धाचा एकमेव धम्मच माणसाला त्याची खरी ओळख देउ शकतो, या विचारातून दीक्षेच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बोधीसत्वाचे बिज या भूमीवर रूजविले. आज बोधीवृक्षाचा खूप मोठया प्रमाणात विस्तार झाला आहे. या विश्‍वातील प्रामुख्याने सुमारे दहा-पंधरा देशांत अनेक शाखांच्या रूपाने बौद्‌ध धम्म विकास पावला आहे. धम्म हा त्यांच्या जगण्याचा एक भाग झाला आहे.
आयफोनचा शोध लागण्यापूर्वी स्टीफन जॉब्ज हा संशोधनात अनेकदा असफल झाला असताना त्याला कुणीतरी भारतात जाउन बौद्‌ध धम्माबद्‌दल जाणून घेण्याचा सल्ला दिला. नैराश्‍येच्या स्थितीत स्टीफन भारतात आला. बौद्‌ध धम्माच्या तत्वज्ञानाने त्याच्यावर गारूड घातले. तो येथून परत गेला, तेव्हा त्याला त्याच्या संशोधनातील त्रुटया लक्षात आल्या आणि तो संशोधनात एकाग्र झाल्यानंतर यशस्वी झाला. त्याच्या मागचे कारण शोधले तर बौद्‌ध धम्म हा "स्वयंदीप' होण्याचा जो मंत्र देतो,या सुत्रातच दडलेले आहे. स्टीफनला आलेला हा अनुभव केवळ जादू किंवा हिप्नोटीझमच्या स्वरूपाचा नव्हता. "स्वयंदीप' या शब्दातच यशाची बिजे रूजलेली असल्याचे स्टीफनला जाणवले आणि आयफोनचा शोध लावण्यात तो यशस्वी ठरला. त्याचप्रमाणे महान संशोधक आईनस्टाईन हा सुद्‌धा संशोधन करताना बुद्‌ध विचारांनी प्रभावित झालेला होता. संशोधक, साहित्यीक व जगातील महान विचारवंतांना आज बुद्‌ध न संपणारं पर्व वाटतं. चिनमध्ये ताओ, जापानमध्ये झेन किंवा शिंतो, थायलॅंड, मॅनमार, मलेशिया, श्रीलंका, कम्बोडिया, तायवान आदी देशात विविध स्वरूपाचा बौद्‌ध धम्म अस्तित्वात आला आहे. बुद्‌ध होण्याचं बिज प्रत्येकात सुप्तावस्थेत असतं, हा संदेश बुद्‌ध विचारधारेतून मिळतो.
आज आधुनिक शिक्षण पद्‌धतीच्या नावाने सगळीकडे ओरड आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेला इंग्रजांच्या कुटनितीची किनार असल्यामुळे तिनं निर्माण केलेला समाज हा सुजान झालेला नसून विकृत होत आहे. आधुनिकतून भौतिक विकास तर साधल्या गेला. परंतु श्रीमंत, गरीब, जाती-धर्माची दरी मात्र खूप वाढत गेली. दोन्ही वर्ग एकमेकांबद्‌दल वाटणा-या भावनेतून अस्वस्थ आहेत. इंडिया विरूद्‌ध भारत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रतिशोधाचं रसायण मेंदूत तयार झालं आणि ते आता दिवसेंदिवस रक्‍तातून सळसळत आहे. हिंसा, बलात्कार, भ्रष्टाचार, एकमेकांबद्‌दची असुया यासारख्या विकारांनी माणुसकीला पुरतं गिळंकृत केलं आहे. समाज हा प्रतिशोधाच्या आगीत रात्रंदिवस जळत आहे. हे सर्व होत असताना या समस्यांचं मूळ मेकॉलेच्या शिक्षणपद्‌धतीत आहे. भांडवलदारीच्या युगात माणूस एक "प्रॉडक्‍ट' झाला आहे. "युज अँड थ्रो' या भूमीकेतून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. माणूस बनविणारी शिक्षणव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्यामुळे राष्ट्राचा मुख्य पाया असलेला माणूसच राजकारणातून उपद्‌व्याप निर्माण करीत आहे. एक उद्योगपती "हम फौलाद नही, इनसान बनाते है' असं म्हणतो, तेव्हा तो त्या कारखान्याच्या मालाच्या गुणवत्तेचच कौतुक अधिक करीत असतो. माणूस बनविणारी शिक्षणपद्‌धतीच अस्तित्वात नसल्यामुळे येथे सगळे प्रश्‍न "जैसे थेच' आहेत.
बुद्‌ध प्रज्ञा,शिल आणि करूणा ही माणसाची त्रिसुत्री असल्याचं सांगतात तेव्हा त्यात जगातील प्रत्येक माणसाच्या उदयाची शाश्‍वती आहे. भगवान बुद्‌धांचा धम्म हा खरा विज्ञानवादी आहे. प्रतित्युतसमुद्‌पादसारख्या सिद्‌धांतातून त्यांनी त्रिकालाबाधीत विज्ञान सांगीतलं आहे. नुसत्या स्त्री -पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही, तर त्याबरोबर तिसरी घटना घडते, त्याला च्युतिचित्त (deceased conciousness)असे म्हटले जाते. भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे, त्यात "कराल तसे भराल' असे म्हटले आहे. असे सांगणारा बुद्ध हा पहिला महापुरुष ठरतो. भगवान बुद्ध म्हणतात की शीलाच्या आणि शुद्ध आचरणाच्या मार्गाने मनुष्य आपल्या भविष्याचा निर्माता होउ शकतो किंवा अशुद्ध आचरणाने मनुष्य आपल्याकरीता नरक म्हणजे दुःखमय जग निर्माण करू शकतो . जेव्हा आपले चित्त, वाणी, शारीरिक क्रिया संतुलित असतात तेव्हा विचारही संतुलीतच असतात. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की पापकर्म आपणच करतो आणि माणूस अशुद्ध होतो. म्हणून तो स्वतःला पापकर्म करण्यापासून दूर ठेवू शकतो आपणही आपली शुद्धी करू शकतो. पाप किंवा पुण्य या दोन्ही गोष्टी स्वतःवरच अवलंबून आहेत. सम्यक संकल्प, सम्यक आजिवीका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हीच निर्वाण प्राप्त करण्याची साधनं असल्याचे बुद्‌ध सांगतो.
शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असून त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे बुद्‌ध म्हणता. त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे त्यांचे विचार हे आजचे विज्ञानही मान्य करीत आहे. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे की शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे. यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्‍सिजन, नाइट्रोजन, लोह, कॅल्शियम, फॉस्फोरस हे मुख्य आहेत. वरील तत्व आवश्‍यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे, या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्‍चितपणे शरीराला प्रभावित करते. विज्ञानाची ही मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून सांगितली आहे. संपूर्ण बुद्‌ध वाचल्यानंतर त्याच्या दिशेने चालने म्हणजे स्वतःच स्वतःला जाणून घेणे किंवा स्वयंदीप करणे होय.

                                       विजयकुमार राउत
                                      vraut90@yahoo.com

                                                                   

 
Blogger Templates