Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

Featured Posts

मुख्यपृष्ठ

गुरुवार, 7 अप्रैल 2022

जीवनात उरावा ‘राम’

-विजयकुमार राऊत ‘श्रीरामा’चे महत्व आपल्या जीवनात अधिक मोठे आहे. आपल्या रोजच्या जगण्यात ‘राम’ असेल तोच मनुष्य यशस्वी जीवन जगू शकतो. सहज बोलताना आपणच म्हणतोच की, आता जीवनात ‘राम’च उरला नाही. त्यात काहीच ‘राम’ नाही. मला डॉक्टरने आ‘राम’ करायला सांगितले. दोन व्यक्ती भेटल्यानंतर ‘राम राम’ म्हणताना त्यांच्या भेटीमध्ये एकमेकांत ‘राम’ पाहणे असा त्याचा अर्थ होय. आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर हळूहळू रामाशी परिचय होत जातो आणि एका वेळी मग ‘राम नाम सत्य है’ असे म्हणतच शेवटच्या प्रवासाला निघावे लागते. तुम्ही भलेही या जन्मात नकारा अथवा स्वीकारा. म्हणून ज्याला त्याला आपल्या जगण्यातला ‘राम’ शोधायचा आहे. त्यासाठीच हा जगण्याचा प्रवास आहे. रामाला मर्यांदाचे बंधन ओलांडता येत नसल्यामुळे समाजाने, निसर्गाने आखून दिलेल्या नियमांनुसारच आपले वर्तन ठेवावे लागले. मर्यादा पुरुषोत्तम राम होता होताच ‘कृष्ण’ ही जीवनात आपोआप उतरणे हेच मोठे होण्याचे गमक आहे. या जगतात ‘द्वैत’ असल्यामुळे रामाबरोबरच प्रत्येकाला कृष्णही स्वीकारणे अपरिहार्यच ठरते. कारण मी शरीराने मर्यादीत असलो तरी बुद्धी आणि ह्दयाने मात्र अमर्यादच आहे. एक माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असल्यातरी मी अनादी आहे, अनंत आहे, या तत्वापर्यंत पोहचणे हा खऱ्या अर्थाने प्रवास आहे. म्हणून एका अर्थाने ‘जय जय रामकृष्ण हरी’ हे केवळ शब्द नव्हेत, तर तो मानवी जीवनातील अद्वैताचे नाते सांगणारा मोठा मंत्र आहे. आपण अमर्याद विचार करु शकतो, पण समाजाचे नितीनियम सोडून अमर्याद वागलो तर अनेक समस्यांत अडकून पडू शकतो. या सृष्टीने स्वतःला नियमांत बांधून ठेवले आहे. ‘निसर्गाचे नियम’ (law of nature)म्हणून ते प्रचलित आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करताच येत नाही. करण्याचा प्रयत्न केला की निसर्ग आपल्यालाच त्यातून बाद करतो. तसेच जीवनाचेही आहे. आपण मानव म्हणचे पुरुष आहोत, परंतू आपल्याला ‘पुरुषोत्तम’ व्हायचे असेल तर मर्यादा पाळणे हे अपरिहार्यपणे आलेच. मात्र आज अशक्य वाटणारे आणि काल्पनिक ठरू पाहणारे ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार जर माझ्या ठिकाणी असतील तर ते कधीतरी साकार होऊन तुम्हाला ‘जिनियस’ करु शकतात. आपण नित्य रुपाने करीत असलेल्या कामातही ‘राम’ पाहावा असे म्हटले जाते. आणि मग केलेले काम श्रीकृष्णचरणी अर्पण केल्यानंतर फळाची अपेक्षा उरत नाही आणि मग माणसाला दुःखीही होत नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ यात दोन गोष्टी एकाच वेळी सहज साध्य होतात. कामात ‘राम’ पाहणे म्हणजे ‘फुल्ल कॉंसंट्रेशन’ने तुम्हाला काम हे कामच न वाटणे. कामात तुम्ही एकरुप झाल्यानंतर ते काम ‘मी’ केले, असा भावही मागे न उरणे. मग पुढची गोष्ट करा, अगर करु नका, तुमचे एकाग्र चित्ताने झालेले काम पाहिजे ते फळ देऊन जाते. म्हणचे राम मोठा की कृष्ण हा प्रश्‍नच उरत नाही. येथे सारे द्वैत मिटते. दोन्ही एकच होऊन जातात. आपला सगळा खटाटोप एकरुप होण्यासाठीच असतो. त्यासाठी भांडणे उद्भतात. एकरुप झाले की सगळे वादविवाद संपून जातात. पत्नी, मुले, मित्र, जग, आईवडील या सर्वांशी आपले वाद कशासाठी? आपल्या विचाराशी सहमत होण्यासाठी किंवा आपल्याशी एकरुप होण्यासाठीच ना ! म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याचे सार आधीच सांगून ठेवले आहे. द्वैतवाद, अद्वैतवाद, एकेश्‍वरवाद, अनेकवाद असे अनेकानेक वाद या जगतात दिसतात. यात वाद जरी दिसत असले तरी सगळेच वाद एकमेकांशी फारकत घेतल्यामुळे उद्भभवतात. स्वामी चक्रधरांच्या लिळेतील त्या आंधळ्याप्रमाणेच असतात सगळे वाद. वादात अडकणाऱ्यांना द्वैत दिसते. पण हे सगळे समाजपुरुषाचे एकेक अवयव असून संपूर्ण समाजपुरुष या अंगापासून बनलेला आहे, हे अंजन घालणारा कोणीतरी महापुरुषच त्या आंधळ्यांचा वाद मिटवू शकतो.
 
Blogger Templates