शनिवार, 19 जून 2021
मंगलवार, 1 जून 2021
बुद्धाची करुणा हवी, करोना नको !
करोना या महामारीने संपूर्ण जगाला हादरुन
सोडले आहे. एखाद्या सूक्ष्म, अदृश्य, विध्वंसकारी शक्तीने मानसाला वेठीस धरून
संपूर्ण जगाला नकोसे करुन सोडावे, चंद्र आणि मंगळावर पोहचलेल्या माणसाल हतबल करुन
सोडावे, पाहता पाहता जगण्याचे सर्व संदर्भ बदवून टाकावे इतकेच नव्हे तर उपचाराअभावी
माणसाची केविलवाणी अवस्था करुन टाकावी, अशा विपत्तीच्या वेळी माणसापासून माणूस दूर
व्हावा, माणसाच्या ताटातली त्याच्या श्रमाची भाकर खाण्याचा हक्कही हिरावून घ्यावा,
आपला जिवाभावाचा माणूस आपल्यापासून निदर्यतेने कोणीतरी हिरावून न्यावा, लॉकडाउनच्या
कोंडीत त्याचा श्वास निघेपर्यंत कोंडून घ्यावे, पोटाची भूक अस्वस्थ करेपर्यंत पाय
घासून मरायला भाग पाडावे, कोरोनाचा संसर्ग होताच त्याला जगापासून तोडून जीव
निघेपर्यंत त्याच्या मरणाची प्रतीक्षा केल्यानंतरही मृत्यूच्या क्षणी मात्र
त्याच्या चितेला स्पर्श होण्यापासून त्याच्या प्रिय जणांना रोखण्यात यावे, त्याच्या
कलेवराचे अंतीम दर्शन करु न देण्यापर्यंत सगळे एकापेक्षा एक कटू अनुभव या
मानवजातीने गेल्या वर्षभरात घेतले आहेत. करोनाची पहिली लाट थोडी ओसरल्यानंतर दुसरी
लाट पहिलीपेक्षा भयंकर अनुभवास मिळाली. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि अशा
किती लाटा नशीबात पेरून ठेवाव्या, याचे उत्तर आजतरी कोणाचजवळ नाही. त्याच्या
संसर्गावर कोठला उतारा काम करेल, याचे उत्तरही सद्या कोणत्याच विज्ञानाजवळ नाही.
अशा भयंकर महामारीला आळा घालेल, असा कोणताच उपाय नसल्यामुळे मानवाच्या मर्यादाही या
महामारीसमोर स्पष्ट झाल्या आहेत. अशा अंधारलेल्या सद्याच्या जगात शेकडो
वर्षांपासूनची तथागताची ‘करुणा’च सगळ्या विश्वाच्या अस्तित्वाला पुरुन उरली आहे.
गेल्या अडीच हजार वर्षात अशा कितीतरी महामाऱ्या या जगाने अनुभवल्या आहेत. काही
मानवनिर्मित संकटे, काही नैसर्गिक संहार या आणि अशा संकटांनी सत्यावर बेमुर्वतपणे
हल्ला चढविल्याचा इतिहास आहे.
मित्रहो, अडीच हजार वर्षाचा कालावधी काही
थोडाथोडका नव्हे. इतक्या वर्षात अनेक वादळे आलीत आणि गेलीत. परंतु तथागतांची करुणा
मात्र माजही अख्ख्या विश्वावर मायेची पाखर घालते आहे. माणूस कितीही बुद्धीमान झाला
तरीही ही ‘करुणा’च त्याच्या मदतीला धावून आली. ही करुणाच जगण्याचा आधार ठरली. या
करुणेनेच सगळ्या दुनियेला जवळ केले आहे. एवढी मोठी महामारी आल्यानंतरही ही ‘करुणा’च
मदतीचे रुप घेउन मानवाच्या मदतीला आली. एवढी निष्ठूरता असतानाही वाळवंटात पाण्याचा
झरा मिळावा तसे करुणेचे शिलेदार माणसांच्या मदतीला धावून आल्याचे दृश्य अवतीभवती
दिसले. जशी वेळ आली, जशी गरज भासली तसतसी ही
मंडळी कसलीही अपेक्षा न करताना माणूसकी जपायला पुढे आली. कुणी अन्नधान्याच्या किट्स,
कुणी ऑक्सिजन सिलिंडर, कोणी रुग्णवाहिकेतून गंभीर रुग्णाला ने-आण करणे, स्थानिक नेत्यांनी कोविड सेंटरच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे आदी मदतीची कामे जीव धोक्या घालून पार पाडली. यातून करुणेचे दर्शन महामारीच्या काळोखाने झाकोळले गेले असले तरी मानवी मनातील ‘करुणे’ची ताकद मात्र पुन्हा नवे जग, नवीन आशा निर्मितीचे बळ ठरणार आहे. सोशल डिस्टनसिंग, होम क्वॉरंटाइन, आयसोलेशन, ऑक्सिजनची गरज, म्यूटेशन, इम्यूनिटी पॉवर यासारखे अनेक शब्द नव्यानेच कानावर पडले. त्या त्या शब्दांची गरज जाणिव निर्माण करुन गेली. परंतू त्याचबरोबर ‘करोना’ या शब्दसाधर्म्यामुळे ‘करुणा’ या महाशब्दाला कमीपणा आणण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा क्षणभर भ्रम निमाण व्हावा, अशी स्थिती आहे. परंतू कितीही झाले तरी शेवटी ‘करुणे’चाच विजय होईल हे नक्की.
यानंतरही असाच संकटांचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे, ही खुणगाठ मनाशी बांधून आपल्याला आपल्या कुटुंबाला हा प्रवास करावाच लागणार आहे. बुद्धांच्य करुणेला शरण जाऊन मानवामागे लागलेल्या या करोनारुपी राक्षसाला पराभूत करावेच लागेल. त्यासाठी थोडे धैर्य ठेवावे लागेल. संपूर्ण जगाला ‘महाकारुणिक’ तथागतांनाच शेवटी शरण जावे लागणार आहे. नमो बुद्धाय !!
गुरुवार, 29 अगस्त 2019
विज्ञानातील स्थितंतर
विज्ञानातील उत्क्रांती म्हणा वा स्थित्यंतरे हे विशिष्ट टप्प्यांवर पदोपदी घडत जातात. कारण विज्ञान परिवर्तनशिलता मानते. भौतिकशास्त्र घटनांकडे एकेका "फ्रेम' मधून पाहत असल्यामुळे प्रत्येक घटनेमागचे रहस्य समजून घ्यायचे असेल तर त्या त्या फ्रेममधून एकेक बाबी स्पष्ट होउ पाहतात.ठळक टप्प्यात विज्ञानाची कार्यशैली समजून घ्यायची असेल तर वीसच्या दशकात विज्ञान प्रामुख्याने दोन गटात विभागले जाउ लागल्याचे आपल्या निदर्शनास येते. पहिला गट म्हणजे पदार्थ मानणारा, तर दुसरा पदार्थांच्या पलिकडे जाउन त्यातील "एनर्जी' च्या रूपातून निर्माण होणा-या "वेव्ह' स्वरूपात जाणणारा. या "वेव्ह' किंवा लहरी कशा बनतात, यामागचे रहस्य पुढे समजून घेउ. सदयाच्या मुद्दयावर ऐवढेच समजून घेउ. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पदार्थांवर संशोधन करून भौतिकातील काटेकोर नियम सांगणारे क्लासीकल फिजीक्स व दुसरा गट क्वॉंटम फिजीक्स. क्वॉटम फिजीक्स जाणण्यासाठी दृष्टी व जाणिव अधिकाधिक सूक्ष्म करावी लागते. तिथे स्थुल स्वरूपात वेगळा तर सूक्ष्म रूपात वेगळा असा द्विअंगी अनुभव येतो. जरी हा अनुभव प्रत्यक्ष डोळयांनी दिसत नसला तरी त्यातील घडामोडी मात्र अगदी सुक्ष्मातिसूक्ष्मरित्या समजतात. म्हणजे ख-या अर्थाने अणूरेणूचे एकंदर वागणे "डयुयॉलिटी' स्वरूपाचे असते, असे लक्षात येते. म्हणजे पदार्थ एकतर अणूरूप तसेच लहरी असा दोन स्थितीत अनुभवायला मिळतो.
वैज्ञानिक विश्वातील परिभाषांना नवी दृष्टी देणारे वर्नर हेईजनबर्ग यांनी ख-या अर्थाने "अनसर्टीनिटी प्रिंसीपल' सांगून मानवजातीची अख्खी दृष्टीच बदलून टाकली. त्यांनी 1927 मध्ये अनिश्चिततेचा सिद्धांत प्रतिपादीत करताच सगळयांची बोबडी वळली. त्यावेळी अल्बर्ट आईनस्टाईनचा सापेक्षततेचा सिद्धांत बराच लोकप्रिय झाला व तो सद्सदविवेकबुद्धीच्या कसोटीवर खरा ठरला होता. सृष्टीचे एकूण तत्व हाती लागल्याचा जगाला अतिव आनंद झाल्यामुळे सगळीकडे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा उदोउदो सुरू होता. जणू स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच मानव जातीला आनंद झाला असावा. त्याच्यामागचे कारणही तसेच होते. सापेक्षता सिद्धांत इलेक्ट्रान, प्रोटान, न्यूट्रानच्या एकंदर स्थितीवर सापेक्ष भाष्य करणारा होता. म्हणजे सृष्टीत घडणा-या प्रत्येक पदार्थाचे भविष्य कसे असेल, याबद्दल अणूंच्या गतीवरून ते सिद्ध करता येत असल्याचा अविर्भाव दाटून आला होता. यातील विनोद म्हणजे सापेक्षतावाद जर एखाद्या मच्छराच्या बसण्यावरून त्याची पुढील स्थिती सिद्ध करीत असेल तर मग पुढे तो मच्छर जर मरणार तेव्हा तो नेमका कशाने मरणार आहे, मस्कीटोमॅटने की एखाद्याच्या अंगावर बसल्यामुळे त्याच्या थापेने? असा प्रश्न हेडजेनबर्ग याने केला होता. वास्तविक पाहता दोघेही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य होते.
जर्मनशास्त्रज्ञ वर्नर हाईजनबर्ग यांचा अनिश्चिततेचा सिद्धांतावरून आईनस्टाईन यांच्यात नंतरच्या काळात बरेच वादविवाद झाले. हेईजनबर्गच्या सिद्धांतावरून क्लासिक फिजीक्समध्ये अख्खे विज्ञान दोन गटात विभागल्या गेले. कालपरवापर्यंत या मतभेदातील दरी कायम राहिली. मात्र आता केवळ तार्किक बुद्धीचेच परिमाण न लावता शास्त्रज्ञ वेगळया दृष्टीतून बघायला लागले आहेत. म्हणून आधुनिक विज्ञान आता तर्काची भाषा सोडून वेगळी भाषा बोलायला लागले आहे. या वादातून आईनस्टाईन यांच्या संशोधनाला त्याकाळी तथाकथीत विज्ञानवादी "यहुदी विज्ञान' म्हणून हिणविले जायचे. सृष्टीचा व्यापार निसर्गानेच निर्माण केलेल्या "परफेक्ट' नियमानुसार चालतो, असा आईनस्टाईचा दावा होता. तो नियम कोणता तर "सापेक्षतावाद' यानुसार चालतो, असे आईनस्टाईनचे म्हणणे होते. अनेकदा निसर्गाच्या घटनांबाबत भाकीत करणे किंवा आपण पाहतो त्याप्रमाणे त्यांची योग्य स्थिती समजून घेता येणे शक्य नाही, थोडक्यात यालाच अनिश्चिततेचा सिद्धांत म्हणतात.
हाईजनबर्गचा अनिश्चिततेचा सिद्धांत समजून घेण्यापूर्वी आईनस्टाइनचा सापेक्षता वाद समजावा लागेल.


