Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

सोमवार, 29 अगस्त 2016

ससा, कासव पुन्हा नव्याने

विजयकुमार राउत


ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहान असताना कित्येक वेळा ऐकलेली आहे. त्यात नवीन असे काहीच राहिलेंले नाही. अगदी कथेचा चौथा पडेपर्यंत आपण चर्वितचर्वण केलेले आहे. अतिआत्मविश्‍वास बाळगाल तर तुमची सदैव हारच होईल, हा बोध घेण्यापलिकडे आपण त्या कथेच्या वाटेला गेलेलो नसतो. रूपकं आणि प्रतिकं वापरून दिलेला संदेश नेमका आपल्यापर्यंत पोहचावा हा त्या कथेमागचा उद्‌देश असतो. तो किती पोहचतो, हेन बोललेले बरे. परंतु समाजात नेमके तसे होताना दिसत नाही. ससा हा भित्रा आणि वेगाने पळणारा प्राणी आहे, हे आपल्याला माहित आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात ससाच्या चालीने चालणारे आपण अधिक वेगवान कसे होउ याचाच प्रत्यक्ष आपल्याला ध्यास लागलेला असतो. म्हणून आपल्या जगण्यातला वेग दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टीत घाई करणे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वेगातून शरिराकडे दुर्लक्ष आणि असंख्य ताणतनाव व बेसुमार आजारांना सोबतीला घेउन आपण पुढच्या काळात कुढत कुढत जग असतो. ससा हा वेगवान आयुष्याचे प्रतिक आहे. आजच्या काळात तोही कदाचित मागे पडेल, असे आपले एकंदरीत जीवनमान झाले आहे.
फार वर्षापूर्वी वेगवान सशाची व मंद गतीने चालणा-या कासवाची शर्यत लागते. अन्‌ स्वभावाप्रमाणे ससा हरतो. सशाला वाटते आपण निश्‍तिच जिंकणार अशा भ्रमात तो विसावा घेता आणि कासव त्याच्या पुढे जाउन जिंकतो. परंतु यातील मर्म असे की ससा जसा वेगवान आहे तसेच त्याला आयुष्यही लाभलेले असते. बहुतांश त्याचे वय कासवाच्या तुलनेत खूप खूप कमी. ससा बहुतेक हा सुमारे 15 ते 20 वर्षच या पृथ्वीतलावर जगतो. तर कासवाचे आयुष्य चारपाचशेच्या घरात असते. या चारपाचशे वर्षाच्या काळात त्याच्या जीवनाचे घडयाळही अती मंद असते. कासवासाठी काळ मंद तर सशासाठी तो वेगवान. सशाच्या जीवनाचे घडयाळ अतिशय वेगाने धावणारे असते. त्यावरून ससाच्या ह्रदयाचे ठोके फारच गतीमान तर कासवाच्या ह्रदयाची धकधक फारच मंद. ह्रदयाच्या या गतीबरोबर त्याच्या जीवनाचा सर्व संकल्प, स्वप्न, आशा-आकांक्षांचा कालावधी ठरलेला असतो. या जगात एक दिवस जगणारे जीवही आपल्या संपूर्ण आयुष्याचे वतुर्ळ पूर्ण करूनच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू असे हे वर्तुळ ठरलेले असते. हे वर्तुळ निसर्गाच्या नियमाप्रमाणे फिरत असते. परंतु त्याचा फिरण्याचा काळ आणि वेग मात्र निसर्गाने निश्‍चित केलेला असतो. प्रत्येक जिवाचे घडयाळ वेगवेगळे असते. चिमूरडया मुंग्याही आपले आयुष्य वर्तुळ पूर्ण करून जगत असतात. माणसाला कदाचित सुमारे 80 वर्षाचे आयुष्य वाटयाला येते. यात सर्व टप्पे ओलांडायचे असतात. कासवाला लाभणारे आयुष्य माणसाच्या तुलनेत फार लांब असते. तर सशाचे त्याहूनही अल्प. अल्पशा कालावधीत संपूर्ण आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरिराची एकंदर रचनाच निसर्गाने करून ठेवलेली असते. कासवासाठी मात्र आयुष्याचा पल्ला लांब असतो. त्याला ससाच्या तुलनेत फार दीर्घकाळात प्रवास पूर्ण करायचा असतो. या कथेपासून माणसाने खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्या जीवनातील काळही आता वेगवान झाल्याचे दिसून येते. ताळतंत्र सोडून सगळया गोष्टी कमी श्रमात , कमी वेळात मिळविण्याकडे आपला कल असतो. प्रत्येक पिढीत यश हस्तगत करण्याचा वेग वाढला आहे. त्यातून माणसाच्या वाटयाला काय येत आहे? तर भविष्याची चिंता, त्यातून येणारी अस्वस्थता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळत आपल्या हाती येतो शार्टकटचा मार्ग. आपल्या आजूबाजूची गतीमान होत जाणारी धावपळ आणि त्यातून आलेली अस्वस्थता याकडे आपण कधी डोळेभरून पाहतो का?
विजयकुमार राउत

गुरुवार, 31 मार्च 2016

निसर्ग, कविता आणि आपण !!


                                                                              * विजयकुमार राऊत

वितेतील लय गमाविणे म्हणजे आपल्या शुद्‌ध मनाचे तंत्र बिघडून बसणे. आपण जन्मतो तेव्हा हे तंत्र घेउनच जन्माला येतो. परंतु जसजसं आपण मोठे होत जातो.. तसे तसे मनाने खोटेही होत जातो आणि छोटेही. हळूहळू बाहेरचा गोंगाट कानात वाढत जातो. आपण आपली लयबद्‌धता हरवून बसतो. एक वेळ अशी येते की आपण स्वतःला निसर्गाच्या एकंदर व्यवहारापासून खुप दूर नेउन ठेवतो. मग कालांतराने पुन्हा सर्वसामान्य माणूस शेवटी हतबल झाल्यावर हरविलेल्याचा शोध घेण्याच्या फंदात पडून "हे' ना "ते' बरे म्हणत निसर्गाचा शोध घेण्यासाठी सहलीला जातो, देव दर्शनासाठी शेकडो किलोमिटरची यात्रा करीत तिर्थस्थळांना भेटी देतो. हे सगळे उपद्‌व्याप केले तरी त्याच्या मनाला शांती मिळत नाही. हो, फक्‍त तो इतरांना दाखविण्यासाठी शांत असल्याचं पदोपदी नाटक करीत असतो. जीवन जगण्यात व्यस्त असताना तेव्हा खूप खूप भानगडी करीत असतो. त्याला तेव्हा जीवनातील काव्याचा शोध घेण्याचं अजिबात भान नसतं. कविता म्हणजे फालतू उद्योग म्हणून तो हेटाळणी करतो. मग जीवनाच्या शक्‍तीहिन टप्प्यावर त्याला "कविते'चा किंवा अन्य कलांचा शोध लागतो. कुणी सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य कसं जाईल, याचा विचार करीत या धंदयाला जवळ करतात. त्यातील अनेक जण "रसिक' होण्याच्याच खर्चिक भानगडीत पडत नाही. कारण ते फार परिश्रमाचे असते. काही चांगल्या कविता, चांगले कवी न वाचता.. "डायरेक्‍ट' कवी होण्याची सोय असल्यामुळे कविंचं अमाप पिक समाजात वाढीला लागले आहे. मग त्यांना शब्दांची हगवण लागण्याचाच धोका अधिक असतो. या देशात एक चांगलं आहे की कवडीचं वाचन, मनन न करताही विद्‌वान होता येतं. कवितेची घसरण करण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्यामुळे वर्तमानपत्रातूनही कविता आता आपली जागा गमावून बसली आहे.
कविवर्य सुरेश भटांना "मेंदीच्या पानावर'....सारख्या अनेक कविता पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली, हे सत्य आहे. "उचलला पेन की लावला कागदाला..' आणि मग तेच रसिक या तथाकथित कविंना "सुंदर, अप्रतिम' म्हणत त्याला बिघडविण्याचा जिवघेणा खेळ खेळतात. दोघेही एकमेकांशी ठोकून देण्याचा धंदा करतात. ते कवी महाशयांच्या लक्षात येत नाही. कविता वर्तमानपत्रात छापून येण्याची लायकी नसलेलेही मग गल्लीतले एका रात्रीतून महाकवि होतात. त्यासाठी धन्यवाद "फेसबुक' आणि त्याच्या सोशल भावंडांचा.
कविता ही साधना आहे. ती तपश्‍चःर्या आहे. ती फुलत, बहरत जाण्याची अखंड प्रक्रिया आहे. तिला खूप वेळ द्यावा लागतो. त्यात संयम, समतोल, जगण्यावरचा विश्‍वास आणि सगळयात महत्वाचं की आतली लय ऐकण्याची सवय महत्वाची आहे. एक उर्दू कवि म्हणतो की....
गझल मे बंदीशे, अल्फाजही नही काफी
जिगर का खूनभी चाहिऐ असर के लिये !!
तंत्र गवसले की आपण नैसर्गिक लयीशी एकरूप होतो...निसर्गाला बनवेगीरी चालत नाही. म्हणून केशवसुत कवितेला आकाशातील विजेची उपमा देतात. लय सापडणे म्हणजे आपण आपल्याला गवसणे... बाकी कितीही लिहिले तरी त्यात काव्य नसून ती कवितेची केवळ टरफले असतात. ते असतात फक्‍त "ट' ला "ट' जोडण्याचे फालतू उद्योग ! "टाईमपास' म्हणून उचललेली लेखणी अखेर जीवनाला अर्थहिन बनविते. एकंदर आपल्या अस्तित्वाची तहान लागणे आणि त्याचा सतत ध्यास घेणे म्हणजे जीवनातील कविता शोधणे होय.......!!

                                                                                             * विजयकुमार राऊत


सोमवार, 1 फ़रवरी 2016

जग जिंकण्याऐवजी स्वतःलाच जिंका !

* विजयकुमार राऊत

जगात ज्या गोष्टी दिसतात, त्या एक दिवस संपणारच असतात. कारण त्या कालौघात नष्ट होण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. कुठलीही गोष्ट नित्य नसतेच. जगातील सगळया गोष्टी अनित्य असल्याचे भगवान बुद्‌धांनीही म्हटले होते. भौतिक यशाचेही तसेच असते. आपल्या यशाचे गणितच मोठे विचित्र असते. आपण मिळविलेले यश चुकीच्या समजूतींवर आधारित असल्यामुळे अपयशानंतर यश, पुन्हा यशानंतर अपयश अशा वर्तुळात आपल्या जीवनाचे मार्गक्रमण होत असते. स्पर्धेतून आलेले यशच प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. कारण ते मोठया कष्टानं मिळालेले असते. ते मिळविण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा कस पणाला लावलेला असतो. इतरांशी संघर्ष करीत आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले असतो. साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून विजयश्री आपल्या पायाशी लोळण घालत असते. आज तर स्पर्धा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मित्रांनो, दुस-याच्या पराभवाच्या इमारतीवर जर तुमचं यश उभं राहात असेल तर असं यश तुम्हाला आवडेल का? अनेकांच्या शारिरीक, मानसिक, भावनीक कत्तली करून मिळालेले यश मला आनंद देत असेल तर त्या यशाला काय म्हणावं? हे क्षणिक समाधान मला कायम पुरणार आहे का?

जगाच्या व्यवहारात आपण केलेली स्पर्धा स्वतःशी निकोप नसते. आपण कळत न कळत दुस-याशीच स्पर्धा करीत असतो. परंतु मित्रांनो, दुस-याशी तुलना करून स्वतःला कमी अधिक जोखू नये. ख-या अर्थानं त्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं मी माझया दुःखास कारणीभूत आहे, तसाच माझया अपयशास दुसरा कोणी जवाबदार राहू शकतो का? परंतु आपणं सगळंच अगदी विरूद्‌ध दिशेने जगत असतो. आपलं यश हे दुस-याचा पराभव करण्यावर अवलंबून असतं. म्हणून ते टिकाउ नसतं. पूर्ण काळ सुख देणारं नसतं. दुस-याला कुठल्याही स्थितीत पराभूत करून स्वतःच्या विजयाचा झेंडा मिरविणे यालाच आपण यश म्हणतो. हे यश दिखावू असतं. इतरांनी माझं वर्चस्व कबुल करावं यासाठी या यशाचा उपयोग करता येतो. या विजयाला मिरविण्यासाठी आपल्याला इतरांचं प्रमाणपत्र लागतं. दुस-याचा पराभव करणे म्हणजे एक प्रकारची मानसिक हिंसाच असते, हे सांगतं ते अध्यात्म. जगज्जेता सिकंदर, हिटलर किंवा सम्राट अशोकाचे काय झाले? यांनी तर अमाप यश संपादीत केले होतं ना ! परंतु शेवटच्या क्षणी अख्खं विश्‍व जिंकूनही ते पराभूत का झाले? कारण त्यांच्या यशापयशाच्या संकल्पनाच मुळात नैसगिक नव्हत्या. त्या एकंदर मानवतेच्या विरोधात होत्या.

चिनी तत्वज्ञ लाओत्सेला कुणीतरी विचारलं की, आपण नेहमीच म्हणता की कोणीच मला हरवू शकत नाही. ते कसं काय? यावर लाओत्सने उत्तर दिलं की मला कुणीच शेवटपर्यंत हरवूच शकत नाही. कारण मी कुणाशीच स्पर्धा करत नाही. मी अशा ठिकणी बसतो की जेथून मला कोणी उठ म्हणत नाही. त्यामुळे कुणालाच अडचण होत नाही आणि मी माझया जागेवर कायम असतो.

आपण अध्यात्माला धार्मिकतेच्या जोखडात बंद केलं असल्यामुळे चुकीच्या संकल्पना तयार होत गेल्या. या जगात अध्यात्म हे माझयासाठी नाहीच, असं ठाम मत बनतं. भगव्‌तगीता, महाभारत किंवा ज्ञानेश्‍वरी, वेद-उपनिषद आदी ग्रंथ हे केवळ पुजेसाठी नसतात. त्या ग्रंथातून जगण्यातील सर्व तत्वज्ञान मांडलेलं असतं. मानवतेचं दिशादिग्दर्शन त्यात मिळतं. परंतु आपण प्रतिकांत अडखळतो. म्हणून तर आपण सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. "आय विल चेंज, डे बाय डे' असं म्हणत कालच्यापेक्षा आज मी किती उत्तम झालो, हे सांगायला दुस-याची गरज नसते. तिथे आपणच न्यायालय असतो आणि आपणच आरोपी. आज मिळालेल्या भौतिक यशाच्या मिरवणूकीचा बाज जर लोकांच्या नजरेत भरणारा असला तरी हा बाज आपला माज उतरवून केव्हा बर्बाद करेल हे सांगता येत नाही. कारण सृष्टीचा नियमच परिवर्तनाचा असतो. आज आहे ते उद्या नाही. जीवन एका वर्तुळाकार गतीने चालत असते. कधी पाण्यावर नाव तर कधी नावेत पाणी, असं वर्तुळ नको असेल तर स्पर्धेची दिशा बदलायला हवी. स्पर्धा बहिर्गम असली तर ती एक दिवस अपयशात परिवर्तीत होणारच. इतरांच्या नजरेत भरणारं यश हे एक दिवस संपणारच.. मग सदासर्वकाळ तुम्हाला यश हवं असेल तर अंतर्मुख होउन स्वतःशी स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. मग मनावर विजय मिळविणा-या यशस्वी माणसाचे यश कधी कुणाला दिसणारं नसतं. कारण ते पाहण्याइतकी सर्वांची दृष्टी परिपक्‍व झालेली नसते...त्या यशाला कधीच मरणही येत नाही.

                                       * विजयकुमार राऊत


 
Blogger Templates