Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 1 जुलाई 2015

दृष्टीदोष


                                                                                                 * विजयकुमार राऊत
दैनंदिन जीवनात पावलोपावली निखळ आनंदापासून आपणा स्वतःला कोसो दूर ठेवित असतो. केवळ आपण आपल्या दृष्टीची व्यापकता जर रूंद केली नाही तर त्या वस्तूपासून मिळणा-या आनंदालाही आपण खरे तर पारखे होउन बसतो. वस्तू निसर्गतः जशी आहे तसे पाहणे म्हणजे त्याला दृष्टी प्राप्त करणे म्हणता येईल. उर्दू साहित्यात याला "नजर पैदा' करणे असे म्हणतात. जगभरातील महापुरूषांनी ही नजर मिळविण्यासाठी आपल्याला अनेकदा सचेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा विशाल समुद्र पाहिला तेव्हाची अनुभूती पुन्हा दुस-यांदा येईलच असे नाही.
इंद्रिये यांत्रिक होत गेलीत की आपली नजरही संवेदनशिलता गमावून बसते. जे आहे अगदी तशीच अनुभूती घेता आली तर त्या वस्तुतील आनंद अवर्णणीय असतो. आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन हा अवतीभवतीच्या पूर्व संस्कारातून तयार झालेला असतो. आपण दैनंदिन जीवनात कुठलेही काम करीत असताना जो यांत्रिकपणा येतो, त्यामुळेच मनुष्य दुःखाला जवळ करून सर्वस्व गमावून बसतो.
आपल्याला कुठल्याही वस्तूवर आपल्या मतेमतांराचे खोटे शिक्‍के मारण्याची सवय झालेली असते. हे शिक्‍के त्या व्यक्‍तीबद्‌दलच्या असणा-या स्मृतितून निर्माण झालेले असतात. ही बाब समजून घेण्याकरीता एका साध्या गोष्टीचे उदाहरण देतो. केदारनाथला आलेला प्रलय. ही घटना साधी नैसर्गिक आहे. ती जशी आहे तसे तिच्याकडे पाहणे म्हणजे सत्याचे ज्ञान करून घेणे होय. परंतु आपल्यावर संस्काराने दिलेल्या चष्म्यातून आपण त्या घटनेकडे पाहिले तर आपण सत्यापासून दूर जात असल्याचे कळते. बद्रीनाथ-केदारनाथच्या दुर्घटनेत हजारो नागरिक वाहून गेले. फार मोठया प्रमाणात नुकसान झाले. परंतु या घटनेकडे पाहणारे मात्र आपले वेगवेगळे दृष्टीकोन व्यक्‍त करताना दिसतात. कोणी म्हणतात केदारनाथसारख्या तिर्थस्थळी भाविकांना आलेले मरण ही देवाची मर्जी असल्यामुळे त्यांचे जीवन कृत्य झाले. दुसरा एखादा म्हणतो, दुनियेत पाप फार वाढलं होतं ते साफ झालं. तिसरा या दुर्घटनेतून सुखरूप बचावणारा देवाच्या कृपेचे गुणगाण करीत असतो. देवाच्या कृपेने वाचल्याचा आनंद व्यक्‍त करताना तो पुुन्हा एक अंधश्रद्‌धा निर्माण करतो. आता सांगा कोण खरा आणि कोण खोटा ? कारण निसर्गनियमानुसार ही घटना ही नैसर्गिक आपत्तीच होती. त्यासाठी बव्हंशी माणूसच जवाबदार आहे. अशा घटना घडणे पृथ्वीतलावर सतत सुरूच असते.अशा घटनेत आपण देवाला मध्ये आणून आपले समाधानच करीत असतो की नाही? मला सुप्रसिद्‌ध साहित्यीक यशवंत मनोहर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं एक वाक्‍य आठवते. निसर्ग हा असाही नसतो किंवा तसाही नसतो. तो केवळ असतो, हेच सत्य आहे. आपण मात्र निसर्गाला दयाळू, कृर असे संबोधून त्याच्यावर उगाच आरोप किंवा त्याचे गुणगाण गात बसतो. आरोप केल्याने त्याचा राग आपण ओढवून घेत नसतो किंवा गुणगाण केल्याने तो आपल्यावर फार प्रसन्न होतो असेही नाही. आपण मात्र माणसाचे गुण निसर्गावर उगीच लादत असतो. कारण सत्य स्वीकारणे आपल्याला झेपत नाही किंवा तशी दृष्टीच आपल्याला अवगत झालेली नसते. जीवन जगत असताना निसर्गाच्या हातात हात घालूनच स्वतःचा सर्वांगिण विकास साधत जगणेच केवळ आपल्या हातात उरते. चीनमधील "ताओ' धर्मही हेच सांगतो.
पृथ्वी सुर्याभोवती फिरत असल्याचा कधीकाळी आपल्याला भास व्हायचा. मात्र गॅलिलिओंने फक्‍त एका तर्काच्या आधारे आपला समज साफ चुकीचा असल्याचे नाही का सिद्‌ध केले? पृथ्वी सपाट असल्याचे दाखले धर्मग्रंथांच्या पानापानावर दिसतात. पृथ्वी या ग्रहाबद्‌दल किती किती गैरसमज होते म्हणून सांगावे ! ही पृथ्वी शेषनागाच्या पाठीवर असल्याचे कधीकाळी सांगण्यात यायचे. परंतु आजच्या प्रगत विज्ञानाने हे साफ चुकीचे असल्याचे सिद्‌ध केले. असे अनेक गैरसमज काळाच्या कसोटीवर फोल सिद्‌ध झालेले आहेत .
समाजात एखादया व्यक्‍तीच्या बाबतीतही असेच अनुभवायला मिळते. अमुक व्यक्‍ती धार्मिक अन्‌ तुमक व्यक्‍ती अधार्मिक अशी धारणा करून आपण त्या व्यक्‍तीला पूर्णपणे जाणण्यापासून दूर ठेवतो. खरे तर व्यक्‍ती जशी आहे तसे स्वीकारणे आपल्या व्यवहारात परडण्यासारखे नसतेच.शब्दही मानवाने निर्माण केलेले असता आणि अर्थही. आणि म्हणूनच एका टप्प्यावर आपल्याला जग अर्थहिन वाटायला लागतं.
                                                                         * विजयकुमार राऊत
                                                                                8888876462


रविवार, 28 जून 2015

माणूस नावाच्या गाढवाची गोष्ट




गाढव हा प्राणी अगदी प्रामाणिक असतो, यात मला तिळमात्र शंका नाही. बिचारा मालकाने सांगीतलेली सगळी कामे तो बिनबोभाटपणे पार पाडित असतो. मालक जे देईल, जेवढे आणि जेव्हा देईल तेवढयावरच तो समाधानी होउन उपजिवीका चालवित असतो. त्यामुळे मला पूर्वीपासून तो खूप आवडतो. "ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असु द्यावे समाधान' या तुकारामाच्या अभंगाप्रमाणे तो कसलीच चिंता बाळगत नाही. याविषयी कुणाकडे साधी तो तक्रारही करत नाही. कुणाविषयी काय तक्रार करावी आणि कशासाठी, म्हणून तो प्राक्‍तनावर रडत न बसता मुकाटपणे रवंथ करीत बसतो. मानवजात मात्र फार हुशार. एखादयाला शिव्या देताना "तू गाढव आहेस' असं म्हणून तो गाढवाचाच उपमर्द करीत असतो. माणसाने मात्र इतर प्राण्यांपेक्षा शहाणा म्हणवून घेण्याचा ठेका घेतला आहे की काय? गाढवाने गाढव जरूर असावे. पण मुर्ख असू नये, असा माणसाच्या बोलण्याचा मतितार्थ असावा कदाचित. सर्वांशी प्रामाणिक राहणे, कृतज्ञ राहणे किंवा एखादयाने कितीही शोषण केले तरी त्याने त्याविरोधात "ब्र'ही काढू नये, याला गाढव नाही तर काय म्हणावे? असे आपल्याला कधीतरी वाटतं.
संसाराचे रहाटगाडगे सांभाळताना आपण गाढवासारखं रात्रंदिवस धाव धावत सुटतो. माझं घर, पत्नी, मुलं, माझे ऑफिस, माझे बॉस आणि माझया नात्यातली माणसं असं एकंदर परिघातच गाढवं धावत राहतात. तर एकंदरीत आपणही गाढवच असतो म्हणाना. नाईलाजास्तव अगतिकपणे कर्म करीत असताना अवतीभवतीची माणसं हेच माझे सिमीत विश्‍व होउन बसते. त्यांची स्वप्ने, आशा आकांक्षा पूर्ण करणे, हेच माझं जीवन असतं. अगदी उर फुटेस्तोवर मी धापा टाकीत धावत असतो. रिटायर्ड झाल्यानंतरही माणसाला कुठलातरी उद्योग हवा असतो. कारण खाली डोकं त्याच्यासाठी "सैतान का घरच' असते. पण गाढव जातीला कोण सांगणार की सैतानाचं घर कधीकाळी स्वतःपर्यंत पोहचण्याचा मार्ग असतो. भगवत्‌गीतेत सांगीतल्याप्रमाणे माणसापेक्षा गाढवंच जास्त कर्मयोग पार पाडीत असतात. कारण त्याला आपण केलेल्या कर्माची खंत किंवा अभिमान मुळीच नसतो. मग त्याला गाढव का बरं म्हणावं? हेच कळत नाही. माझ्याशी दुस-याने प्रामाणिक राहावे; पण मी मात्र प्रामाणिक असू नये, हेच तत्वज्ञान माणसाने स्वीकारले आहे.
मित्रांनो, गाढव कधीच विद्रोह किंवा बंड करून उठल्याचे माझ्या ऐकीवात नाही. कुठल्याच गाढवाने आतापर्यंत क्रांती केल्याचं मी पाहिलं नाही. आपण भलं आणि आपलं काम बरं, या विचारातच गाढव जगत असतात. कुठल्याच गोष्टीत न पडता नाकासमोर चालणे हेच त्याला माहित असतं. म्हणून तो कसलाही उपद्‌व्याप न करता आयुष्य कंठत असतो बरं का ! एक गाढव म्हातारा झाला की तो आपल्या मुलालाही गाढवांची संस्कृती, परंपरा शिकवून जातो. आपल्या बिरादरीत वागण्याचे नियम शिकवतो. समाजाचे नितीनियम तोडून स्वतंत्र प्रतिभाशाली होउन जगणे त्याच्या शब्दकोषात नसतंच.
आपल्या कोषातून जरा बाहेर पडलो की समाजात वावरणा-या सामाजिक गाढवांची स्थितीही अगदी तशीच. सदयाच्या काळात ही गाढवं समाजात जिकडे तिकडे पहायला मिळतात. यांची संख्या खूप मोठी असते. हे गाढवं संख्येने "बहुजन' असल्यामुळे त्यांचे कळप तयार होतात. या कळपातून तो राजकारण, समाजकारण, धर्मकारण खेळण्याचा छंद पूर्ण करतो. गाढव स्वतः राजकारण खेळत नसले तरी राजकारणातील प्यादे म्हणून राबणे त्यांना जास्तच प्रिय असतं. म्हणून त्यांचा कुणीतरी धुर्त कोल्हा हा "गॉडफादर' असतो. त्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून अनुकरण करण्यातच गाढव धन्यता मानित असतो. "अच्छे दिन है आनेवाले ' अशी बतावणी केली की गाढवं "गाढवराज्य' येणार असल्याच्या अविर्भावात नाचायला लागतात. गाढवांचं समाजकारण फार मजेदार असतं. गाढवांचा गॉडफादर गाढवा गाढवात वाटणी करून देतो. त्याप्रमाणे तो मग आपापल्या जातीची संस्था अस्तित्वात आणतो. गाढवं "समाजभूषण' होतात. गाढवांना "हिप्नोटाईझ' करणं खूप सोप्पं काम आहे. त्याला "च्युत्या' बनविण्यापेक्षा तोच च्युत्या बनून जात असतो, हा त्याचा नैसर्गिक गुणधर्मच म्हणाना! तो पळून दुसरीकडे जाउ नये म्हणून त्याचा मालक त्याच्या गळयाभोवती पास बांधल्याचा नुसताच भास निर्माण करतो. गाढवंही अगदी तेच खरं मानून बांधल्या ठिकाणीच गपचिप पडून राहतं. समाजाच्या हितासाठी लढण्याचं नाटक करून लबाड कोल्हा मात्र गाढवाचा सम्राट होउन मलिंदा खात असतो. त्यांचं समाजकारण आणि समाज म्हणजे प्रत्येक गटात विभागली गेलेली त्याची जात. गाढवांना त्यांच्या स्वतःच्या धर्माचा फार अभिमान वाटत असतो. "गर्व से कहो' चा नारा देत आपल्या घोग-या कर्णकर्कश स्वरकंठातून तो धार्मिक "जिहाद' पुकारतो. धर्मसंकटात आला म्हणून तो इतर गाढवांना जागे करण्याचा प्रयत्न करीत असतो. गाढवासारखा धार्मिक या पृथ्वीतलावर दुसरा कुणी सापडणार नाही. त्याचा धर्मही सामूहिक असतो. कारण त्याला जगण्यासाठी कुठला तरी आधार हवा असतो. धर्माप्रमाणे वागलंच पाहिजे नाहीतर गाढवांचा धर्म संकटात सापडतो, असा त्याचा दृढ समज असतो. मग गाढवांची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी गाढवंच गाढवांशी लढत असतात. गाढवंच गाढवांसाठी धर्माच्या नावावर एकमेकांचं रक्‍त सांडतात. गाढवांचे सरकार गाढवांच्या हितासाठी जाहिरनामा तयार करून आम्ही तुमचे तारणहार आहोत, असं भासवून "सुखेनैव संसार' करीत असतात. म्हणून या गाढवांच्या दुनियेत कुण्याही मुर्खाने शहाणा होण्याचा प्रयत्न करू नये ! इति गाढवपुराण !!
                                                                               विजयकुमार राऊत

बुधवार, 17 जून 2015

शास्त्र काटयाची कसोैटी !


                                                        विजयकुमार राऊत
भाषेला असंख्य पैलू असतात. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. अर्थ काढणारा आपल्या सोयीने किंवा त्याच्या मनःस्थितीप्रमाणे समजून बोलून जातो. भाषेचा किंवा शब्दांचा वापर करताना बोलणारा नुसताच शब्द उच्चारित नसतो. तर तो त्यात आपल्या भावना ओतत असतो. भावना किंवा संवेदनाच त्याला बोलतं करीत असतात. पण बोलणारा भावना व्यक्‍त करीत असताना त्याच्या बोलण्याशी ऐकणारा सहमत होईलच असं नाही. कारण नुसतं शब्दांपुरतं बोलायचं झालं तर ते कुठल्या मनःस्थितीतून आले किंवा ऐकणा-याची भावस्थिती काय आहे,यावर सगळं समजणं न समजनं अवलंबून असतं.
म्हणूनच कवी मर्ढेकर म्हणतात की
भावनेला येउ देगा
शास्त्र काटयाची कसोटी !
भाषेचा जन्मच आपले विचार किंवा भावना पोहचविण्यासाठी झालेला असला तरी तिचा हेतू मात्र बव्हंशी साध्य होतोच, असं नाही. कारण आज समाजात व्यक्‍तीपरत्वे वाद निर्माण होण्याचं दुसरं तिसरं कारण कुठलं नसून ही मुळात भाषाच प्रामुख्याने वाद विवादाची जननी आहे, हे अनेक घटनांवरून सिद्‌ध होतं. ज्या भाषेनं सुसंवाद व्हायला हवा त्याच भाषेमुळे विसंवाद निर्माण होत आहेत. आज शब्द नर्मदेतील गोटयांप्रमाणे गुळगुळीत झाले आहेत. त्याचा व्यवहारात सर्रास वापर करीत असताना त्याचे कांगोरे नष्ट होत आहेत. म्हणून जो भाव बोलणा-याच्या शब्दांत येत असतो, तोच भाव ऐकणा-यांपर्यंत तसाच्या तसा जाईल याची शाश्‍वती नसते. शब्दांत सत्य सापडतच नाही. संधी साधू लोक समाजात भाषेचा जेव्हा स्वार्थ आणि हित साधण्यासाठी वापर करतात तेव्हा भाषाच सर्वाधिक भ्रष्ट होते. मग समाजातील नव्याने उदयास येणा-या पिढीस जुनी भाषा गुळगुळीत वाटायला लागते. नवीन पिढी भाषेपासून दूर जायला लागते. असं का व्हावं, याचं चिंतन आपल्याकडे फारसं होत नाही. ज्या भाषेच्या बळावर गेल्या अनेक पिढया पोसल्या गेल्यात, ज्या भाषेचं दूध पिउन त्या पिढयांचं संवर्धन झालं, तिच भाषा नवीन पिढीला सशक्‍त का वाटंत नाही? यासारखे प्रश्‍न भाषेच्या अभ्यासकांना पडत असतात. थोडा गंभीर विचार करून या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तर याचं उत्तर कदाचित सापडू शकेल.
कधी कधी मौनाचा उपयोग केला तर जे बोलायचं आहे जे सांगायचं आहे त्याची उत्तरं मिळतात. परंतु ही झाली माणसाच्या अत्युच्च अध्यात्मिक पायरीवरील बाब. मौनाचा उपयोग व्यवहारी माणसाने केला तर हेच मौन त्याच्यासाठी योग्य ठरणार नाही.

                                                   विजयकुमार राऊत

 
Blogger Templates