Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 27 मई 2015

वेदना

                           * विजयकुमार राउत  
फक्‍त माझ्या भावनांशी भेद झाला
मात्र त्यांच्या वेदनेचा वेद झाला !

मी उगा आलो तयांच्या पंगतीला
हाच मजला जिंदगीभर खेद झाला

केवढी ही शांतता होती सभोती !
हा कशाचा एवढा उद्रेक झाला !

मी इथे, तो धावतो वा-याप्रमाणे
काय रे,
वेडया मनाचा वेग झाला!

हा उन्हाळा तापला ऐसा अघोरी !
आणि माझ्या आसवांचा मेघ झाला!





                            * विजयकुमार राउत

सोमवार, 25 मई 2015

शस्त्रक्रिया !

शस्त्रक्रिया !

                                             * विजयकुमार राऊत

काळजाला फाडण्याची मस्त क्रिया चालली
आमुच्या संवेदनांची शस्त्रक्रिया चालली !!

चाचण्या खोटया निघाल्या,उपचार खोटेही तसे
जिंदगी हिसकावण्याची भ्रष्ट क्रिया चालली !!

कोठुनी संसर्ग आला?कोणता आजार हा?
माणसांना तोडण्याची दुष्ट क्रिया चालली !!

स्वर्ग या वस्तीत आणू? या छताला चांदणे!
कोरडया आश्‍वासनांची शब्द क्रिया चालली !!


शेवटी कोणी न आले, सांत्वनाला एकदा
ही कुणाला हासण्याची स्वस्त क्रिया चालली ?

जिंदगानी शाप ज्याला वाटली होती कधी
केवढी थाटात त्याची अंत्यक्रिया चालली !
Vraut90@yahoo.com



गुरुवार, 21 मई 2015

वेगळा



कोण कापून गेला मुळावेगळा !
मला वेगळा नी तुला वेगळा !!

केलीस कारे अशी वाटणी?
शिरापासुनी मी धडावेगळा ! 


तुझ्या रक्षणाला इथे कोण रे?
हाय, काटाच केला फुलावेगळा !!

कशाला
तुझ्या आज पंक्‍तित मी ?
हा मी असू दे बरा वेगळा !

तुझे शल्य जाणू तरी मी कसा?
इथे दूर आहे घरावेगळा !!

कशाला हवा मी कुणासारखा ?
जरा मीच आहे जगावेगळा !

                                          *विजयकुमार राउत                                 
 
Blogger Templates