Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 22 जनवरी 2015

कुणाचा ना वाद कुणाशीही...


खरं तर माझे आणि तुकारामाचे कधी कुठल्याच प्रकारचे भांडण नव्हतेच, ना आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचिला आणि "तुका झालासे कळस' इथपर्यंत माझं काहीही म्हणणं नाही. "निंदकाचे घर असावे शेजारी' असं तुकोबा रायाच एका ठिकाणी म्हणतात. म्हणून मीही त्यांचीच निंदा करतो असे समजू नये. परंतु सगळं गोड गोड वाटावं असंही मला बोलायचं नाही. खरं तर मला माझं म्हणणं मांडण्याचाही अधिकार थोडाफार तरी तुमच्या अभंगाचा अभ्यासक या नात्याने किंवा तुमच्याबद्‌दल आपुलकी वाटत असल्याने आहे. संत तुकाराम महाराज हे साधेसुधे संत नव्हते. म्हणूनच तर तुकोबांचे अभंग विरोधकांनी इंद्रायणीत बुडवूनसुद्‌धा काळाच्या कसोटीवर उतरलेच ना ! वारकरी संप्रदायापासून तर अवघ्या मराठी सारस्वतांत तुकारामांच्या अभंगाचे दाखले दिल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीत.
आपलाची वाद आपणासी !
माणूस नावाचा प्राणी अजब रसायण आहे बुवा. आयुष्यभर तो कुणा ना कुणाशी भांडत असतोच. हे त्याचं भांडण कुण्या एकटयाशी नसतंच. अहो, स्पर्धेशिवाय काय शिकविल्या जाते या जगात? आता तर ही स्पर्धा अधिकच वाढत चालली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं घोडा होउन सैरभैर धावत सुटायचं. अशा वेळी दुस-याचं सुख पाहून आपणही मनात दुस-याशी स्पर्धा करायला लागतो. त्यामुळे कळत नकळत आपण दुस-यांच्या सुखावर अंतर्बाहय जळून उठतो. त्याही पुढे जाण्याचा भाव मनात ठेवून आयुष्यभर आपणच लावलेल्या आगीत जळत जातो. इतरांशी भांडण योग्य नव्हे, असं संतसुद्‌धा सांगतात, म्हणून आपण आपल्याशीच भांडण उकरत बसायचं? बरं तर आपलाच स्पर्धक आपण राहून पहिल्यासारखीच परिस्थिती ओढवून घेतो. कारण पहिल्या प्रकारात आपल्या भांडणाचं कारण "दुसरा' कोणी होता. आता मात्र "आपण'च आपले वैरी होउन बसतो. बाहेरचा वैरी एकदा परवडला. आतमध्ये तर असे शेकडो वैरी तुमच्याशी विणाकारण भांडायला तयार असतात. त्यात ज्या व्याध्या लागायच्या आपल्यालाच लागतात. परंतु तुम्हीच सांगा हो, तुकोबा... खरंच भांडून कुणाचं काही भलं झालंय का? हे तुम्हालाही चांगलंच माहित होतं. म्हणूनच तर तुम्ही म्हणता की "आपलाची वाद आपणाशी'.... आता मला सांगा तुकोबा... माणसाला परमेश्‍वराची साधना करीत असताना त्याचं मन कसं पाण्यासारखं नितळ असावं लागतं. ईश्‍वर किंवा आनंदप्राप्तीच्या दिशेने निघालेला माणूस शेवटी कसा असावा, हे गीतेत सांगीतले आहेच. तेव्हा तुमचे "आपलाच वाद आपणाशी' हे काही पटत नाही बुवा!
अहो, चैतन्याच्या दिशेने एकेक पायरी वर चढत असताना माणसाचं स्वतःशीही भांडण योग्य नसतं. कारण बाहेरच्या जगाशी असलेलं भांडण संपलं तरी माणूस पर्याय शोधत असतो. बाहेर हिंसा सोडली आणि आत मनाने मी हिंसाच करत गेलो, तर चालणार आहे का? म्हणून मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "आपुलाची वाद'म्हटले म्हणजे पुन्हा वाद निर्माण झाला की ! "आपलाच वाद आपल्याशी' घालून पुन्हा सर्वसामान्यांसारखे द्वैत निर्माण करणे हे पटण्यासारखे नाहीच. या सृष्टीत दिसणारे द्वैत हे परस्पर विरोधी नाहीच. शेवटी अद्वैत विचार ठेवूनच एकंदर सृष्टीला समजून घ्यावे लागते. दिसणा-या दोन गोष्टी विरोधाभासी असल्यातरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हे माझयासारख्यांने सांगणे म्हणजे सुर्याला आरसा दाखविण्यासारखे आहे. तुकोबा, तुम्ही तर शब्दांचे श्रीमंत. तुमचे अभंग वाचताना एक अनामिक उर्जा संचारते आमच्या अंगात. पंढरीच्या सावळया विठ्‌ठलावरील भक्‍तीने मनाची चंद्रभागा दुथडी भरून वाहायला लागते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने'
पण खरं सांगू का तुकोबा? शब्द हे दुनियेला आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी वापरलेले एक व्यवहाराचे साधन आहे. साधनाला साध्य समजू नये, याचं भान तुमच्याकडून सुटलं असेल, असं अजिबात म्हणता येणार नाही. तुकोबा शेवटी तुम्ही आम्हा कविंसारखे शब्दांचे पुजारी थोडीच होते?
कविवर्य मर्ढेकर तर "आशयाचा तुच स्वामी... शब्दावाही मी भिकारी' असं निःसंकोच कबुल करून टाकतात. शेवटी शब्दांतून सत्य सांगणे कठीणच, तुकारामा. पकडायला जावं तर हातून पा-यासारखं निसटतं. म्हणून शब्दांपेक्षा मौनच उत्तम म्हणून या विश्‍वातल्या सगळया महात्म्यांनी स्वीकारल्याचं तुम्ही जाणत असालंच. तुकोबा तुमचा पुन्हा "मना'वरचा तो अभंग आम्हाला पुन्हा आशयाच्या चक्रव्यूहात सोडून जातो.
"मन करारे प्रसन्न, सर्व सिद्‌धीचे कारण'
बहिणाबाई बरोबर मनाला उभ्या पिकातलं ढोर म्हणून हिणवितात. ईश्‍वरापर्यंत जाण्यासाठी शेवटी मनालाही सोडून द्यावं लागतं, तुकोबा ! माझयासारख्या पामरानं तुम्हाला हे सांगणं म्हणजे फारच झालं..बुवा !

                              विजयकुमार राउत

शुक्रवार, 9 जनवरी 2015

पाखरांचे थवे




घाव झाले जुने, वार ताजे हवे
वेदनेला फुटावे घुमारे नवे

हाक मारून माघार घेतील का?
दूर गेलेत जे पाखरांचे थवे

काल जे तू दिले तेच सांभाळतो
आज डोळयांत माझया तुझी आसवे

फौज घेउन सारे निघाले कसे
सूर्य झाकायला जसे काजवे!

काय लाचार ही जाहली जिंदगी
काय आयुष्य हे फाटके नागवे!!

आठवांना जरी टाळले मी तरी
तेच तेच सारखे पुन्हा आठवे!

सुखाची कशाला करू याचना?
दुःख गाते सदा गीत माझयासवे
                                                   विजयकुमार राउत
                                                    vraut90@yahoo.com

दावणीला बांधलेले....


कैकदा आले रूतू पण वांझ गेले
दुःख हे माझे बिचारे गांजलेले

कत्तली करतील ते सोयीप्रमाणे-
शब्द त्यांच्या दावणीला बांधलेले

मोकळे आकाश तू जेव्हा दिले
मुक्‍त झाले श्‍वास माझे कोंडलेले

वादळाने कालच्या उद्‌ध्वस्त केले-
खेळ अपुले वाळवंटी मांडलेले

पेरले होते जिथे मी स्वप्न माझे
ऐनवेळी शेत सारे बांड गेले

इतिहासही "त्यांचेच' गातो गोडवे
व्यर्थ गेले रक्‍त माझे सांडलेले

येथे जरी मी दूर तुजपासूनी-
"त्या' तिथे काळीज माझे टांगलेले

                                                                   विजयकुमार राउत
                                                                     vraut90@yahoo.com
 
Blogger Templates