Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 31 दिसंबर 2014

"एक्‍सपायरी डेट'

                                                                                                    -विजयकुमार राउत

ज्याचा त्याचा एक धर्म असतो. त्या धर्माप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा धर्माचे आडंबर माजवून एक प्रकारचं धार्मिकतेचे सोंग आणण्याचा प्रयत्न करून समाजात हाच खरा धर्म असे पसरविले जाते. सर्वसामान्य माणूस कर्मकांडाच्या कचाटयात सापडतो. संत तुकारामापासून कबिरापर्यंत सगळयांनीच बाहय कर्मकांडाला फार पोटतिकडीने विरोध केला. तरी समाजात दिखावूपणाच अधिक दिमाखदार पद्‌धतीने समाजात वावरत आहे. एकमेकांना एकमेकांपासून तोडणारा कुठलाच धर्म हा पृथ्वीच्या पाठीवर नाही. अब्राहम लिंकनचे एक वचन आठवते.ते म्हणतात की "i do good i fill good - i do bad i fill bad' पाण्याचा धर्म तहान भागविणे, वृक्षाचा धर्म सावली देणे हाच असतो. दुसरा कुठलाच धर्म असू शकत नाही. सगळयांच्या जगण्याचे सार कशात आहे? सगळे जगतात फक्‍त निरामय आनंदासाठी. आणि तो आहे फक्‍त आपल्यातच. आपण आयुष्यभर आपला धर्म किंवा परमेश्‍वर हा केवळ बाहेरच शोधतो. आनंदी राहायचं असेल तर दुस-याचा आनंद हिरावून न घेता एक आनंदमय जिवन जगलं पाहिजे. मग संत ज्ञानेश्‍वरांना आला तसा आनंद आपल्यालाही प्राप्त होतो. "आनंदाचे डोही आनंद तरंग' चा प्रत्यय क्षणोक्षणी यायला लागतो. या देशात धर्मासाठी काय काय झालं नाही? सगळे लढे धर्म आणि सत्ता संघर्षासाठी निर्माण झालेले आहेत. फाळणीचं दुःख झेललेले कविवर्य गुलजार तर या भयानक दुःखाचे नुसते साक्षीदार नव्हे तर भागीदारसुद्‌धा आहे. ही जखमी कशी चिघळत जाते याचा कटू अनुभव त्यांनी घेतला. मार्क्‍स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे. ती माणसाला सतत गुंगीत ठेवते. ही गुंगी चढविण्याचे काम राजकारणी करीत असतात.
देशात सदया धर्मांतराचे वारे जोरात वाहायला लागलेले आहेत. धर्म हा "एक्‍सपायर' झाला, असं कुणी म्हणलं तर मोठे वादळ उठते. त्यामागील अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. तथाकथीत धर्म ज्या कार्यासाठी निर्माण झालेला आहे, त्यामुळे कोणताही हेतू साध्य होत नसल्यामुळे तो आता "एक्‍सपायर' झाला, असे मानण्यातच शहाणपण आहे. जर्मन विचारवंत नित्से जेव्हा "देव' या संकल्पनेवर आघात करताना म्हणतो की देवांना आता देव्हा-यातून हद्‌दपार केले तर बरं होईल. डॉ.श्रीराम लागू म्हणतात की देवाला आता "रिटायर्ड'च केले पाहिजे. यामागे एकच अर्थ आहे. जि प्रतिकं , ज्या संकल्पना आता कालबाहय झाल्या आहेत, त्यांना विशाल अंतःकरणाने मुठमाती दिली तरच मानवाचा भविष्यकाल उजळू शकतो. कारण परिवर्तन हाच शाश्‍वत नियम आहे. धर्माचे मढे किंवा देवाचे भूत किती दिवस पाठीवर बाळगणार आहोत? हिंदू असो वा मुस्लीम . कट्‌टरता ही धर्माला पोषक असूच शकत नाही. कट्‌टरता ही फक्‍त कोत्या मनाचे निदर्शक होउ शकते. वाद विवादाने कुठलेच प्रश्‍न संपत नाहीत. आणि खरं म्हणजे महापुरूषांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच कुठलाही "वाद' सुरू करण्यात अनुयायीच पटाईत असतात.
हिंदू धर्मातील कट्‌टर पंथियांनी "घर वापसी' अभियान फार जोरकसपणे राबविणे सुरू केले. आपली विचारसरणी जनमानसात दृढ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या हाती सत्तेची सुत्र असावी लागतात. एकदा हाती सत्ता आली की आपले जाहिरनामे राबविण्यात पुढाकार घेतला जातो. तिचा पाहिजे तसा वापर करता येतो. प्रतिके श्रद्‌धेची जागा घेतात. जुना इतिहास आपल्या पद्‌धतीने बदलविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होतो. एकप्रकारे जुन्या कर्मकांडाच्या जागी नवीन कर्मकांडे उपस्थित केली जातात. "गर्व से कहो हम..'च्या गर्जना घुमायला लागतात. किंवा एखादया अधार्मिक विचाराबद्‌दल "जिहाद' पुकारला जातो. अभिव्यक्‍ती स्वातंत्रयावर वारंवार हल्ले होतात. चित्रपटांची पोष्टर फाडून सिनेमा बंद पाडल्या जातो. "नत्थूराम'चे दैवतीकरण केल्या जाते. त्याच्या नावातही "राम' दिसायला लागतो. मग त्याची मंदिरे उभी करण्याचा विचार व्यक्‍त केला जातो."मंदिर वही बनायेंगे'चा निर्धार केला जातो. संपूर्ण विश्‍वच भगवे करण्याचा संकल्प केल्या जातो. परदेशाचे दौरे आयोजित करून भगवतगीता भेट देण्याचे प्रयोग होतात. जापानमधील तथागत बुद्‌धांच्या मूर्तीऐवजी कमळ पुष्पाचे गुणगाण मुक्‍त कंठाने केले जाते. कारण ते त्यांच्या पक्षाचं चिन्हं असतं. राष्ट्राचा ग्रंथ म्हणून भगवत गीतेला स्थान देण्याचा विचार सोडल्या जातो. "हमको वोट देनेवाले देशभक्‍त और जिन्होने को वोट नही दिया वो देशद्रोही' संबोधण्यात येतो. त्यापेक्षा थोडे पुढे जाउन " या देशात "राम'जादयांनाच राहण्याचा अधिकार आहे "हराम'जादयांना नाही' असे ठणकावून सांगीतले जाते. गंगा ही तर हिंदूची पवित्र नदी. माताच ती ! म्हणून निवडणुक झाल्यानंतर तिची महाआरती करण्याच्या अनुपम सोहळयाचे टिव्हीच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. यात मात्र ख-या धर्माची कुठे हत्या केली जाते ,हे या देशातील सर्वसामान्य माणसाला कळतही नाही. "ओ माय गॉड' किंवा "पिके' यासारख्या चित्रपटांतून धार्मिकतेवर प्रहार केले जातात तेव्हा त्यांवर टिकेची झोड उठविली जाते. या धर्ममांतर्डांच्या विरोधात कुणी तोंड उघडले तर त्याचे मुस्काट फुटणे आलेच. जर त्याने प्रबोधनाचे कार्य सोडले नाही तर त्यांला "वैकुंठा'ला पोचविण्यासाठी त्यांचे खास "पुष्पक' विमान तयारच असते. अंधश्रद्‌धेच्या विरोधात आवाज उचलणा-यांचा शेवटी दाभोळकरच होतो, हे सांगणे न लगे.
                                                                                                  

                                                                                            -विजयकुमार राउत

गुरुवार, 25 दिसंबर 2014

अनिष्ठ ते इस्ट


                                                                       -विजयकुमार राउत
" हिंदू धर्म मे लाख बुराईया होने के बावजूद भी मै उससे प्रेम करता हू'असे महात्मा गांधी म्हणायचे. कारण हिंदू धर्म हा कितीही पुरातन असला तरी काळाच्या भट्‌टीत तावून सलाखून बाहेर पडला आहे. या धर्मात जशी वेगवेगळया काळांत आलेली स्थिंतंतरे पाहता या धर्मात अनेक रूढींपरंपरांचा शिरकाव झालेला आहे. परंतु या धर्मातील कठोर अशा नियमांमुळे किंवा प्रलोभण व आक्रमणांमुळे प्रत्येक काळात मोठया प्रमाणात धर्मांतर घडूनही आलेले आहे. त्यात जितक्‍या हिंदूनी धर्मांतरण केलं त्याही पेक्षा कमी धर्मांतरण इतर धर्मात झाल्याचं पहायला मिळेल. याचं कारण जाचक रूढी, परंपरा यामागे तर आहेच त्याचबरोबर गरीबीतही आहें. ख्रिश्‍चनांनी पैशाच्या जोरावर तर मुस्लीमांनी तलवारीच्या जोरावर हे धर्मांतरण घडवून आणलेले आहे. यानंतरच्या काळात मात्र अस्पृशांना माणूस म्हणून जगणे नाकारणा-या हिंदू धर्माला एका मोठया वर्गांकडून सोडचिठ्‌ठी देण्याचा लढा पाहायला मिळतो. वैचारिक पातळीवर ,सामाजिक स्तरावरचा हा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मात सुधारणा घडवून आणण्याची अनेकदा तथाकथित हिंदुत्ववाद्यांना संधी देण्याचं महत्वाचं कार्य केलं. त्यांनी त्यांच्या समाजाला या धर्मात बरोबरीचे स्थान व दर्जा मिळवून देण्यासाठीचं जीवाचे रान केले होते. हिंदू धर्म सोडताना त्यांची काय अवस्था झाली होती, हे त्यांच्या एकंदरीत घालमेलीवरून दिसून येते. बौद्‌ध धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी इतर धर्माचाही अभ्यस केला. काळाराम मंदिर प्रवेशावरून त्यांनी दिलेला लढा तर सर्वांनाच माहित आहे. परंतु समाजातील काही धुरीनांनी स्वतः या धर्माला संकुचित विचारात गुरफटून टाकण्याचे कार्य न थकता पार पाडले. सुधारणा घडवून आणण्याचं धाडस मात्र कधी कोणी दाखविले नाही. तसे अनेक प्रयत्न पूर्वी झाले आहेत. परंतु या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून सुचविलेले बदल स्वीकारण्याचं कुणीच मनावर घेंतलं नाही. या धर्माला सर्वात घातक अशी चातवुर्ण्य व्यवस्थाच आहे.
कालबाहय झालेल्या रूढींवर चिंतन करून त्यांना दूर करणे ही आजची गरज आहे. या धर्मात अनेक चालीरिती आहेत. त्यापैकी ब-याच परंपरा या वैज्ञानिक आणि तर्कसंगत वाटत नाहीत. त्या त्या काळातील गरज म्हणून त्या आलेल्या आहेत. परंतु काळाच्या कसोटीवर आता त्यांचं महत्व उरलेलं नाही. ज्या परंपरा संस्कृती म्हणून आपण स्वीकारल्या त्या आता वैज्ञानिक कसोटीवर घासून त्याची उपयुक्‍तता तपासणे गरजेचे आहे. संत वाडःमयात अनेक संतांनी या दुष्ट रूढींवर प्रहार केल्याचे दिसून येते. त्यानंतर समाजसुधारकांनी टीका ओढवून परंपरा किंवा रूढी नाकारण्याचं महत्वाचं कार्य केलेले आहे.
या धर्मातील अनेक रिती किंवा रूढींना विज्ञानाचाही आधार आहे, असं म्हटल्यास थोडं धाडसाचं होईल. या रूढी किंवा परंपरा निर्माण करण्यामागचा हेतू लक्षात घेतला तर तो मनुष्याच्या सर्वांगिण प्रगतीकरीता सकारात्मक आहे. रूढी, परंपरा म्हणजे संस्कृती नव्हे. रूढी, परंपरा या एका वर्गाचे हित जोपासणा-या असतात. संस्कृती मात्र अखिल मानवजातीला उन्नत करणा-या असतात. म्हणून डॉ.आंबेडकरांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या सद्‌सदविवेकबुद्‌धीला जागृत ठेवूनच बौद्‌ध धर्म अंगिकारला आले. कारण या मातीतील धम्म, येथील परंपरांशी नाते निर्माण करणारा बौद्‌ध धम्म हाच माणसाला माणुसकीचे क्षितीज दाखविणारा आहे, हे डॉ.आंबेडकरांना चांगल्या माहित होतं. बुद्‌ध धर्माला विज्ञाननिष्ठ धर्म म्हणूण स्वीकारणेच सगळयांच्या हिताचे आहे. यातच बौद्‌ध धर्माचे मोठेपण आहे. बौद्‌ध धम्म कुठलाही लपंडाव करीत नाही, किंवा दुसरे कुठलेच प्रलोभण दाखवित नाही. त्याचबरोबर त्याने माणूस म्हणून विचार करण्याचं स्वातंत्रय कायम राखले आहे. धम्मातील तत्व जीवनात अंगीकारण्यासाठी ते बुद्‌धीमत्तेच्या निकषावर घासून शेवटी योग्य असेल तरच स्वीकारा, असा मोलाचा संदेश भगवान गौतम बुद्‌ध देतात. म्हणून बौद्‌ध धम्म हा विज्ञाननिष्ठ वाटतो. माणसांसाठी धर्म की धर्मासाठी माणूस? हा प्रश्‍न येतोच. हजारो स्त्रीया केशवपन करून पतीच्या चितेत स्वतःला झोकून देत असताना हिंदू धर्मियांना कधीच दया आली नाही. शेवटी राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या पुढा-यांना सतीप्रथा बंद करण्यासाठी इंग्रजांच्या मदतीने कायदा करावा लागला. अस्पृशांना मानवतेची वागणूक देण्याऐवजी त्यांना पशूपेक्षाही निच वागणूक देत असताना प्राणीमात्रांत सुद्‌धा परमेश्‍वराचं वास्तव्य असतं, हे तत्व सांगणा-या हिंदू धर्मात परस्पर विरोधाभास कसा भरलेला आहे हे जागोजागी दिसून येते.
हिंदू धर्मात विज्ञानाला परंपरेच्या नावाखाली दडपल्या गेलं. तुळसीचं रोपटं अंगणात लावल्याखेरीज घराला घरपण येत नाही. तुळसीचं रोपटं हे वातावरण प्रदुषणमुक्‍त करण्याचं काम करते. म्हणून ते पवित्र आहे. तुळसी चोविस तास प्राणवायू निर्माण करण्याचं काम करते. हिंदू धर्मात त्याचं वैज्ञानिक महत्व न सांगता त्याला केवळ धार्मिक चौकट देउन त्याची स्थापना अंगणातील वृंदावनात करण्यात आली. यामागचं वैज्ञानिक सत्य सांगण्याच्या भानगडीत हा धर्म कधी पडला नाही. या धर्मात शंका किंवा तर्क करण्यास कुठेच वाव देण्यात आला नाही. म्हणून जे वर्षानुवर्षे सुरू आहे , तेच हजारो वर्षांनंतरही अबाधीत राहिलेलं दिसून येते. उपवास हा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशिर ठरतो. यामागचं कारण असं की पोटाची शुद्‌धी होण्याकरीता आजच्या भाषेत "डायटींग' घेणे आवश्‍यक असल्याची बाब आज आरोग्यशास्त्राने सांगीतली. उपावासाने पचनसंस्था चांगली राहते, याचा शास्त्रीय आधार घेउन बुदधीच्या कसोटीवर घासून न तपासता महिन्यातून कित्येक दिवस उपवास पाळणारी व्यक्‍ती अंधश्रद्‌धेपोटी हा रितीरिवाज परंपरेच्या नावाखाली आंधळे होउन पाळीत आहे. जे अंधपणे आपण स्वीकारतो ती अंधश्रद्‍र्धाच. परंतु उपवास करण्यामागचं विज्ञान या धर्माने कधी समजावून सांगीतलं नाही. याबाबतीत हेमाद्री पंडिताचं उदाहरण पुरेसे ठरेल. राज्यात पुरेशी संपन्नता असतानाही राज्यातील जनता आरोग्याची निट काळजी घेण्यापासून दूर गेल्यामुळे रामदेवराजा चिंतेत पडला. सगळी सुखे असताना राज्यातील जनतेचे आरोग्य का ढासळत आहे , याचा राजाला विचार पडला. त्याने वास्तूशास्त्रात पारंगत असलेल्या हेमाद्री पंडिताला बोलावून त्याने याबाबत त्याच्याशी चर्चा केली. सर्वगुणसंपन्न हेमाद्री पंडितांच्या लक्षात ही बाब राजांनी आणून दिली. आणि त्यावर मार्ग शोधण्याची आज्ञा दिली. पंडितांनी काही दिवस सखोल अभ्यास केल्यानंतर एक मोठा ग्रंथच राजासमोर सादर केला. राजाने त्या ग्रंथाचे अध्ययण केले . तेव्हा राजा अतिशय आनंदीत झाला. हेमाद्री पंडितांनी आरोग्य शास्त्राला धार्मिक बाबींचे अनुष्ठान देउन त्याला आरोग्याशी जोडलं. राजाने तो ग्रंथ देवादीपकांची खोटी भिती दाखवून जनतेकडून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. धार्मिक भितीपोटी जनतेने या ग्रंथात जे काही सांगीतलं ते पाळण्यास सुरवात केली. त्याचा आरोग्यावर पाहिजे तसा परिणाम होण्यास मदत झाली. सगळीकडे सुबत्ता नांदू लागली. राज्यात सुख समाधानाचे कारंजे उडायला लागलेत. भितीचा परिणाम इतका झाला की हेमाद्री पंडिताने सांगीतलेले धार्मिक अनुष्ठाण करणे सगळयांनी मुकाटयाने स्वीकारले. हिंदू धर्मात प्रथा, परंपरांना मोठे स्थान आहे. त्यामागचं विज्ञान समजून घेण्याचं आपणही कधी डोळसपणे धाडस करीत नाही. हिंदूह्रदयसम्राट वि.दा. सावरकर यांनी मात्र धर्मात साचलेली मळगट दूर करण्यासबंधी महत्वाचे विचार प्रकर्षाने मांडले. परंतु हजारो वर्षांपासून पडलेला परंपरांचा पायंडा मोडण्याचं धाडस कोणीच केलं नाही. सावरकरांनी ज्या रूढी इस्ट असतील त्यामागचे शास्त्र समाजावून सांगीतले. अनिष्ठ रूढीं नाकारण्याचे औदार्यंही दाखविले. यात हिंदू धर्माची इतर धर्माशी तुलना करण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्या अनिष्ठ रूढी दूर करण्याचं पातक कोण आपल्या माथी मारून घेईल म्हणून जे सुरू आहे ते निमूटपणे पार पाडण्याखेरीज गत्यंतर नाही, या भावनेने पालन सुरू आहे. बरे यामागे ईश्‍वरी कोप होईल अशी आपली समजूत असते. अदृश्‍य शक्‍तीची भिती दाखवून त्या चालत राहिल्या तरच धर्म सुरक्षित राहिल असा काहीसा समज पसरविण्यात आला. या परंपरांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्या अत्यंत पुरातन म्हणून निरूपयोगी आहेत. धर्मामध्ये हजारो वर्षाचा कचरा साचून आता त्याला गटाराचं स्वरूप येत आहे. तसं हजारो वर्षाचं विज्ञानही त्यामागे पाहावयास मिळते. यज्ञ संस्कृती योग्य नसली तरी ती काही अंशी मानवाच्या उत्कर्षासाठी आवश्‍यकही आहे. आज त्यामागचं सत्य बाहेर येत आहे. सावरकरांनी सांगीतल्याप्रमाणं हिंदू व मुस्लीम धर्मात कुठलाच विरोधाभास नाही. कारण या दोन्ही धर्मियांतील प्रत्येक प्रथा एकमेकांच्या हेतूपुरस्सर विरोधी नाहीत. आपली संस्कृती ही सुर्यपुजक असल्यामुळे उगवत्या सुर्याला नमस्कार करण्यासाठी हिंदू धर्मिय पूर्वकडे तोंड करून त्याला नमस्कार करतात. तर मुुस्लीम धर्मिय मक्‍का मदिना हे पवित्र स्थळ पश्‍चिमेस असल्यामुळे त्या दिेशाने तोंड करून नमाज अदा करतात. हिंदूमध्ये मृत्यूनंतर पार्थिवालला अग्नि देण्यात येतो. तर मुस्लीम धर्मात "इंतकाल' झाल्यानंतर त्याचा दफणविधी करण्यात येतो. यामागं कुठला आला विरोधाभास?. मुस्लीम धर्माचं उगमस्थान अरबस्थानात वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे तिथे जंगलांचा अभाव असणं सहाजिक आहे. म्हणून लाकडांची वाट पाहात बसण्यापेक्षा मृत शरिरास वाळवंटात पुरविणे सोयीस्कर आहे. म्हणून दफन करण्याची प्रथा या धर्मात पडली. हिंदू धर्मीचे उगमस्थान जंगलांनी व्याप्त अशा सिंध प्रांतात असल्यामुळे तेथे लाकडांची मुबलकता असणे हा भौगौलिक फरक दोन्ही धर्मातील परंपरा दर्शविते.
d

बुधवार, 24 दिसंबर 2014

काय पाहिजे?


काय पाहिजे, विचार एकदा
जीवनास घे पुन्हा, उधार एकदा!

विचारले तिला, तू व्यस्त का अशी?
भेटली कधीतरी दुपार एकदा!!

गाढवा, अरे जरी इमानदार तू!
जाणुणि जगास हो हुशार एकदा!!

आपुले म्हणून काय झाकतोस तू?
चुकांस आपुल्या कधी सुधार एकदा !!

हारलो कधीच मी, नि जिंकलीस तू
खेळलो तुझ्यासवे जुगार एकदा!!

तापली उन्हात ही तुझी वसुंधरा
सिंचनास दे नभा तुषार एकदा!!

पूर्ण व्हावयास ही गझल तुझी "विजय'
वापरून बघ जरा "कुमार' एकदा!!

                                * विजयकुमार राउत
                                     साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक,
                                   हिंगणा मार्ग, नागपूर 16



 
Blogger Templates