Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 29 अगस्त 2019

विज्ञानातील स्थितंतर

विज्ञानातील उत्क्रांती म्हणा वा स्थित्यंतरे हे विशिष्ट टप्प्यांवर पदोपदी घडत जातात. कारण विज्ञान परिवर्तनशिलता मानते. भौतिकशास्त्र घटनांकडे एकेका "फ्रेम' मधून पाहत असल्यामुळे प्रत्येक घटनेमागचे रहस्य समजून घ्यायचे असेल तर त्या त्या फ्रेममधून एकेक बाबी स्पष्ट होउ पाहतात.
ठळक टप्प्यात विज्ञानाची कार्यशैली समजून घ्यायची असेल तर वीसच्या दशकात विज्ञान प्रामुख्याने दोन गटात विभागले जाउ लागल्याचे आपल्या निदर्शनास येते. पहिला गट म्हणजे पदार्थ मानणारा, तर दुसरा पदार्थांच्या पलिकडे जाउन त्यातील "एनर्जी' च्या रूपातून निर्माण होणा-या "वेव्ह' स्वरूपात जाणणारा. या "वेव्ह' किंवा लहरी कशा बनतात, यामागचे रहस्य पुढे समजून घेउ. सदयाच्या मुद्‌दयावर ऐवढेच समजून घेउ. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पदार्थांवर संशोधन करून भौतिकातील काटेकोर नियम सांगणारे क्‍लासीकल फिजीक्‍स व दुसरा गट क्‍वॉंटम फिजीक्‍स. क्‍वॉटम फिजीक्‍स जाणण्यासाठी दृष्टी व जाणिव अधिकाधिक सूक्ष्म करावी लागते. तिथे स्थुल स्वरूपात वेगळा तर सूक्ष्म रूपात वेगळा असा द्विअंगी अनुभव येतो. जरी हा अनुभव प्रत्यक्ष डोळयांनी दिसत नसला तरी त्यातील घडामोडी मात्र अगदी सुक्ष्मातिसूक्ष्मरित्या समजतात. म्हणजे ख-या अर्थाने अणूरेणूचे एकंदर वागणे "डयुयॉलिटी' स्वरूपाचे असते, असे लक्षात येते. म्हणजे पदार्थ एकतर अणूरूप तसेच लहरी असा दोन स्थितीत अनुभवायला मिळतो.
वैज्ञानिक विश्‍वातील परिभाषांना नवी दृष्टी देणारे वर्नर हेईजनबर्ग यांनी ख-या अर्थाने "अनसर्टीनिटी प्रिंसीपल' सांगून मानवजातीची अख्खी दृष्टीच बदलून टाकली. त्यांनी 1927 मध्ये अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत प्रतिपादीत करताच सगळयांची बोबडी वळली. त्यावेळी अल्बर्ट आईनस्टाईनचा सापेक्षततेचा सिद्‌धांत बराच लोकप्रिय झाला व तो सद्‌सदविवेकबुद्‌धीच्या कसोटीवर खरा ठरला होता. सृष्टीचे एकूण तत्व हाती लागल्याचा जगाला अतिव आनंद झाल्यामुळे सगळीकडे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्‌धांताचा उदोउदो सुरू होता. जणू स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच मानव जातीला आनंद झाला असावा. त्याच्यामागचे कारणही तसेच होते. सापेक्षता सिद्‌धांत इलेक्‍ट्रान, प्रोटान, न्यूट्रानच्या एकंदर स्थितीवर सापेक्ष भाष्य करणारा होता. म्हणजे सृष्टीत घडणा-या प्रत्येक पदार्थाचे भविष्य कसे असेल, याबद्‌दल अणूंच्या गतीवरून ते सिद्‌ध करता येत असल्याचा अविर्भाव दाटून आला होता. यातील विनोद म्हणजे सापेक्षतावाद जर एखाद्या मच्छराच्या बसण्यावरून त्याची पुढील स्थिती सिद्‌ध करीत असेल तर मग पुढे तो मच्छर जर मरणार तेव्हा तो नेमका कशाने मरणार आहे, मस्कीटोमॅटने की एखाद्याच्या अंगावर बसल्यामुळे त्याच्या थापेने? असा प्रश्‍न हेडजेनबर्ग याने केला होता. वास्तविक पाहता दोघेही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य होते.
जर्मनशास्त्रज्ञ वर्नर हाईजनबर्ग यांचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांतावरून आईनस्टाईन यांच्यात नंतरच्या काळात बरेच वादविवाद झाले. हेईजनबर्गच्या सिद्‌धांतावरून क्‍लासिक फिजीक्‍समध्ये अख्खे विज्ञान दोन गटात विभागल्या गेले. कालपरवापर्यंत या मतभेदातील दरी कायम राहिली. मात्र आता केवळ तार्किक बुद्‌धीचेच परिमाण न लावता शास्त्रज्ञ वेगळया दृष्टीतून बघायला लागले आहेत. म्हणून आधुनिक विज्ञान आता तर्काची भाषा सोडून वेगळी भाषा बोलायला लागले आहे. या वादातून आईनस्टाईन यांच्या संशोधनाला त्याकाळी तथाकथीत विज्ञानवादी "यहुदी विज्ञान' म्हणून हिणविले जायचे. सृष्टीचा व्यापार निसर्गानेच निर्माण केलेल्या "परफेक्‍ट' नियमानुसार चालतो, असा आईनस्टाईचा दावा होता. तो नियम कोणता तर "सापेक्षतावाद' यानुसार चालतो, असे आईनस्टाईनचे म्हणणे होते. अनेकदा निसर्गाच्या घटनांबाबत भाकीत करणे किंवा आपण पाहतो त्याप्रमाणे त्यांची योग्य स्थिती समजून घेता येणे शक्‍य नाही, थोडक्‍यात यालाच अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत म्हणतात.
हाईजनबर्गचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत समजून घेण्यापूर्वी आईनस्टाइनचा सापेक्षता वाद समजावा लागेल.

जग हे अनिश्‍चितीतेचे

uncertentity principal
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते' अशी आपल्याकडे म्हण आहे. दैनंदिन जीवनात त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. निश्‍चित हे जग कसे आहे, कशाने बनले आहे, यामागचे सत्य स्वरूप कसे असावे, हा प्रश्‍न शेवटी माणसाला पडतोच. त्याचा शोध आजपर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आताही तेच करीत आहेत. उद्याही त्यांचा प्रवास असाच सुरू राहिल. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्‍तींनी वर्षानुवर्षे जगाच्या मागचे रहस्य उलगडण्याचा आपापल्या त-हेने प्रयत्न केला आणि करताहेत. जग हे नेमके कसे असते, याचा उलगडा कुणालाच होउ शकला नाही, असेही म्हणता येणार नाही. दुर्दैवाने म्हणावे तर त्यामागचे रहस्य आपल्यालाच पूर्णपणे कळू शकले नसावे, कदाचित ! यामागचे कारण असे की ज्या महापुरूषांना जग जसे दिसले, तसे सांगण्याच्या त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या भाषेपर्यंत किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवांपर्यंत पोहचण्यात आपणच कमी ठरत असावे, हे सुद्‌धा त्यामागचे कारण असू शकते. आजच्या विज्ञानातील "कॉम्प्यूटर सिम्यूलाईजेशन हायपरथेसिस' या सिद्‌धांताप्रमाणे महापुरूषांच्या अनुभवातील "ब्रम्ह सत्य, जगं मिथ्या' हा उपदेश पुरेसा असू शकतो. किंवा होलोग्राफिक प्रिंसीपलप्रमाणे प्रोजेक्‍टरमधील प्रकाशाच्या एका बिंदूतून पुढे जगाच्या अफाट विस्तारापर्यंत विकास पावलेल्या स्थितीपर्यंतही जगाचा प्रवास असू शकतो. आनंदने केलेल्या प्रश्‍नावर बुद्‌धाने दिलेल्या उत्तरातून जग क्षणोक्षणी प्रसरण पावत आहे, असा उपदेश करण्यामागे बुद्‌धांचे विज्ञानच नाही का?
हजारो वर्षांपासून भारतीय अध्यात्मशास्त्रातील "पिंडी ते ब्रम्हांडी' या सुत्रातूनही नेमके हेच अधोरेखित होते. म्हणून कुठेच उणेपणा न येता बुद्‌धपुरूषांची वचने आजही सर्वश्रेष्ठच ठरतात. ज्या महापुरूषांना हे कळले ते यातील "माईलस्टोन' म्हणून जगापुढे सिद्‌ध झाले. परंतु कुठल्याच संकल्पना पूर्णपणे समजून न घेता आपण निव्वळ विरोधाच्या पातळीवरच जाउन आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यास कारणीभूत असतो. प्रत्येक धर्माने जगाचे स्वरूप कसे असते हे सांगण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपण मात्र त्याचा मर्थितार्थ समजून घेण्याऐवजी धर्माच्या बाहयरूपातच मग्न झालो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञानातील भांडण वर्षानुवर्षे हे असेच सुरू राहणार आहे. खरे म्हणजे स्वतःला पदोपदी बदलविण्यात विज्ञान दिवसेंदिवस विनम्र मानत असते. दिसणा-या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडा, असा संदेश अध्यात्म देते. त्यावेळी आपण कधीच "सिरियस' नसतो. एकंदर कसे की आपण धड अध्यात्मीक किंवा विज्ञानविषयी जाणून घेण्यास दोन्ही पातळीवर अंधश्रद्‌धच असतो. मार्क्‍स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. पण सदासर्वकाळ काही मूठभर लोकांसाठीच धर्म ही अफूची गोळी राहू शकतो. सगळयांसाठीच नाही. अनेकांसाठी तो सन्नमार्गावर चालण्यासाठी प्रेरक ठरत असतो. धर्म हा माणसाला नितीतत्वाशी जोडतो व एका उदात्त अशा ध्येयाकडे घेउन जातो. सरतेशेवटी आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञही म्हणून गेला की विज्ञानाशिवाय कुठलाही धर्म (कॉस्मीक रिलीजन) नसावा आणि धर्माशिवाय विज्ञान नसावे. कट्‌टरता ती धार्मिक असो वा पुरोगामी यातील कुठलीच गोष्ट योग्य नाही. म्हणून जे प्रत्यक्ष डोळयांनी दिसते आहे, ते तसेच असावे का, याबद्‌दल शंका घेणे ही आज खरी वैज्ञानिक बाब म्हणून पुढे येत आहे. यासाठी अनेकानेक सिद्‌धांत मांडण्यात आले. हे सर्व सिद्‌धांत समजून घ्यावे लागतील. उलट त्यांना टाळतो म्हटले तर सत्यापासून दूर जाण्यासारखे किंवा अंधारात जगण्यासारखी चूक कुठलीच ठरणार नाही.
विजयकुमार राउत 

मंगलवार, 2 अक्टूबर 2018

माणूस होण्याच्या मार्गातील "उत्कलनबिंदू' तथागत


विजयकुमार राउत


बुद्‌ध म्हणजे गर्भअंधारयुगात भारतवर्षाला पडलेले एक तेजोमय, स्वयंपूर्ण, सर्वांगसुंदर असे स्वप्न. तथागत म्हणजे संधीकाळात गवसलेले शांती, करूणेचे स्वच्छ, कोरे क्षितीज. तथागत म्हणजे शंभर टक्‍के अस्सल माणूस होण्याची शाश्‍वती आणि उपलब्ध असलेली संधी. भारताच्या पदरात असंख्य युगानंतर पडलेला "डायमंड' म्हणजे तथागत. माणसाच्या जगण्याचे एका सुंदर फुलात रूपांतरण घडवून आणणारे एक चमत्कारीक रसायण म्हणजे तथागत. माणूसपण गोठलेल्या मातीत माणूस होण्याची शक्‍यता होउन सर्वदूर प्रसरण पावणारा सर्वोच्च असा "उत्कलनबिंदू' तथागत भगवान बुद्‌ध.
खुद्‌दनिकायाच्या इतिवुत्तकपाळीमध्ये स्वतः तथागतांनी "तथागत' या शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, हे भिख्खूंनो, तथागत जसे बोलतो, तसे करतो, आणि जसे करतो तसे बोलतो. तो यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी म्हणून "तथागत' म्हटल्या जातो. "तथागत' हे बिरूद स्वीकारण्याचा बुद्‌धांचा जो विचार आहे, तो स्वयंपूर्ण आहे. या शब्दाचा अर्थ समजावून घेताना अधिकाधिक सकारात्मकतेने थोडेसे संतुलीत होउन सैल व स्वैर फुलपाखरासारखे स्वच्छंद व्हावे लागते. परंपराचे अवजड ओझे झिडकारून द्यावे लागते. तेथे आपला "स्व' म्हणजे निरर्थक "इगो'चा तनाव विसर्जित करावा लागतो. मनाचा गोंधळ आणि बडबड शांत करावी लागते. "तथागता'चा अर्थ आहे, जसे आहे तसे पाहणारा, जसे आहे तसे स्वीकारणारा, जसे आहे तसे सांगणारा, आणि जसे आहे तसे वागणारा ! आता हे "जसे' आहे "तसे' म्हणजे याचा नेमका अर्थ तरी काय? ते आपल्या विचार-अविचारंच्या तथाकथीत ज्ञानाच्या कक्षेत बसते काय? "तथागत' या अर्थाने गौतम बुद्‌ध "मल्टीडायमेंशनल' आहेत, यात वादच नाही. सर्वांत अगोदर आपल्याला आपली दृष्टी, बुद्‌धी व त्यानंतर इंद्रीयोगोचर जे कमीअधिक अनुभव वाटयाला येतात, त्याकडे निरपेक्ष बुद्‌धीने बघावे लागेल. त्याचे निर्दोषत्व तपासावे लागेल. आपल्या धारणा ज्या गोष्टींवर अवलंबून असतात, त्याची क्षमता बुद्‌धत्वाच्या सम्यक ज्ञानावर घासावी लागेल. सर्वप्रथम आपल्याला हे विचारात घ्यावे लागते की आपल्याला दिसते ते सत्य की तथागतांनी म्हटलेले सत्य? तथागत हा शब्दच "डायमेंशनल' आहे. ऑरिस्टाटल, प्लेटो किंवा साक्रेटीसपूर्वी सत्य बुद्‌धाने शोधले होते.
निसर्गातील वस्तूंबद्‌दल विश्‍लेषण करण्याची परिपूर्णता सम्यक ज्ञानातून उपलब्ध होते आणि ती प्राप्तच करावी लागते. येथे ख-या अर्थाने प्रयत्नवादी व्हावे लागते. म्हणून भगवान बुद्‌ध आणि त्यांचा धम्म विचारवंताच्या दृष्टीने शुद्‌ध विज्ञानवादी ठरतो.
"सम्यक' म्हणजे balance हा शब्द देणारा बुद्‌ध हा पृथ्वीतलावरील पहिला आणि शेवटचा ज्ञाता होय. आजच्या काळात balance या शब्दाचे किती महत्व आहे, हे आपल्या जीवनात पदोपदी ध्यानात येते. कट्‌टर धार्मिकतेच्या काळात एक सम्यक व संतुलित भाषा देणारे बुद्‌ध म्हणून कोणलाही सहज भावतात. सुख आणि दुःख या केवळ मानसिक अवस्था होत, हे सांगणारा पहिला मानसशास्त्रज्ञ बुद्‌धच आहे. धर्माचा गवगवा करणा-यांना तो सांगतो की धम्म हे केवळ आपल्या उद्‌दीष्टपूर्तीचे साधन होय, असे सांगणारा पहिला तत्वज्ञानी बुद्‌धच ठरतो. विश्‍व नित्य प्रसरण पावते, हे सांगणारा पहिला वैज्ञानिक बुद्‌धच ठरतो. आईनस्टाईन आणि "ऍपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्जही हे मानतो. बुद्‌धत्वाला सत्याच्या मार्गात अंतिम आणि अढळ असे स्थान आहे. म्हणून देश, काल आणि परिस्थितीच्याही सिमा ओलांडून दीर्घ काळ बौद्‌ध धम्म टिकून राहतो. बुद्‌ध जगात सत्य, अहिंसा व करूणेच्या बळावर स्थायीत्व मिळवितो. बुद्‌धाच्या जागरूक मार्गाने "निब्बान' अवस्थेपर्यंत पोहचल्यानंतर जीवनाची फलश्रृती होते. बुद्‌धाला वैशाख शुद्‌ध पौर्णिमेला ज्ञान प्राप्त होते, यात निसर्गाची भूमीका फार मोलाची ठरते. याचा प्रत्यय आपल्याला एखादा चित्रपट पाहताना येतो. चित्रपटाचा दिग्दर्शक ज्याप्रमाणे कथेला साजेसी पार्श्‍वभूमी निर्माण करून ते अधिक प्रभावकारी होण्याच्या दृष्टीने वातावरणाचा backgraoundच्या सहायाने दृश्‍याची उभारणी करतो, तशीच बुद्‌धाच्या जन्माच्या वेळी निसर्गाने केलेली पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची योजना सुचक आणि दिशादर्शकच नव्हे तर "क्‍वॉंटम' दुनियेत खरी ठरते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्‌ध जेव्हा आपल्या पाच सहका-यांना उपदेश करायला वाराणसीकडे निघाले, तेव्हा उरवेला आणि गया या प्रांतामध्ये उपक अनिषक बुद्‌धाला आश्‍चर्याने म्हणतो,
तुझी इंद्रीये विशेष प्रसन्न आहेत, तुझी कांती परिशुद्‌ध आणि उजळ आहे. ज्ञानातून येणारी एक विशेष चकाकी बुद्‌धांच्या कांतीला तेजस्वीता प्रदान करीत होती. दैनंदिन जीवनात एखादया वेळी काही सुचले की तर आपल्याला कोण आनंद होतो. आपल्या चर्येवर ज्ञानाची कवडसे पसरतात. तसेच बुद्‌धाचेही झाले. बुद्‌धाला तर सर्वज्ञान प्राप्त झाले होते. त्यांची अवस्था कशी असेल ! असे म्हटल्या जाते की ते ज्या मार्गाने चालत जायचे, तेथे अवकाळीच "कमळे' फुलायची.
एक साधे सत्य कळायचे असेल तर अख्खे आयुष्य उधळून लावायची तयारी असायला हवी, अशी शिकवण बुद्‌धांच्या जीवनातून मिळते. सत्य हे "मल्टीडायमेंशनल' असते. त्याला एक नव्हे तर असंख्य बाजू असतात, असे आजचे विज्ञान सांगते. म्हणून बुद्‌धाला पूर्णपणे समजणे हे कोणालाच जमत नाही. अलीकडे "क्‍वॉंटम थेअरी' मुळे सगळया विचारधारा भराभर ढासळायला लागल्या. आधुनिक विज्ञान आतापर्यंत केवळ दहा "डायमेंशन'वर पोहचले. इतर देशातील तज्ज्ञ हे समजत आहेत. अडिच हजार वर्षांपासून बुद्‌धाच्या तत्वज्ञानात कुठेच कमतरता येत नाही. बुद्‌धांच्या समकालीन असलेले वर्धमान महावीरही मात्र पंचेविस "डायमेंशन' जाणत होते. म्हणून आपण म्हणतो ते सत्य आणि बुद्‌ध ज्या परिपूर्ण दृष्टीतून मांडतात "ते सत्य' यात जमिन आसमानचा फरक आहे. आपण जे काही बोलत जातो ते अर्धसत्यच ठरतं. व्यक्‍ती जितकी मोठी, तितकी सर्वसामान्य जनतेची समजण्याची पात्रता कमी, तितके त्यांचे पंथ, उपपंथ अधिक. मतामतांचा गलबला फार. बुद्‌धांना अडिच हजार वर्षांनंतर कितीही जाणले तरी ते अपूर्णतेकडेच घेउन जाणारे ठरते. बुद्‌धाच्या मार्गाने प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभत नाही.
विजयकुमार राउत
8888876462
 
Blogger Templates