Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 2 अक्टूबर 2018

माणूस होण्याच्या मार्गातील "उत्कलनबिंदू' तथागत


विजयकुमार राउत


बुद्‌ध म्हणजे गर्भअंधारयुगात भारतवर्षाला पडलेले एक तेजोमय, स्वयंपूर्ण, सर्वांगसुंदर असे स्वप्न. तथागत म्हणजे संधीकाळात गवसलेले शांती, करूणेचे स्वच्छ, कोरे क्षितीज. तथागत म्हणजे शंभर टक्‍के अस्सल माणूस होण्याची शाश्‍वती आणि उपलब्ध असलेली संधी. भारताच्या पदरात असंख्य युगानंतर पडलेला "डायमंड' म्हणजे तथागत. माणसाच्या जगण्याचे एका सुंदर फुलात रूपांतरण घडवून आणणारे एक चमत्कारीक रसायण म्हणजे तथागत. माणूसपण गोठलेल्या मातीत माणूस होण्याची शक्‍यता होउन सर्वदूर प्रसरण पावणारा सर्वोच्च असा "उत्कलनबिंदू' तथागत भगवान बुद्‌ध.
खुद्‌दनिकायाच्या इतिवुत्तकपाळीमध्ये स्वतः तथागतांनी "तथागत' या शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, हे भिख्खूंनो, तथागत जसे बोलतो, तसे करतो, आणि जसे करतो तसे बोलतो. तो यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी म्हणून "तथागत' म्हटल्या जातो. "तथागत' हे बिरूद स्वीकारण्याचा बुद्‌धांचा जो विचार आहे, तो स्वयंपूर्ण आहे. या शब्दाचा अर्थ समजावून घेताना अधिकाधिक सकारात्मकतेने थोडेसे संतुलीत होउन सैल व स्वैर फुलपाखरासारखे स्वच्छंद व्हावे लागते. परंपराचे अवजड ओझे झिडकारून द्यावे लागते. तेथे आपला "स्व' म्हणजे निरर्थक "इगो'चा तनाव विसर्जित करावा लागतो. मनाचा गोंधळ आणि बडबड शांत करावी लागते. "तथागता'चा अर्थ आहे, जसे आहे तसे पाहणारा, जसे आहे तसे स्वीकारणारा, जसे आहे तसे सांगणारा, आणि जसे आहे तसे वागणारा ! आता हे "जसे' आहे "तसे' म्हणजे याचा नेमका अर्थ तरी काय? ते आपल्या विचार-अविचारंच्या तथाकथीत ज्ञानाच्या कक्षेत बसते काय? "तथागत' या अर्थाने गौतम बुद्‌ध "मल्टीडायमेंशनल' आहेत, यात वादच नाही. सर्वांत अगोदर आपल्याला आपली दृष्टी, बुद्‌धी व त्यानंतर इंद्रीयोगोचर जे कमीअधिक अनुभव वाटयाला येतात, त्याकडे निरपेक्ष बुद्‌धीने बघावे लागेल. त्याचे निर्दोषत्व तपासावे लागेल. आपल्या धारणा ज्या गोष्टींवर अवलंबून असतात, त्याची क्षमता बुद्‌धत्वाच्या सम्यक ज्ञानावर घासावी लागेल. सर्वप्रथम आपल्याला हे विचारात घ्यावे लागते की आपल्याला दिसते ते सत्य की तथागतांनी म्हटलेले सत्य? तथागत हा शब्दच "डायमेंशनल' आहे. ऑरिस्टाटल, प्लेटो किंवा साक्रेटीसपूर्वी सत्य बुद्‌धाने शोधले होते.
निसर्गातील वस्तूंबद्‌दल विश्‍लेषण करण्याची परिपूर्णता सम्यक ज्ञानातून उपलब्ध होते आणि ती प्राप्तच करावी लागते. येथे ख-या अर्थाने प्रयत्नवादी व्हावे लागते. म्हणून भगवान बुद्‌ध आणि त्यांचा धम्म विचारवंताच्या दृष्टीने शुद्‌ध विज्ञानवादी ठरतो.
"सम्यक' म्हणजे balance हा शब्द देणारा बुद्‌ध हा पृथ्वीतलावरील पहिला आणि शेवटचा ज्ञाता होय. आजच्या काळात balance या शब्दाचे किती महत्व आहे, हे आपल्या जीवनात पदोपदी ध्यानात येते. कट्‌टर धार्मिकतेच्या काळात एक सम्यक व संतुलित भाषा देणारे बुद्‌ध म्हणून कोणलाही सहज भावतात. सुख आणि दुःख या केवळ मानसिक अवस्था होत, हे सांगणारा पहिला मानसशास्त्रज्ञ बुद्‌धच आहे. धर्माचा गवगवा करणा-यांना तो सांगतो की धम्म हे केवळ आपल्या उद्‌दीष्टपूर्तीचे साधन होय, असे सांगणारा पहिला तत्वज्ञानी बुद्‌धच ठरतो. विश्‍व नित्य प्रसरण पावते, हे सांगणारा पहिला वैज्ञानिक बुद्‌धच ठरतो. आईनस्टाईन आणि "ऍपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्जही हे मानतो. बुद्‌धत्वाला सत्याच्या मार्गात अंतिम आणि अढळ असे स्थान आहे. म्हणून देश, काल आणि परिस्थितीच्याही सिमा ओलांडून दीर्घ काळ बौद्‌ध धम्म टिकून राहतो. बुद्‌ध जगात सत्य, अहिंसा व करूणेच्या बळावर स्थायीत्व मिळवितो. बुद्‌धाच्या जागरूक मार्गाने "निब्बान' अवस्थेपर्यंत पोहचल्यानंतर जीवनाची फलश्रृती होते. बुद्‌धाला वैशाख शुद्‌ध पौर्णिमेला ज्ञान प्राप्त होते, यात निसर्गाची भूमीका फार मोलाची ठरते. याचा प्रत्यय आपल्याला एखादा चित्रपट पाहताना येतो. चित्रपटाचा दिग्दर्शक ज्याप्रमाणे कथेला साजेसी पार्श्‍वभूमी निर्माण करून ते अधिक प्रभावकारी होण्याच्या दृष्टीने वातावरणाचा backgraoundच्या सहायाने दृश्‍याची उभारणी करतो, तशीच बुद्‌धाच्या जन्माच्या वेळी निसर्गाने केलेली पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची योजना सुचक आणि दिशादर्शकच नव्हे तर "क्‍वॉंटम' दुनियेत खरी ठरते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्‌ध जेव्हा आपल्या पाच सहका-यांना उपदेश करायला वाराणसीकडे निघाले, तेव्हा उरवेला आणि गया या प्रांतामध्ये उपक अनिषक बुद्‌धाला आश्‍चर्याने म्हणतो,
तुझी इंद्रीये विशेष प्रसन्न आहेत, तुझी कांती परिशुद्‌ध आणि उजळ आहे. ज्ञानातून येणारी एक विशेष चकाकी बुद्‌धांच्या कांतीला तेजस्वीता प्रदान करीत होती. दैनंदिन जीवनात एखादया वेळी काही सुचले की तर आपल्याला कोण आनंद होतो. आपल्या चर्येवर ज्ञानाची कवडसे पसरतात. तसेच बुद्‌धाचेही झाले. बुद्‌धाला तर सर्वज्ञान प्राप्त झाले होते. त्यांची अवस्था कशी असेल ! असे म्हटल्या जाते की ते ज्या मार्गाने चालत जायचे, तेथे अवकाळीच "कमळे' फुलायची.
एक साधे सत्य कळायचे असेल तर अख्खे आयुष्य उधळून लावायची तयारी असायला हवी, अशी शिकवण बुद्‌धांच्या जीवनातून मिळते. सत्य हे "मल्टीडायमेंशनल' असते. त्याला एक नव्हे तर असंख्य बाजू असतात, असे आजचे विज्ञान सांगते. म्हणून बुद्‌धाला पूर्णपणे समजणे हे कोणालाच जमत नाही. अलीकडे "क्‍वॉंटम थेअरी' मुळे सगळया विचारधारा भराभर ढासळायला लागल्या. आधुनिक विज्ञान आतापर्यंत केवळ दहा "डायमेंशन'वर पोहचले. इतर देशातील तज्ज्ञ हे समजत आहेत. अडिच हजार वर्षांपासून बुद्‌धाच्या तत्वज्ञानात कुठेच कमतरता येत नाही. बुद्‌धांच्या समकालीन असलेले वर्धमान महावीरही मात्र पंचेविस "डायमेंशन' जाणत होते. म्हणून आपण म्हणतो ते सत्य आणि बुद्‌ध ज्या परिपूर्ण दृष्टीतून मांडतात "ते सत्य' यात जमिन आसमानचा फरक आहे. आपण जे काही बोलत जातो ते अर्धसत्यच ठरतं. व्यक्‍ती जितकी मोठी, तितकी सर्वसामान्य जनतेची समजण्याची पात्रता कमी, तितके त्यांचे पंथ, उपपंथ अधिक. मतामतांचा गलबला फार. बुद्‌धांना अडिच हजार वर्षांनंतर कितीही जाणले तरी ते अपूर्णतेकडेच घेउन जाणारे ठरते. बुद्‌धाच्या मार्गाने प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभत नाही.
विजयकुमार राउत
8888876462

गुरुवार, 21 दिसंबर 2017


मी'ज्ञान

* विजयकुमार राउत
..........
ज्ञान, विज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या. माणसाने कर्तृत्वाच्या सगळया दिशा पादाक्रांत केल्या. सगळे शोध लागले. तरीही काहीतरी राहूनच गेल्याचे शल्य हातात उरले. काय आहे ते? सिकंदर, सम्राट अशोक आणि अलिकडचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना जीवनात संघर्ष करून काय मिळाले? यांच्या विजयाला अपयशाची काळी किनार का?मोबाईल, इंटरनेट सारखी साधने हाती लागूनही संवाद का होत नाही? असे अनेक प्रश्‍?न दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. दुनियेतल्या सगळया ज्ञानाची ओळख झाली परंतु "मी' तरीही कायमच उरला आहे. "मी' जाणल्याशिवाय माझं जिवन कसं असेल, याचे उत्तर मिळणार नाही.
***********************
"मी' आणि "माझे' या चक्रव्यहात आपण आजन्म गुंतलेले असतो. मी आणि माझया पलिकडे काही नाहीच, अशी आपली ठाम धारणा असते. मला कोण काय समजते, यावर आपल्या जीवनाची अख्खी इमारत उभी राहते. स्वतःची स्तुती करताना सुप्तावस्थेत असलेला "मी' अधूनमधून डोके वर काढतोच काढतो. आयुष्यभर खोटया समजूती , खोटया कल्पनेत वावरताना आपण सत्यापासून खूप दूर गेलेले असतो. जीवनभर ज्याला आपण ज्ञान संबोधतो मुळात ते जसे समजतो तसे नसतेच. आपण एकमेकांची स्तुती करतो, म्हणजे नेमके काय करतो? याचं उदाहरण म्हणजे इसापनितीतील जिराफला कावळा म्हणतो काय तुमची सुंदर मान आहे ! आणि मग कावळयाला खुश करण्यासाठी जिराफही त्याची भरभरून स्तुती करतो. म्हणतो, काय मस्त तुमचा आवाज आहे ! फार सुंदर गाता तुम्ही !' या दोघांचीही स्तुती खरी आहे का ? दोघांनाही बरं वाटावं त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो.समाजाचा व्यवहारही असाच चालतो. खोटं खोंटं जगणं नशिबी येतं. शेक्‍?सपिअरने म्हटल्याप्रमाणे आपण दुनियेच्या विशाल रंगमंचावरील केवळ एक पात्र ठरतो. समाजात वावरताना अनेक भूमीका पार पाडत जातो. बरं भूमीकेचं जाउ द्या, खर तर आपण जीवन जगतो का?दुभंगलेले व्यक्‍?तीमत्व घेउन आपण जगत असतो. क्षणात एक विचार, दुस-या क्षणात दुसरा विचार. कधी राग, कधी क्रोध या दोन टोकांवर आपण विभागलेले असतो.
सिद्‌?धार्थ ऐश्‍?वर्याचा त्याग करून सत्य शोधायला गेले आणि बुद्‌?धत्व प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा सगळा शोध संपला. सत्य शोधण्यासाठी योग्यता कमवावी लागते. त्यासाठी बुद्‌?ध देवत्व नाकारतात आणि आचरणाला महत्व देतात. देवत्वाठी आग्रह धरण्याऐवजी पंचशिल पाळण्याचा नियम सांगतात. या नियमातूनच मग खरा माणूस घडण्याची किमया घडत असते. "तथागत' शब्दाचा अर्थ होतो तथ्यागत...तथ्य, सत्य असेल तेच बोलणार. किंवा जसं आहे तसं स्वीकारणे. सत्याच्या पलिकडे काहीच नाही. सत्याच्या थोडयाफार अंशाला आपण सत्य समजून असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे विज्ञान असं म्हणतं, विज्ञानात तमकं सांगीतले आहे. आपल्या विधानाला सत्याचा आधार मिळाला किंवा समोरच्याने ते ग्राहय मानावे, यासाठी सुरू होते आपली अहमहिका. सायंटीफिकली ते सिद्‌?ध झालेले आहे, बरं का, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अंतिम सत्य सांगीतल्याचा आपला समज असतो. देशात विज्ञान , तंत्रज्ञान अधिकाधिक उन्नत व्हावे, असे कुणाही सुज्ञ व्यक्‍?तीला वाटणार. परंतु समाजात जो विज्ञानाचा दावा करतो त्यानं तरी विज्ञानाची किती माहिती घेतली? स्वतःला कधी "अपडेट'केलं का? विज्ञान दररोज नवनवी क्षितीजे व्यापत आहे. जुने आणि नवे याचा संगम विज्ञानात पहायला मिळतो. म्हणून विज्ञानही अंतिम दावा कधीच करीत नसते. मात्र जे विज्ञानाविषयी अल्पज्ञानी असतात, ते मात्र विज्ञानाच्या नावावर भांडायला तयार होतात. वाद घालतात. स्वतःला पुरोगामी समजून स्वतःचीच हेटाळणी करतात. त्यालाच नकली पुरोगामित्व असे म्हणतात. विज्ञानात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ अगदी विनम्रपणे आपल्या मर्यादा आणि सत्याचे अमर्यादीत्व ओळखून झटत आहेत. केवळ अल्पांशाने सत्य हाती लागले आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मानतात. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नकली पुरोगामीत्ववादाने पछाडलेल्यांनी केलेल्या दाव्यात फक्‍?त "मी' असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात सत्याचा अंशही सापडणे कठीण असते. जसे पुरोगामी तसेच प्रतिगामी. दोन्ही निव्वळ बुडबुडे. दोघेही दावे देत भांडत बसणार. लिळाचरित्रातील "चार आंधळया'सारखी यांची गती.
सत्य जाणणारा साक्रेटीस तर म्हणतो , "आय क्‍?नो, आय डोंट नो', "सत्यम शिव सुंदरम'...आपले जीवन सुंदर असायला हवे, असे वाटत असेल तर सत्याने जगायला शिकले पाहिजे. अलिकडे शब्दांचा वापर जास्त प्रमाणात होउ लागला आहे. संवाद साधण्यासाठी मोबाईल, इंटरनेट सारखे विविध उपकरणे आपल्या हातात आली आहेत. तरीही संवादातील " गॅप' अजूनही आपल्याला भरून काढता आली नाही. भाषेने नवनवीन शब्द शोधून काढले तरी सत्यापर्यंत ती नेउ शकली नाही. कधी नव्हे इतकी समाजात दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला काहीतरी सांगण्याची घाई झालेली आहे. जगण्यातला वेग वाढतो तसतसे आपण विनाशात्वाच्या दिशेने फार वेगाने सरकत जातो. कुणाला श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे. कुणाला स्वतःची प्रतिमा तयार करण्याची घाई झालेली आहे. ही घाईच सर्व बाजूंनी व्यापून अक्राळविक्राळ समस्येचे रूप धारण करीत आहे.
"मी' किंवा माझी ओळख झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही. सगळे दावे खोटे ठरतात. सगळया कल्पना ,सगळया व्याख्या फोल ठरतात. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला "अहं ब्रम्हास्मी' म्हटलं. त्यामुळे समाजात घोळ निर्माण झाला. प्रत्येक जण स्वतःला "ग्रेट' समजायला लागला. दुस-याला तुच्छ लेखण्याशिवाय त्याचे "मीत्व'अपूर्ण राहू लागले. अडिच हजार वर्षापूर्वी मात्र बुद्‌?धाने "अत्त दीप भव' म्हणजे "तूच तुझा प्रकाश हो' म्हटलं तेव्हा त्याला भाषेतलं आणि एकूणच जगण्याचं सत्व कळलं. मित्रांनो, माणूस होण्याची वाट सरळ नाही. आणि सत्य जाणल्याशिवाय मनुष्य प्राण्यातील अपूर्णत्व कायमच राहणार. मानवी जिवनातील पूर्णत्व जाणून घेतल्याशिवाय संत साहित्यातील सत्व कळत नाही. कुणाला वगैरे नाव ठेवणं तर सगळयात छोटी गोष्ट. "मी' शिवाय जे कळायला लागते ते ज्ञान . ज्यात "मी' म्हणजे अहंभाव असतो, ते केवळ अज्ञानच !
"मी' पण ज्याचे पक्‍व फळापरी
अलगद गळून पडले हो !
जीवन त्यांना कळले हो !
असे कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात ते उगाच नाही !

गुरुवार, 23 मार्च 2017

डोळे उघडा "वि'ज्ञानेश्‍वरा !


विजयकुमार राउत

अवघ्या 18 वर्षात ज्ञानेश्‍वरी सारखा ग्रंथ लिहून जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा संत ज्ञानेश्‍वर 700 वर्षापूर्वी होउन गेला, यावर कुणाचा विश्‍वास बसत नसेल. इवलंस रोप आणि त्याच्या प्रतिभेचा वेलू केवढा? तर गगनाला भिडणारा...सगळया ज्ञात अज्ञात जगताचं कोडं त्यानं आपल्या प्रतिभेच्या उत्तुंगतेतून उघडं केलं, हा वागविलासाचा केवढा मोठा प्रताप !
"मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा' अशी ज्ञानेशाची हळूवार समजूत काढताना लहानगी बहिण मुक्‍ताई आईची ममता अंगी शिरवून दुनियेची रितभात सांगते. तेव्हा ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभावंतालाही आपल्या कर्तृत्वाची जाण यायला वेळ लागत नाही. मित्रहो असे "ज्ञानेश्‍वर' जेव्हा जेव्हा जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या वाटयाला सा-या जगाचा उपहासच येत असतो. हा निसर्गनियमातील विरोधाभास, आणि तो निसर्गमान्य आहे, हेच खरे. उजेडाला व्यक्‍त व्हायला शेवटी काळोख हवा असतो !
ैहम घरमे जब दीप जलाने लगते है !
घरके अंधेरे शोर मचाने लगते है!!
कधी कधी चिंतातूर जंतूचं मात्र हसू येतं. त्यांची शंका अशी की सोळा वर्षाचा कोवळा मुलगा अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी काय लिहितो.....21 व्या वर्षी समाधी काय घेतो.. इत्यादी..इत्यादी..(आमचा घोडया दहावीची परीक्षाही निट पास होत नाही. नापास झाल्यानंतर राजकारण किंवा क्रिकेटशिवाय त्याला काही येतही नाही...म्हणून)कविवर्य गोविंदाग्रजांची शपथ घेउन त्यांची माफी मागतो. असा विरोध करणे हेच चिंतातूर जंतूंचं एकमेव आणि पोष्टीक खाद्य असावं, अशी मलाही नाईलाजाने शंका यायला लागली! कदाचित निव्वळ विरोधावरच या जंतूचं पोषण उत्तमरित्या होत असावं, त्यामुळे त्यांना अनेक युगाचं आयुष्य आहे. जिते रहो...!!
सदया असे शंकासुर आणि चिंतातूर जंतूच समाजात युगेयुगे इतिहासाचं उत्खनन स्वतःच्या फायदयासाठी करताना दिसतात. आपल्या आपल्या कुवतीनुसार जातीपातीत संत, महापुरूषांची विभागणी करून त्यांना जातीच्या कोंदनात बसवून पुजा बांधली जाते.
मित्रहो, हा देश युवकांचा देश म्हणून सा-या जगात गणल्या जातो. परंतु येथील युवकाचे जगणे खरेच युवकासारखे आहे का? त्यांचे मानसिक वय किती वर्षाचे? असे प्रश्‍न निर्माण होतात. जी विद्याशाखा पुढे येते, युवक करिअरसाठी मोठया संख्येने त्या शाखेत प्रवेश घेतात, ती विद्याशाखा कालांतराने बेरोजगार करण्याइतकी पांगळी कशी काय होते, हेच कळत नाही. कुठलीही विद्याशाखा विस्ताराने खुप मोठी असते. तिथपर्यंत िंकंवा तिच्या आसपासही आपण पोहचू शकत नाही. आपण आपल्या प्रतिभाशक्‍तीच्या जोरावर त्या शाखेला अधिकाधिक समृद्‌ध करू शकतो, हे आमच्या गावीही नसते. म्हणून नवनविन संशोधनावर काय फक्‍त पाश्‍चात देशाचीच मक्‍तेदारी असावी?
ज्या समाजात प्रतिभावंत शास्त्रज्ञ , विचारवंत, कवी, कलावंत, खेळाडू जन्माला यायला हवेत, त्या समाजात जास्तीत जास्त संख्येने आता केवळ आणि केवळ "एकसारखे'च जन्माला येताहेत. जागोजागी मेंढराचे कळप तयार होताहेत. म्हणून आजचे "ज्ञानेश्‍वर' बेरोजगार होउन गल्लोगल्ली भटकताना दिसतात. त्यांच्या हाताला काम नाही. पुस्तकांच्या ठिकाणी मोबाईल आला आणि आमचे "ज्ञानेश्‍वर' आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवरून आपल्या कर्माच्या सुसाट ओव्या लिहित सुटले आहेत. या नवीन ऍप्सवरून नवीन नवीन अफवांचे पिक घेण्याचा मौसम अनुकूल होत आहे. नवनवीन शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या फायदयासाठी एखादया विषयावर "जावई शोध' लावून एखादयाच्या चारित्रयावर शिंतोडे उडविण्यातच सगळी उर्जा वाया घालविली जात आहे. कट्‌टयावर बसून फालतू चर्चांत वेळ दवडू लागले आहेत. संशोधनाची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याऐवजी "कॉपी पेस्ट' करून त्यात "मास्टरकी' मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात पुस्तकांची आवड कमी झाल्यामुळे मोबाईलवर "गेम' खेळून आपल्याच जीवनाचा"गेम' करण्याकडे आपला "इस्ट्रेस्ट' वाढत आहे. पुस्तकाला "गुगल' हा पर्याय असूच शकत नाही, असे शहाणीसुरती माणसं म्हणतात.
आपली विज्ञानाविषयीची समजूतही फारच बाळबोध. शाळेत शिकत असताना जेवढे विज्ञान आपण आत्मसात केले त्यापुढे काकणभरही न सरकण्याची शपथ आपण शिक्षण पूर्ण होताच घेउन टाकतो. सदयाच्या काळात विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यापैकी आपल्याला काय माहिती आहे. नवनवीन संशोधनांची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत केल्या जाताहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादालाही "क्‍वॉंटम थेरी'तून चॅलेंज मिळत आहे. अख्खे जीवनाचे संदर्भ बदलून टाकणारा अतिवेगवान क्‍वॉंटम कॉम्प्यूटर जन्मास येत आहे. भविष्यकाळात भौतीक शास्त्रातील अनेक सिद्‌धांत "ब्लॅक होल' किंवा कृष्ण विवरांमुळे मोडीस निघतात की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तरीही आपण मात्र वैज्ञानिक अहंकार जोपासतो आहोत. विज्ञानाचा अहंकार सांगून आपले "पुरोगामित्व' पुढे करण्याचा नवीन अंधविश्‍वास तयार होत आहे. मुळात बदलण्यापेक्षा अहंकार जोपसणे आपल्याला महत्वाचे वाटते. परंतु शास्त्रज्ञ मात्र आम्ही शून्य पॉईंट शून्यावर आहोत, अजून काही ठामपणे सांगू शकत नाही, असे प्रामाणिक कबुल करतात.
थोर शास्त्रज्ञ न्युटनला एकदा त्याच्या मित्राने विचारले की, तू हे सर्व शोध कसे काय लावतोस ? त्यावर न्युटन उत्तरला की मी महासागरातील अथांग पाण्यातील एक थेंब आहे. मी माझ्या मोकळ्या वेळात येशु ख्रिस्ताचे चिंतन करीत बसतो. आम्ही शास्त्रज्ञ शोध कसे लावले सांगू शकत नाही. आम्ही केमीकलमध्ये केमिकल मिसळतो. वायरला वायर जोडतो व त्या निष्काम प्रयत्नातून अचानक आमच्या डोक्‍यातून वीज चमकल्यासारखा लख्खकन प्रकाश पडतो व नकळत आमच्या हातून शोध लागून जातो. पण या क्रियेच्या पाठीशी एकमेव ईश्‍वर असतो, असे न्युटन म्हणतो तेव्हा आमच्या बुद्‌धीची किव करावीसी वाटते.
अलीकडे शे-दिडशे वर्षापूर्वी जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्याचे मुळ ज्ञानेश्‍वारीत सापडते, म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरणार नाही. सुर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरते. हा शोध कोपर्निकसने दिडशे वर्षापुर्वी लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोध असल्यामुळे धर्ममार्तंडांनी त्याचा छळही केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सुर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्‍वरीत सातशे वर्षापुर्वीचे पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. आणि उदो अस्तुतेनि प्रमाणे। जैसे न चालता सुर्याचे चालणे। तेसे नैष्कर्मत्व जाणे।
उदय आणि अस्त होत असल्यामुळे सुर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सुर्याचे न चालता भ्रम निर्माण होणे हा ज्ञानेश्‍वरांचा क्रांतीकारक शोध नाही का?
असे ज्ञानेश्‍वर पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत. तेव्हाच आम्ही "आता विश्‍वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे' अशा पसायदानातून सा-या जगात विश्‍वाचा महागुरू होण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकतो. म्हणून ज्ञानेश्‍वरांवर टिका करणा-यांनी ते आपल्या गोड भाषेत काय सांगतात, याकडे लक्ष द्यावे.
माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आईवडिल कसे असावेत, हे माझया हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्‌दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्‍कीच सुखी करू शकतो. मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करीत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल ती संधी मी गमाविता कामा नये.
विजयकुमार राउत
8888876462


 
Blogger Templates