Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 9 फ़रवरी 2017

अक्‍कल नाय? डोन्ट वरी.....


                                                                                                                 *विजयकुमार राउत
अक्‍कल नावाची काही गोष्ट आहे का तुझयाकडे? थोडी अक्‍कल तर वापरत जा ! परमेश्‍वराने अक्‍कल वाटली तेव्हा कोठे होतास रे?अशी वाक्‍ये नेहमीच्याच परिचयातली. अक्‍कल म्हणजेच सर्वस्व. थोडी चूक झाली की अक्‍कलेत कच्चे असलेल्यांना अक्‍कलवानांकडून टोमणे खाणे ठरलेलेच. बरं जो अकलेवरून इतरांना कमी लेखतो त्याने किती अकलेचे दिवे पाजळले याचा हिशेब मागायचा कोणी? काही जण दिवसरात्र "अकलेचेच तारे' तोडत बसतात. मित्रहो, सचिन तेंदुलकरने कुठली डिग्री घेतली? टाटा, धीरूभाई अंबानीनी कुठल्या "एमबीए'त गोल्ड मेडल मिळविले ? लता मंगेशकर यांनी गायनात कुठल्या विद्यापीठातून "पीएचडी' केले. देशविदेशात प्रत्येक मैफलीत "वाह उस्ताद' ही दाद घेण्यापूर्वी उस्ताद जाकीर हुसेन यांनी कुठल्या कॉलेजमधून "मेरीट' घेतले नाही. अशी अनेक उदाहरणे मिळतील. मग आपल्याजवळ "ती' नसली तर काय बिघडतं? असं कदाचित अक्‍कलशून्य माणसाला एखादवेळेस वाटू शकेल. परंतु अकलेच्या महाभागांना मात्र दुस-याजवळ नसलेल्या कुठल्यातरी नेमक्‍या अकलेबद्‌दल मरदुमकी वाटत असते आणि मग त्याच्या बुद्‌धीमत्तेवर अगदीच तोंडसुख घेणे म्हणजे शहानपणा समजतात. अक्‍कल नसली तर समाजात जगणंच अशक्‍य. बरं अक्‍कल आहे किंवा नाही हे कोणी ठरवावं?
बरं आज बुद्‌धीचे मापन करणा-या "आयक्‍यू'सारख्या "टेस्ट' खूप मागे पडल्याचे दिसून येते. एखाद्या क्षेत्रातील जेमतेम ज्ञान असणे आता "आउटडेट' होत आहे. आता नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होत आहेत. शैक्षकि मानसशास्त्रात आणखी नउ बुद्‌धीमत्ता जोडण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस नवनविन संशोधनातून पुढे येणा-या बाबीनुसार आता बुद्‌धीच असून चालत नाही. केवळ बुद्‌धी आणि बुद्‌धीच्या भरवशावर जगणारे पदोपदी मागे पडताना दिसतात. जुन्या संकल्पना नव्याने तपासून बघीतल्या जात आहेत. जुन्याला नवीन संकल्पनांची जोड देण्यात येत आहे. या संकल्पना नविन चष्म्यातून पाहण्यात येत आहेत. एवढच काय ते नाविण्य ! एरवी भारतासारख्या देशात या संकल्पना खूप खूप वर्षापूर्वीही होत्याच, हे आपण जाणतोच. या देशात तथागतांच्या बाबतीत "महाकारूनिक' आणि भगवान शंकराच्या बाबतीत "करूणावतारम' म्हटल्या जातं. "थर्ड आय' आणि "सम्यक ज्ञान' या अगदी समान संकल्पना. समाजातील असामान्य माणसं केवळ बुद्‌धीच्या भरोशावरच पुढे गेलीत का, याचा कित्येक दिवसापासून आढावा घेतला. असं लक्षात आलं की ज्या निसर्गानं आपल्याला मेंदू , ह्रदय यासारखी इंद्रीये दिली, त्याचा वापर कशासाठी करायचा? प्रत्येकाचं एक मर्यादित क्षेत्र आहे. प्रत्येकाचं कामही वेगवेगळं आहे. " IMGINATION IS GRATER THAN KWOLADGE* असं म्हणणारा असामान्य बुद्‌धीमत्तेचा धनी असलेला अर्ल्बटही आईनस्टाईनही काहीसं हेच सांगतो.
काल परवापर्यंत शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगाच "स्मार्ट' समजल्या जायचा. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमधील निसर्गरम्य ठिकाणी मातीत खेळणारे विद्यार्थी असोत नाही तर अमिर खानच्या "तारे जमिनपर' चित्रपटातील मंदबुद्‌धी समजला जाणारा विद्यार्थी. मंदबुद्‌धी म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या "न्यूटन'चेच उदाहरण घ्या. या देशात महान प्रतिभेचा शोध घ्यायचा असेल तर शेवटच्या बाकावरून घ्यावा लागेल, असे वक्‍तव्य डॉ.अब्दुल कलाम करतात,
"आयक्‍यू' सोबत आता तुमच्यात "ईक्‍यू' भावनिक बुद्‌धीमत्ता त्याचबरोबर "एसक्‍यू' आध्यात्मिक बुद्‌धीमत्ता नसेल तर बौद्‌धीक बुद्‌धीमत्ता कामाचीच नसल्याचे सिद्‌ध होत आहे. व्यक्तीच्या विकासात तार्किक बुद्धीइतकंच भावनेचंही महत्वव पुढं लक्षात येऊ लागलं आणि त्यातून भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन यांची संकल्पना पुढं आली. "इ' म्हणजे एनर्जी आणि मोशन म्हणजे गती यातून "इमोशन'शब्द आला. व्यक्‍तीच्या अवचेतन मनातील विचारांना सकारात्मक भावनांची जोड दिली तर स्वप्नांनासुद्‌धा पाहिजे तो आकार देता येतो, हे आजवरच्या महान प्रतिभावंताच्या कृतीतून दिसून येते. परंतु एवढयावरच संपले नाही तर आणखी एका बुद्‌धीमत्तेची गरज निर्माण झाली. त्याच्यापाठोपाठ गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर बहुविध बुद्धिमत्ता ही हॉवर्ड गार्डनर यांची संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्रात प्रचारात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बुद्धिमत्तेच्या नऊ वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर "एसक्‍यू'ही नव्याने आलेली संकल्पना सदया अख्ख्या जगात रूळली आहे. डॅना झोहर, सिंडी विगल्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी आध्यात्मिकता हा विषय केवळ धार्मिक अथवा तात्विक स्वरूपाचा नसून, मानसशास्त्रीय असल्याचं सांगून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा आधार दिला. त्यासंबंधीच्या मेंदूविषयक संशोधनाची जोड दिली आणि त्यातून माणसाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शास्त्रशुद्ध वेध घेतला.
लता मंगेशकर, पं.जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन आदी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या प्रकारात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्‍लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल. भावनिक बुद्‌धीमत्ता वाढविण्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणे, संगीत ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे यासारखे छंद जोपासता योत. प्रत्येक माणूसच संवेदनशिल असतो. परंतु त्याला आपल्या भावनांना निकोप बनविणे सहसा जमत नाही. भावनेच्या आहारी जाउन तो स्वतः कमकुवत करीत असतो. चित्रपट, नाटकातून अभिनय करणारा कलावंत काय करतो? भूमीकेत शिरून आपली भावनिक बुद्‌धीमत्ता पणाला लावूनच तो यशस्वी होत असतो. कला क्षेत्र भावनिक भूक भागविण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर अध्यात्मिक बुद्‌धीमत्ता कुठल्या धर्माशी जोडत नाही, तर आपले आपल्याशीच, आपल्या अस्तित्वाशी जोडत असल्यामुळे व्यवहारासोबतच जीवनातील प्रत्येक प्रसंगात यशस्वी होण्याचा मंत्र देते. प्रत्येक व्यक्‍ती काही ना काही वैशिष्टये असतात. ती शोधली तर आपल्याच "विक प्वाईंट'वर स्वार होउन यशाच्या दिशेने पुढचा प्रवास करता येतो. म्हणून आपल्याकडे काहीच नाही...म्हणून कुढत बसण्यापेक्षा तुमच्यातील उत्तम, सर्वोत्तम शोधले तर तुम्हीही जगात अप्रतिम होउ शकता. हे केवळ मी सांगत नाही, तर अलीकडचे संशोधन सांगते.
gazalesathi.blogspot.com

गुरुवार, 20 अक्टूबर 2016

सुफींचा स्वच्छंद


परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. या निसर्गापासून आपण जसजसे दूर होऊ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न निर्माण करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. निखळ हास्य ही मानवाला मिळालेली अप्रतिम अशी देणगी आहे, आणि तोच त्याचा स्वभावही. वेद-उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे अन्नकोष, मनकोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असा तो प्रवास आहे. "अन हल हक'ची साद देत रस्त्याने मस्तीत नाचत सुटलेला सुफी संत मंसूर खऱ्या धर्माचे अंतरंग उलगडतो. सुफी संप्रदायाचे तत्वज्ञान जीवनाच्या लयीशी तादात्म्य साधण्याचा एक छंद आहे, असं म्हटलं तरी चालेल.
प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते.
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी.
निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्‍स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्‍य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल्‌ फरिद, इब्न अल्‌ अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्‍वराच्या भक्‍तीकडे जाण्याची निवडली.
शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्‍चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
"इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे.

विजयकुमार राउत
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा रोड , नागपूर
8888876462

गुरुवार, 13 अक्टूबर 2016

सुफींचा सर्वेश्‍वरवाद


                                                                                           विजयकुमार राउत

परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे " पिंडी ते ब्रम्हांडी' असा तो मामला आहे. एक मात्र खरे या निसर्गापासून आपण जसजसे दूर होउ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न मग ते मानसिक असो वा शारिरीक पातळीवर निर्माण होत जातात. पुढच्या काळात समाजात अधिकाधिक मानसिक समस्याच उद्‌भवणार, असे एकंदर संशोधन सांगते. या सर्व समस्यांवर आध्यात्मिक जिवन जगणे हेच अचुक उत्तर असू शकते, हे एकंदर महात्म्यांच्या जीवन जगण्याच्या पद्‌धतीवरून लक्षात येईल. वेद उपनिषादतील "अहं ब्रम्हास्मी' असो किंवा सुफी संत मंसूर यांनी ईश्‍वर भक्‍तीत बेधुंद होउन दिलेली "अन हलक' ही हाक किंवा बुद्‌धांचे "अत्त दीप भव' तिन्हीचा अर्थ एकच. फक्‍त शब्दांचा काय तो फरक !
अध्यात्म हे शरिर आणि मनाच्या पलिकडे जाउन थेट शुद्‌ध आत्म्यापर्यंत घेउन जाणारे एकमेव शास्त्र आहे. त्यासाठी मानवनिर्मीात देवाची पुजा किंवा अंधश्रद्‌धेत गुरफटण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. कुठलाही धर्म असो वा संप्रदाय हेच तत्व नेहमी सांगतो आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. म्हणून अनेक संकटातून ताठ उभा राहणारा समाजपुरूष निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. थोडक्‍यात काय तर विज्ञान म्हणजे नास्तीकांचं अध्यात्म आणि आस्तिकांचं विज्ञान म्हणजे अध्यात्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे.
भक्‍तीचे विविध प्रकार प्रत्येक पंथात व धर्मात पहायला मिळतात. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप पाडली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते.
वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकारापर्यंची नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे फकिरी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ; ऑर्थोडॉक्‍स होता, असे म्हटल्या जाते. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथी इसमांच्या विचारांना व मतांना इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनी हाच सर्वेश्वरवाद ; पॅनथीइझम प्रस्थापित केला. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे, असं संशोधकांचं मत आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे, असे म्हणता येत नाही. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो, असे सुफी लोक मानतात व तद्‌नुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात.
सुफी मत किंवा तसव्वुफ याची व्याख्या त्याच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली आहे. हे मत मान्य असणा-यांनाही "सुफी' म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. अभिजात सुफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सुफी गुरुच्या म्हणण्यानुसार सुफी मत म्हणजे दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे, हे सांगणारे शास्त्र होय. विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सुफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सुफी त्याला "मत' समजत नाही. परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सुफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्म हा अंधश्रद्‌धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज नेहमी चमत्कारांपुढे नतमस्तक होत असल्यामुळे मुळे प्रवाह गढुळ होउन जातो. तेव्हा ख-या अर्थाने धर्म मरतो आणि मग उरते फक्‍त धर्माचे निष्प्राण कलेवर.
विजयकुमार राउत

8888876462
 
Blogger Templates