Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

परमात्मा गृहउद्योग प्रा.लिमीटेड

विजयकुमार राउत

एका मित्राच्या घरी लग्नसमारंभानिमित्त जाण्याचा प्रसंग आला. मित्र आणि त्याच्या कुटूंबातील सगळे प्रागतिक विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी लग्नसमारंभात परंपरेला फाटा देउन कार्यक्रमांची आखणी केली. प्रथापरंपरांना छेद देउन सामाजपयोगी कार्य करण्यासाठी कार्यक्रम आखला. अनाथ, अपंग मुलांना काही साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे नाव होते "आज देवाला सुटी आहे'. कार्यक्रमामागचा हेतू जरी चांगला असला तरी त्यावर बरीच टिका झाली. समाजात देवाला शिव्या देणारे किंवा देवाच्या नावाने दुकानदारी चालविणारे नेहमीच "देव' या शब्दांवरून द्वंद माजवितात. कुणी देव मानतात तर कुणी मानत नाहीत. दोघेही भांडणासाठी देव या शब्दाचा उपयोग करतात. आमच्या एका मित्राने कार्यक्रमाच्या शीर्षकावरून "देव काय चपराशी आहे, सुटी द्यायला, अशी उपरोधीक टिका केली. "देव' ही संकल्पनाच मुळात भांडणाचं कारण ठरत असेल तर अशा संकल्पना आपण वापरतोच कशाला? लग्न सोहळा हा त्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न. तसेच देव मानने किंवा न मानले हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. देवला मानले काय किंवा न मानले काय देवाला काहीच फरक पडत नाही. उलट मानला आणि नाही मानला तरी आपल्यावरच त्याचे परिणाम जाणवायला लागतात. भगवतगीता काय म्हणते किंवा ज्ञानेश्‍वर माउली काय सांगते, याविषयी समाजात चर्चा कधीच होत नाही. तर कार्यक्रमाच्या नावावरूनच टिकाटिपण्णी करून भांडण उकरून काढणार दोन्ही पक्ष समाजात दुही निर्माण करण्याचं काम करीत असतात. समाजात अस्वस्थता निर्माण करून सतत समाजाला वेठीस धरण्याचे काम करतात. ही भांडणं केवळ आजची नव्हे तर युगायुंगांची आहेत.
देवाचा मृत्यू झाला या नित्शेच्या वाक्‍यापासून श्रीराम लांगूंच्या "देवाला आता देवघरातून बाहेर काढले पाहिजे, या विधानापर्यंतचा वाद अजूनही समाजात अस्तित्वात आहेच. गीतेतला परमेश्‍वर , परमात्मा कुठे आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात तसा परमेश्‍वर किंवा कर्म, ज्ञानाच्या ठिकाणी स्थिारावलेला भक्‍त आपण समाजात पाहतो का? याचा कधी शोध घेतो का? ते सोडून प्रत्येकाने आपला स्वतःचा वेगळा "देव' निर्माण केला आहे. हिंदु, मुस्लीम,शिख, ईसाई यांच्या नंतरही अनेक पंथ वा धर्म जन्माला आले आहेत. त्यातूनही उपपंथ निर्माण झाले आहेत. एक लक्षात ठेवा हे धर्म, पंथ वा उपपंथ त्या त्या धर्मसंस्थापकांचे निर्वाण झाल्यावरच जन्माला आले आहेत. इतकेच नव्हे तर आजच्या काळात तर जितक्‍या व्यक्‍ती तितकेच त्याचे धर्म निर्माण झाल्याचे दिसून येतात. परमेश्‍वर किंवा धर्माच्या नावावर वाद होतात. कत्तली होतात. परमेश्‍वर हा शब्दच आता संकुचित आणि कलंकित झाला आहे. देवाचं नाव काढलं की काढलं तर त्याच्यावर हल्ला करणारे संधीच्या शोधातच असतात की काय? काळकर्त शिवराम परांजपेंनी "जसे लोक तसे त्यांचे देव' असे म्हटले होते. आता जितक्‍या व्यक्‍ती तितके देव अशी संकल्पना रूढ होउ पाहातेय. म्हणून आता "देव' ही संकल्पनाच गृहउद्योग प्रा.लिमीटेड कंपनीसारखी झाली आहे. देव, धर्म या संकल्पना स्वार्थी लोकांची दुकानदारी झाली आहे. धर्मगुरू एक ब्रांड घेउन समुहाला गोळा करून सर्वसामान्य जनतेला बनविण्याचे काम करीत आहेत. एक उपासना पद्‌धती हद्‌दपार केली तर दुसरी सुरू करून तिला मानणारे लोक गोळा केले जातात. त्यातून मनामनात द-या निर्माण करणे एवढीच काय ते या धर्मांनी दिलेली भेट होय.. समाजही फुशारकीने आपल्या छातीवर धर्माचा बिल्ला मिरवित असतो. त्याचे परिणामच केवळ आपल्याला भोगावे लागतात. धर्माचा योग्य अर्थ समजून घेणारे फारच थोडे या पृथ्वीतलावर झालेले आहेत. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, कबिर आणि असे कितीतरी संत धर्माला विशाल आकाश मिळवून देण्यासाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे इतिहास गौरवांकित झाला आहे. इतरांनी मात्र इतिहासाचे मढे उकरूनसमाजात दुर्गंधीच पसरविण्याचा धंदा केला आहे.

बुधवार, 16 दिसंबर 2015

कृष्णविवर


* विजयकुमार राऊत

आपलं व्यक्‍तीमत्व म्हणजे केवळ एक हिमनगाचा तुकडा. आयुष्यभर अव्यक्‍त राहिलेला भाग कितीतरी पटीने अधिक. आपणच आपल्यापासून दूर.. अंधाराखाली म्हणा नाहीतर अव्यक्‍त म्हणा. या अव्यक्‍त जाणिवेला आपला कधीही स्पर्श झालेला नसतो. या सृष्टीचे गणित म्हणजे जे दिसते त्यापेक्षा अदृष्य पातळीवर घडणारे असंख्य परिणाम आपल्यासाठी अपरिचित. हें जग भ्रम आहे ..कल्पना आहे.. असे भारतीय तत्वज्ञानात सांगीतलेले आहे.

आपले दोन डोळे या जगाचा वेध घेण्यासाठी मात्र नेहमी प्रयत्न करतात. पण अदृष्य जग हाती यायला मोठे परिश्रम पडतात हेच खरे. आता या प्रकाशाचेच उदाहरण घ्याना. प्रकाश तरी आपल्या दृष्टीत किती असतो बरं?. आपली गरज चिमूटभर प्रकाशाची असते. तो प्रकाश डोळयांच्या सिमा ओलांडून कधीच परावर्तीत होउन परत आलेला नसतो. मग आपण जे डोळयांनी पाहिलं आहे त्याचेच दावेप्रतिदावे करीत बसतो. वाद विवाद होतात. भांडणं होतात. मलाच सत्य गवसलं असा अट्‌टाहास होतो. या जगात बुद्‌द आले , येशू आले, भगवान श्रीकृष्ण .. सगळे सगळे महापुरूष आले .. पण त्यांनी या जगातलं अज्ञान दूर करण्याचा आपापल्या परिने प्रयत्न केला. परंतु कुठे झाला समाज विवेकी? कुठे गवसल्या प्रकाशाच्या वाटा? ज्ञान मिळाल्याचा पुरस्कार करताना एकमेकांच्या खोटयाला खरे माणनारे येथे एकमेकांना दाद देताना सत्याचा अपमान करीत असल्याचं कसं ध्यानात येत नाही, माणसाच्या.? बुद्‌धांनी सम्यक ज्ञान आणलं. मनुष्यजातीनं जिवनात अजिबात उतरविलं नाही.
ओन्ली दू थिंग इज इन्फीनाईट. फस्ट्र युनीवर्स अँड सेकंड हयुमॅन स्टुपीडीटी' असं आईनस्टाईन म्हणाला होता.बरोबर आहे ते. कारण अर्जुनाचा युद्‌धभूमीवर थरकाप उडाला असताना भगवान श्रीकृष्णांनी त्याचा धर्म सांगण्यासाठी आपलं साक्षात रूप दाखविलं. तेव्हा भगवंताच्या आकर्षक रूपानं अर्जुनाचे मन प्रसन्न झाले. ते रूप वारंवार पाहण्याचा तो अट्‌टाहास करू लागला. परंतु भगवंतांनी त्याला भानावर आणलं. "जे तुला आवडलं केवळ ते रूप माझं खरं रूप नव्हे, असे म्हणून भगवंतांनी आपलं विदारक रूप त्याच्यापुढे आणंलं तेव्हा तो मुच्छीत होउन पडला.
भगवान श्रीकृष्ण आधीच पूर्ण अवतार.साक्षात पुर्णत्व. यानिमित्ताने भगवंतांनी दिलेले ज्ञान समजून घेतलं तर आपल्याला जे आवडते आपण त्यालाच धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येते. परंतु ज्या गोष्टी अप्रिय आहेत, त्या गोष्टींशीही जमवून घेणं यालाच भगवंत पूर्ण सत्य म्हणतात. महान वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणतो ते सत्य आहे. कारण आपण प्रकाशालाच परमेश्‍वराचं रूपं मानून त्याची पुजा करण्याची आपली परंपरा आहे. संपूर्ण जगाला जीवन देणा-या सुर्याच्या मागचे जग जेव्हा नेहमी अंधारात राहते. त्याच्या प्रकाशात न येणारे कितीतरी विश्‍व त्याच्या प्रकाशावाचून अनंत वर्षे टिकून आहेच ना? ते जग एकाच वेळी पूर्ण झाकण्याचं सामर्थ्यही त्या सूर्यात नसते. या ब्रम्हांडात अनंत कोटी सूर्य आहेत. तरीही विश्‍वातले "कृष्णविवर' त्यापेक्षा अनंत पटीनं मोठे आहे. भौतिकशास्त्रातील कुठलेच नियम तेथे लागू पडत नाही. विज्ञानात प्रचलित झालेल्या सगळया व्याख्या, गणिते... सगळे सगळे फेल ठरतात. आपल्या अवचेतन मनाच्या शक्‍तीचेही तसेच आहे. ज्या मनाची या लौकिक जगात सदानकदा सोबत असते ते चेतन मन. केवळ 20 टक्‍के एवढंच. उर्वरित 80 टक्‍के शक्‍तीचं भांडार मात्र अवचेतन मनात साठलेलं असतें. या अवचेतन मनाच्या शक्‍तीचा अनुभव घेतल्याशिवाय जगातील बहुसंख्य जिव जगाचा निरोप घेतात. विज्ञानाच्या भाषेतही हेच लागू पडतं. डावा मेंदू क्रियाशिल असल्यामुळे उजव्या मेंदूकडे दुर्लक्ष करून त्याच्या अगणित सामर्थ्याचा अनुभव घेण्याइतके आपण प्रगल्भ नसतो.
                                                                * विजयकुमार राऊत


गुरुवार, 3 दिसंबर 2015

देव देवळात नाही तर माणसाच्या अवचेतन मनात !


                                                                                     * विजयकुमार राऊत

तथागत भगवान गौतम बुद्‌ध देव, पुर्नजन्म किंवा आत्मा या गोष्टीचं खंडण करतात. ज्या गावात किंवा नगरात त्यांचे प्रवचन असे तिथे आदल्या दिवसीच दवंडी देउन या तिन्ही गोष्टींबद्‌दल कुणी काही विचारू नये, असे जाहिर करण्यात येत असे. अगदी तपश्‍येच्या काळात मानवी जीवनातील सुखदुःखाच्या मुळाशी जाउन माणसाला दुःखमुक्‍त कसं करता येईल, यावर त्यांनी तत्कालीन गुरूंनी सांगीतलेले शास्त्रातील सगळेच मार्ग अवलंबिले होते. परंतु सगळं निरर्थक झालं. शेवटी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी सगळे बनेबनाव नाकारले.त्यात "देव'ही संकल्पनाही आहे. देव म्हणताना प्रत्येकाचा "देव' हा वेगळा असतो. तो परंपरेने जसा असतो, तशीच कल्पना करून देवाचे रूप ठरविल्या जाते.

माणसाला शेवटी प्रत्येक गोष्टीत समाधान हवे असते. नैसर्गिक नियमाप्रमाणे त्याचे मन उत्तरासाठी कासाविस झालेले असते. बुद्‌धांनी तर थेट देवलाच नाकारले. त्यामुळे व्यावहारीक जगातील सगळी गृहितकेच ढसाढसा कोसळली. बुद्‌धांनी तथाकथित देव संकल्पना नाकारण्यामागचे रहस्य काय? त्या खोलात जाण्यापूर्वी जगातले सगळे शास्त्र तपासून बघीतले की एक सुत्र हाती लागतं. परमेश्‍वराचा शोध घ्यायला बाहेर पडलेला माणूस शेवटी स्वतःपर्यंतच येउन पोहचतो, हे अध्यात्म सांगते. बुद्‌ध महत्वाचं काहीतरी शोधायला गेले आणि स्वतःपर्यंत येउन नाही का येउन पोहचले? शेवटी हिंदू धर्मातच नव्हे तर इतरही धर्मातील "देव' ही संकल्पना काही धर्मांध लोकांनी स्वतःच्या फायदयासाठी कशी राबविली, हे लक्षात येईल. संत ज्ञानेश्‍वरांना जो बोध होतो, त्यालाच आत्मबोध म्हणतात. तथागत त्याला "स्वयंदीप' होणे म्हणतात. तर हिंदू धर्मात त्याला ब्रम्हज्ञान म्हणतात. आज या लेखात देव, आत्मबोध, स्वयंदीप होणं किंवा ब्रम्हज्ञान म्हणून ज्या गोंष्टींबद्‌दल आपल्याला कुतूहल असते त्याबद्‌दल थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परमेश्‍वराच्या शोधाची सुरवात कुठूनही करा, तरी एक अवकाश मात्र शिल्लक राहतं. नदी जशी कुठूनही उगम पावते आणि सर्वात शेवटी सागरालाच जाउन मिळते. अगदी त्याप्रमाणे सगळे शास्त्रच अध्यात्मशास्त्राला जाउन मिळतात. नास्तिक असो वा आस्तिक सगळयांचा प्रवास शेवटी त्या अनंताच्या दिशेनेच होतो.
आता मानसशास्त्रातील संकल्पना थोडी समजून घेउया. माणसाला जागृत आणि अजागृत अशी दोन मने असतात, हे सिग्मंड फ्राईडनंच मानसशास्त्रातील संशोधनातून स्पष्ट केलं. आपल्याकडे मनाचं विज्ञान फार प्राचीन आहे. जागृत मन हे फक्‍त वीस टक्‍के आणि 80 टक्‍के अर्धजागृत मनाचा व्याप असतो. या वीस टक्‍के मेंदूपैकी आतापर्यंत सगळयात जास्त मेंदू महानशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईननेच वापरला म्हणतात. "परमेश्‍वर' संकल्पनेच्या निर्मीतीसाठी हा मेंदूच काय तो कारणीभूत आहे. मेंदूच परमेश्‍वराचं उगमस्थान आहे, असं म्हणतात ते अगदी शंभर टक्‍के खरं आहे. या अर्धजागृत मनात जी अमर्याद शक्‍ती आहे, तिला जागृत करण्यासाठी आपल्याला पुन्हा अध्यात्मशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. कारण ती जागृत करणे म्हणजे फार परिश्रमाचे आणि अशक्‍य कोटीतील आहे. इथं झुठ किंवा नकारात्मक विचारांना तिलांजली द्यावी लागते. खरं तर हा एक "देव' होण्यापेक्षा "माणूस' होण्याचाच प्रयत्न असतो. आपण सकारात्मक असलो म्हणजे कल्पनेशी सहचर्य करून थोडीफार त्या ज्ञानाची अनुभूती व्हायला लागते. कल्पना केल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरविण्याची उर्वरित कामगिरी मेंदूच पार पाडतो. मेंदूला जागृत करण्यासाठी कसे आचरण असावे हे सांगते अध्यात्मशास्त्र ! आता पुन्हा आपण विज्ञानाकडे वळलो तर असं दिसून येईल की अगोदर विज्ञानही अशा अलौकिेक शक्‍तीचं अस्तित्व मान्य करायला तयार नव्हतं. कारण विज्ञानाचा सगळा खेळ चालतो भौतिक जगात माणसाला आलेल्या अनुभवांवर. परंतु अध्यात्मात सांगीतलेले बरेचसे प्रयोग काही काळानंतर विज्ञानालाही सिद्‌ध झालेले आहेत. अणूरेणू किंवा सुक्ष्म लहरीपर्यंत (फ्रिक्‍वेन्सी ) विश्‍वाचे रहस्य मंद गतीने का होईना विज्ञानाच्या हाती आले आहे. शास्त्रज्ञांकडून त्या मागचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न हा नेहमी होतच असतो आणि भविष्यातही होत राहिल. विज्ञानाने डावा मेंदू आणि उजवा मेंदू अशी विभागणी केली आहे. डावा मेंदू हा व्यवहारी असतो. तर उजवा मेंदू हा एकंदर भोळा असतो. आपण नाही का शंकराला भोळा म्हणून संबोधतो. हा भोळा शंकर रावणाच्या भक्‍तीलाही पावतो. तो चक्‍क रावणालाही वरदान देउन टाकतो. नंतर या रावणाच्या उपद्‌व्यापाचा प्रभू रामचंद्रानाही भयंकर त्रास होतोच ना. या अवचनेत मनाची शक्‍ती मात्र अफाट आहे. डावा मेंदू संशय किंवा तार्किकतेचा आधार घेउन व्यवहार करतो. व्यवहारात जे काही शिकतो ते डाव्या मेंदूचं कार्य आहे. उजवा मेंदू मात्र आतल्या स्फुर्तींवर चालणारा, म्हणून तो तार्किकतेच्या पलिकडे असतो. "अल्लादुनीचा चिराग' असतो ना तसं उजव्या मेंदूचं कार्य आहे. त्याला पाहिजे ते मनात टाका , त्याप्रमाणेच तो कार्य करण्यास सिद्‌ध होतो. म्हणजे हा मेंदू "ब्रेन प्रोग्रॅमिंग' करतो. संगणकाच्या भाषेत तो "साप्टवेअर' आहे.
आजपर्यंत महान व्यक्‍तींचा इतिहास बघीतला तर एडीसन किंवा मादाम क्‍यूरी यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यात याच मेंदूने महत्वाचे योगदान दिल्याचं वाचनात आले. उजवा मेंदू हा भोळा भाबडा असला तरी त्याच्याजवळ अमर्याद शक्‍तीचं भांडार आहे. तो सुप्त असला तरी त्याला जागृत करण्यासाठी आजच्या युगात अनेक मार्ग अवलंबिण्यात येतात. अध्यात्मशास्त्र म्हणून प्राणायाम किंवा कुंडलिनी जागृतीचा मार्ग सांगते.
मानसशास्त्र चेतन, अवचेतन मनाच्या भाषेत मेंदूचं विभागणी करतं. अवचेतन मनाची शक्‍ती ही 80 टक्‍के असल्याचं मानते. तर मेंदू विज्ञान डाव्या आणि उजव्या भागात विभागणी करून उजव्या मेंदूत खूप मोठी शक्‍ती कार्यरत असल्याचं सांगते. त्या दृष्टीने माणसात पाहिजे तसे परिवर्तन घडविता येत असल्याचं आधुनिक विज्ञान सांगते. अध्यात्मशास्त्र मात्र कुंडलिनीच्या रूपात सगळी शक्‍ती सुप्तावस्थेत मुळाधार चक्रात सापासारखी तीन वेटोळे घालून बसल्याचं हजारो युगांपासून सांगते आहे. ही शक्‍ती जागविल्यास अत्त्युच्य उच्च संवेदना जाणवायला लागतात. माणसाचा प्रवास एका अद्‌भूत जगात व्हायला लागतो.
                                                                              * विजयकुमार राऊत



 
Blogger Templates