Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

सोमवार, 6 जुलाई 2015

आदमी अच्छा होगा !

                 


                                                                               * विजयकुमार राऊत
व्यक्‍तींच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याची आताशा सवयच झाली. प्रत्येक व्यक्‍ती माझयासाठी एक खुली किताब आहे. तोच माझी कविता आहे, तोच माझी गझल आहे..कुराण अन्‌ गीता ग्रंथही तोच आहे...तोच माझं एकंदरीत भावविश्‍व आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना या ना त्या स्वरूपात माणूसच सर्वप्रथम भेटतो. या जगतात नाईलाजाने का होईना सर्वप्रथम माणसांशीच नाते जोडावे लागते. तुमच्या अवतीभवतीचं जग माणसांनीच तर भरलेलं आहे. या माणसांच्या जगात वावरताना तुम्हालाही सर्वसामान्य माणूसच व्हावं लागतं. हे सर्व करीत असताना आपल्याला भेटलेल्या माणसाशी आपण वागलो तशी मिळालेल्या अनुभवातून त्याची प्रतवारी ठरवितो. त्याला व्यवहाराच्या कोंदणात बसवतो. काही काही माणसं समाजाला न परवडणारी असतात. तर काही आपल्या विचारांनी समाजात बंड घडवून आणणरी असतात. आपल्या विचारांशी सहमत होणारा माणूस केव्हा आपला होउन जातो कळतंच नाही. इतरांना मात्र आपण आपल्या दारातून बेदरकारपणे हुसकावून लावतो. आपल्या विचाराला छेद देणारा माणूस नक्‍कीच आपला शत्रू होउन बसतो. सामाजिक नितीनियमांच्या विरोधात वागणारा माणूस तर अख्ख्या समाजाचा शत्रू होतो. माणसाच्या हिताच्या गोष्टी करणारा माणूस, सत्य सांगून त्याला योग्य मार्ग दाखविणारा माणूस हा रिकामटेकडा ठरविल्या जातो. कोण केव्हा परका वाटेल हे सांगता येत नाही.
समाजातून बहिष्कृत केलेली माणसं नेहमीच उपेक्षेचा विषय असतात. त्याला दुषणं देण्यात येतात. परंतु माणूस वाईट झाला म्हणून त्याला दूर लोटणे कुठल्या शास्त्रात बसते. अशा व्यक्‍तीचे पैलू शोधून काढणे कोण्या येरागबाळयाचे काम नव्हे. विल्सन चर्चिल म्हणतो की तुमचे कुणी शत्रू आहेत? फार चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कधीतरी मुल्यांच्या बाजूने उभे राहिला होता. प्रत्येक माणूस एक शास्त्र सांगत असतो. त्याच्या व्यक्‍तीमत्वातून असंख्य हिरे, माणके शोधून काढता येतील कदाचित. साहित्यातील अशा कितीतरी व्यक्‍तीरेखा अफलातून माणसाच्या व्यक्‍तीमत्वातूनच अजरामर झालेल्या आहेत. प्रत्येक शास्त्र माणसासाठीच जन्माला आलेलं आहे. सगळी शास्त्रेच माणसाच्या भोवती घुटमळतात. जागोजागी बदलत जाणारी सामान्य माणसंही काहीतरी नकळतपणे शिकवून जातात.
माणसाला फक्‍त उणिव असते प्रेमाची. प्रेमातून माणसं उलगडत जातात...कळत जातात. निदा फाजली नावाचा शायर म्हणूनच म्हणतो.
उसके दुश्‍मन है बहोत, आदमी अच्छा होगा
तरह वोभी शहर मे तन्हा होगा !
अशी हद्‌दपार झालेली, बेताल जगणारी माणसंच ख-या अर्थांनं मस्तीत जगत असतात. म्हणूनच माणूस हा न उलगडणारं एक कोडं होउन बसतो. त्याला आपल्या व्यवहाराच्या गणितात कितीही पडताळलं तरी तो कळंतच नाही. त्याच्या मनाचा व एकंदर स्वभावाचा कितीही अभ्यास केला तरी तो पूर्णतः तसा अपरिचितच असतो. म्हणूनच सुप्रसिद्‌ध नाटककार विजय तेंदूलकर त्याला "माणूस नावाचं बेट' असं संबोधतात. एक अपरिचित बेटच तर असतो माणूस. कुठलाही दुराग्रह न बाळगता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या व्यक्‍तीमत्वाची अनेक दालनं उघडू शकतील कदाचित. कधी न कळणारी बेताल वागणारी माणसंच आयुष्याला आणि विचारांना वेगळी कलाटणी देउन जातात. मानशास्त्रीय दृष्टीकोनातून विविध प्रवृत्तीची माणसं समाजात मानसोपचार तज्ज्ञांनाही कळायला "चॅलेंज' करतात. त्यापेैकी अनिर्बंध, बेताल जगणारी माणसं, आपल्याच विश्‍वात रमणारी माणसं, दुःखातही सुखाचा मुखवटा घेउन जगणारी माणसं, दुस-यांसाठी धडपडणारी माणसं, कुढत कुढत जगणारी माणसं,प्रेमासाठी व्याकुळे झालेली माणसं, एकलकोंडी माणसं, माणूसवेडी माणसं, सुख मिळताच धबधब्यासारखी कोसळणारी माणसं, दुःखातून वेडी झालेली माणसं, माणूस जातीचा तिरस्कार करणारी माणसं , एखाद्याच्या अनुपस्थितीत उणीधुनी काढणारी माणसं, सदा न कदा जिवनाची क्षुल्लक कारणांवरून तक्रार करणारी माणसं, दुस-यानं त्याचं ऐकावं म्हणून सतत काही ना काही करून लक्ष वेधणारी माणसं, सतत प्रसिद्‌धीच्या झोतात राहून स्वतःला चर्चेत ठेवणारी, एखादया विचारावर ठाम असणारी माणसं, काही जगावेगळी माणसं अशी असंख्य माणसं या समाजात सर्वत्र विविध रंगात भेटत असतात. माणसाचं वैविध्यच दुनियेला विविध रंगी करून जातं. वाल्याचा वाल्मीक होतो, अंगुलीमालसारखा भगवान बुद्‌धांना शरण येउन योग्य मार्गाला लागतो. मग रस्ता सोडून चालणारी माणसं रस्त्यावर परत येउ शकत नाही का?

विजयकुमार राऊत
नागपूर, राज्य महाराष्ट्र (भारत)
मोबाई क्रमांक ः 8888876462



शुक्रवार, 3 जुलाई 2015

शार्टकट

                                                                             
                                                                                * विजयकुमार राऊत

आजचा जमाना "फास्ट फुड'चा आहे. पिज्झा, बर्गर खाणे मुलांना खूप आवडायला लागले आहे. लोकांना आता क्षणभर थांबण्याची मुळीच उसंत नाही. कुठलीही गोष्ट त्वरीत व्हायला पाहिजे. धावपळ, जिवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. उर फाटेस्तोवर धावणे हेच आजच्या यशस्वी होण्यामागचं सुत्रं ठरत आहे. ही एवढी दौड कुठून आली? ही अघोरी स्पर्धा कशाची? ती कशी निर्माण झाली? सामाजिक बदलातून, मनाच्या अधीरतेतून झालेले हे परिवर्तन आहे की झटपट यशस्वी होण्यासाठी "शार्टकर्ट' शोधण्यातला हा पुरूषार्थ आहे? आजूबाजूची परिस्थिती बदलली की समाजात, वातावरणात किंवा अवतीभवतीच्या एकंदर जीवनमानात त्याचे बदल हळूहळू जाणवायला लागतात. आज सगळयाच क्षेत्रात एकंदर हीच स्थिती आहे. मनाची अधिरता वाढली की एखादी वस्तू मिळविण्यासाठी उताविळपणा निर्माण होतो. "तू मेरी नही तो, औरो की भी नही हो सकती' हा डॉयलॉग फक्‍त चित्रपटातूनच ऐकायला मिळत नाही. त्याचा शिरकाव आता समाजातही झाला असल्याचं वेगवेगळया घटनांमधून वाचायला मिळते. मला मिळाले नाही तरी चालेल, परंतु ते त्यालाही मिळता कामा नये, ही क्षुद्र भावना वाढीस लागली. क्रिकेट शौकीन पूर्वी कसोटी मॅच पाहाण्यात चार पाच दिवस टिव्हीसमोर घालवित होते. आता हीच मॅच वनडे वरून ेट्‌व्नटी ेट्‌व्नटीवर आली आहे. तीन...साडे तीन तासांचा चित्रपट आता दीड दोन तासांवरूनही "शार्ट' होत चालला आहे. जे सांगायचं ते थोडक्‍यात सांगा... फापट पसारा नकोच. कुणाला वेळच नाही. वृत्तपत्रांचे वाचन करण्याची वेळ कमी होत चाललेली आहे. ही वृत्ती कशाचे द्योतक आहे? आजच्या स्पर्धेच्या मागेही हीच मानसिकता पहायला मिळते. या धावपळीच्या युगातील ही अपरिहार्यता आहे?

गेल्या वर्ष दोन वर्षातील ठळक राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर यावरून समाजातील एकंदरीत दिशा स्पष्ट होते. आपला देश हा अवतारांचा देश आहे. अवतारात एक तारणहार शोधण्याची हजारो वर्षांची सवय आपल्या जिन्समध्ये सामावलेली आहे. राजकीय क्षेत्रात अशा काही हालचाली झाल्यानंतर थोडफार सत्य गवसतं. कुणीतरी अवतार या पृथ्वीतलावर येईल आणि आमचं कल्याण करेल, केवळ याच कल्पनेत सगळे रंगून गेलेले दिसतात. अगदी ठळकच सांगायचे झाले तर दोन वर्षापूर्वी दिल्लीत रंगलेला अण्णा हजारे नामक तमाशा थेट चॅनलमार्फत घराघरात पोहचला. तेव्हा पुन्हा एकदा चार पाच दिवस चालणा-या कसोटी क्रिकेट मॅचची आठवण झाली. अण्णांच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये सगळयांना कोण उत्सुकता होती ! दिवसभर टिव्हीसमोर बसून आबालवृद्‌धांची उत्कंठा शिगेला गेल्याचे दृष्य पाहून अण्णा आता या देशाचे तारणहार होणार की काय, अशी शंका अनेकांच्या डोक्‍यात यायला लागली. त्यानंतर अण्णांना दुसरे गांधी असा शिक्‍का मारून त्यांना गांधीजींचाही एक नवा अवतार बहाल केला. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनाची घडी विस्कटली आणि केजरीवाल नावाचे तुणतुणे वाजायला लागले. केजरीवाल यांनाही लोकांनी डोक्‍यावर घेतले आणि अनिल कपूर यांनी भूमीका केलेल्या एका चित्रपटातील एक दिवसाचा मुख्यमंत्री जिवंत झाल्याचा भास जनतेला होउ लागला. "सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही , मेरी कोशिश है की यह हालात बदलने चाहिए' हा दुष्यंतकुमारांचा शेर त्यांनी केजरीवाल यांना पाहूनच लिहिला की काय, असे जनतेला वाटू लागले.
कविता आणि राजकाराणातलं फारसं काही कळत नसलेल्यांनाही केजरीवालांच्या भाषणावरून ते युगप्रवर्तक असल्याचे चित्र तयार झाले. तोपर्यंत दुसरा हिरो राजकीय पडद्यामागे एंट्रीची भक्‍कम रिव्हर्सल करीत होता. तो चेहरा होता मोदींचा. केजरीवालांची जादू "सरपे चढके' बोलत होती. मोदी फक्‍त केजरीवाल नावाच्या वादळाला शांत होण्याची वाट पाहात होते. देशभरात लगेच लोकसभा निवडणुका लागल्या. केजरीवाल यांनी लोकसभेच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मोदी घराघरात पोहचल्याने आणि केजरीवालचे जादू संपत आल्याची चाहूल लागताच मतदारांनी केजरीवाल यांची साथ सोडली व मोदी यांनी रंगमंचावर "एंट्री' केली. मोदी बहुमताने विजयी झाले. निवडून देणारेच आता मोदींविरूद्‌ध आरोळी ठोकायला लागल्याचे पुसट चित्र दिसू लागले आहे. जनतेचा यात दोष म्हणता येणार नाही. मोदींनी स्वतःची जी प्रतिमा निर्माण केली, ती निभावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
एकंदर या देशाला चटकन जादूची कांडी फिरविणारा कुणीतरी जादूगर हवा आहे की काय, अशी शंका निर्माण होते. अलीकडे चमकणा-या हिरोंचा कार्यकाळ केवळ क्षणभंगूर ठरला आहे. यावरून जनतेच्या मनावर आता दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारा नेता निर्माण करण्याची वेळ निघून गेली की काय, अशी शंका निर्माण झाली.

                                                            * विजयकुमार राऊत 

                                                             mob-8888876462

बुधवार, 1 जुलाई 2015

दृष्टीदोष


                                                                                                 * विजयकुमार राऊत
दैनंदिन जीवनात पावलोपावली निखळ आनंदापासून आपणा स्वतःला कोसो दूर ठेवित असतो. केवळ आपण आपल्या दृष्टीची व्यापकता जर रूंद केली नाही तर त्या वस्तूपासून मिळणा-या आनंदालाही आपण खरे तर पारखे होउन बसतो. वस्तू निसर्गतः जशी आहे तसे पाहणे म्हणजे त्याला दृष्टी प्राप्त करणे म्हणता येईल. उर्दू साहित्यात याला "नजर पैदा' करणे असे म्हणतात. जगभरातील महापुरूषांनी ही नजर मिळविण्यासाठी आपल्याला अनेकदा सचेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा विशाल समुद्र पाहिला तेव्हाची अनुभूती पुन्हा दुस-यांदा येईलच असे नाही.
इंद्रिये यांत्रिक होत गेलीत की आपली नजरही संवेदनशिलता गमावून बसते. जे आहे अगदी तशीच अनुभूती घेता आली तर त्या वस्तुतील आनंद अवर्णणीय असतो. आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन हा अवतीभवतीच्या पूर्व संस्कारातून तयार झालेला असतो. आपण दैनंदिन जीवनात कुठलेही काम करीत असताना जो यांत्रिकपणा येतो, त्यामुळेच मनुष्य दुःखाला जवळ करून सर्वस्व गमावून बसतो.
आपल्याला कुठल्याही वस्तूवर आपल्या मतेमतांराचे खोटे शिक्‍के मारण्याची सवय झालेली असते. हे शिक्‍के त्या व्यक्‍तीबद्‌दलच्या असणा-या स्मृतितून निर्माण झालेले असतात. ही बाब समजून घेण्याकरीता एका साध्या गोष्टीचे उदाहरण देतो. केदारनाथला आलेला प्रलय. ही घटना साधी नैसर्गिक आहे. ती जशी आहे तसे तिच्याकडे पाहणे म्हणजे सत्याचे ज्ञान करून घेणे होय. परंतु आपल्यावर संस्काराने दिलेल्या चष्म्यातून आपण त्या घटनेकडे पाहिले तर आपण सत्यापासून दूर जात असल्याचे कळते. बद्रीनाथ-केदारनाथच्या दुर्घटनेत हजारो नागरिक वाहून गेले. फार मोठया प्रमाणात नुकसान झाले. परंतु या घटनेकडे पाहणारे मात्र आपले वेगवेगळे दृष्टीकोन व्यक्‍त करताना दिसतात. कोणी म्हणतात केदारनाथसारख्या तिर्थस्थळी भाविकांना आलेले मरण ही देवाची मर्जी असल्यामुळे त्यांचे जीवन कृत्य झाले. दुसरा एखादा म्हणतो, दुनियेत पाप फार वाढलं होतं ते साफ झालं. तिसरा या दुर्घटनेतून सुखरूप बचावणारा देवाच्या कृपेचे गुणगाण करीत असतो. देवाच्या कृपेने वाचल्याचा आनंद व्यक्‍त करताना तो पुुन्हा एक अंधश्रद्‌धा निर्माण करतो. आता सांगा कोण खरा आणि कोण खोटा ? कारण निसर्गनियमानुसार ही घटना ही नैसर्गिक आपत्तीच होती. त्यासाठी बव्हंशी माणूसच जवाबदार आहे. अशा घटना घडणे पृथ्वीतलावर सतत सुरूच असते.अशा घटनेत आपण देवाला मध्ये आणून आपले समाधानच करीत असतो की नाही? मला सुप्रसिद्‌ध साहित्यीक यशवंत मनोहर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं एक वाक्‍य आठवते. निसर्ग हा असाही नसतो किंवा तसाही नसतो. तो केवळ असतो, हेच सत्य आहे. आपण मात्र निसर्गाला दयाळू, कृर असे संबोधून त्याच्यावर उगाच आरोप किंवा त्याचे गुणगाण गात बसतो. आरोप केल्याने त्याचा राग आपण ओढवून घेत नसतो किंवा गुणगाण केल्याने तो आपल्यावर फार प्रसन्न होतो असेही नाही. आपण मात्र माणसाचे गुण निसर्गावर उगीच लादत असतो. कारण सत्य स्वीकारणे आपल्याला झेपत नाही किंवा तशी दृष्टीच आपल्याला अवगत झालेली नसते. जीवन जगत असताना निसर्गाच्या हातात हात घालूनच स्वतःचा सर्वांगिण विकास साधत जगणेच केवळ आपल्या हातात उरते. चीनमधील "ताओ' धर्मही हेच सांगतो.
पृथ्वी सुर्याभोवती फिरत असल्याचा कधीकाळी आपल्याला भास व्हायचा. मात्र गॅलिलिओंने फक्‍त एका तर्काच्या आधारे आपला समज साफ चुकीचा असल्याचे नाही का सिद्‌ध केले? पृथ्वी सपाट असल्याचे दाखले धर्मग्रंथांच्या पानापानावर दिसतात. पृथ्वी या ग्रहाबद्‌दल किती किती गैरसमज होते म्हणून सांगावे ! ही पृथ्वी शेषनागाच्या पाठीवर असल्याचे कधीकाळी सांगण्यात यायचे. परंतु आजच्या प्रगत विज्ञानाने हे साफ चुकीचे असल्याचे सिद्‌ध केले. असे अनेक गैरसमज काळाच्या कसोटीवर फोल सिद्‌ध झालेले आहेत .
समाजात एखादया व्यक्‍तीच्या बाबतीतही असेच अनुभवायला मिळते. अमुक व्यक्‍ती धार्मिक अन्‌ तुमक व्यक्‍ती अधार्मिक अशी धारणा करून आपण त्या व्यक्‍तीला पूर्णपणे जाणण्यापासून दूर ठेवतो. खरे तर व्यक्‍ती जशी आहे तसे स्वीकारणे आपल्या व्यवहारात परडण्यासारखे नसतेच.शब्दही मानवाने निर्माण केलेले असता आणि अर्थही. आणि म्हणूनच एका टप्प्यावर आपल्याला जग अर्थहिन वाटायला लागतं.
                                                                         * विजयकुमार राऊत
                                                                                8888876462


 
Blogger Templates