Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 16 अप्रैल 2015

जिंदगानी

                                            विजयकुमार राउत
दरिया मे जैसे लहर जिंदगानी
जरा बात करलू ठहर जिंदगानी !

अंदाज तेरा हे सबसे निराला
कभी शाम तू, सहर जिंदगानी !!

मेरा पता ना अब मुझको पुछों
कभी गाव था, अब शहर जिंदगानी !!

हस-हसके मैने जो तुमको जिया है
हमपे न ढा- ओ कहर जिंदगानी !!

हाथो से तुमने कभी मय पिलादी
तेंरे हाथ से दो जहर जिंदगानी !!

पत्थरपे फुलो को है खिलते देखा
पतझड मे भी तू बहर जिंदगानी !!

मेंरी सास मे, है अहसास मे तू
तुझसे जिंने का हुनर जिंदगानी !!


                                                                 विजयकुमार राउत

गुरुवार, 9 अप्रैल 2015

कळेना आमची भाषा !


                                                  विजयकुमार राउत
जागतिक किर्तीचे भाषा अभ्यासक व संशोधक डॉ.गणेश देवी यांनी घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जगातील दोन हजार वर्षांनंतर शब्दभाषा लोप पावतील व शब्दांची जागा चिन्हे व प्रतीके घेतील, अशी भीती व्यक्‍त केली आहे. त्यांचे बोलीभाषा व भारतीय भाषा यावर मोठे योगदान आहे. त्याबद्‌दल त्यांना पद्‌मश्री पदवीने सम्मानितही करण्यात आले आहे. भारतात 1961 साली1652मातृभाषांपैकी 108 मातृभाषांची आज नोंद आहे. याचा अर्थ चार दशकात 1500भाषा मरणपंथाला गेल्या आहेत. जगात आज सहा हजार भाषा आहेत. असाच धोका कायम राहिला तर चार हजार भाषा मरतील, असे संशोधकांना वाटते. वसाहतवाद, जागतिकीकरणाचा रेटा, व्यापारीकरण हे भाषा मरण्यामागचे कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जसजसा उत्क्रांत होत गेला तसे तसे त्याने अनेक शोध लावून स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा कसे सरस आहोत, हे सिद्‌ध केले. व्यक्‍त होण्यासाठी त्याने सर्वप्रथम भाषेचा शोध लावला. शब्दांच्या नाद व लयीतून तो एकमेकांना समजून घ्यायला लागला. निर्सगातील प्रत्येक अनुभवाला शब्दात पकडण्यासाठी धडपडू लागला. शब्दांची योजना करू लागला. एकमेकांशी संवाद साधण्याचं तंत्र त्याला अवगत झालं. भाषेच्या उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला खूप समाधान वाटू लागलं. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला शब्दात पकडल्यानंतर त्याला स्वर्ग अगदी दोन बोटांवरच उरला. त्याच्या मनाची कवाडे त्याने भाव भावना व्यक्‍त करण्यासाठी सताड उघडी केली. त्यानं शब्दांची पुजा बांधली. नादब्रम्ह, शब्दब्रम्हाचं रूप त्याला बहाल केलं. परंतु पुढे मात्र तो जस जसा उन्नत होत गेला तसतसे अनुभव व्यक्‍त करण्यासाठी त्याला शब्द कमी पडू लागले. शब्दांच्या कमतरतेमुळे किंवा अतिरेकामुळे विसंवाद वाढू लागला. जे माध्यम सुसंवाद घडवून येण्यासाठी निर्माण झालं तेच साधन विसंवादाचं कारण ठरलं. भाव भावना जशाच्या तशा दुस-यांपर्यंत पोहचविणे कठीण झाले. कित्येक वर्षे शब्द आणि भाषेच्या आश्रयाने चालणा-या माणसाची नंतर मोठी पंचाइत व्हायला लागली असावी. आजपासून हजारो वर्षापूर्वी त्यानं निर्माण केलेल्या भाषेचं सामर्थ्य अपुरं सिद्‌ध व्हायला लागलं. तेव्हा त्यानं मौनाची भाषा स्वीकारली, परंतु तरीही व्यक्‍त होण्यासाठी त्याची तळमळ शांत झाली नाही.
वेद , उपनिषदांचा काळ भाषेचा उत्कर्षाचा काळ होता. अनेक मंत्रोच्चारांचा जन्मही या काळात झाला. शब्द हे परमेश्‍वरापर्यंत नेण्यास सहायक आहेत, असं त्याला वाटू लागलं. म्हणून माणसानं शब्दांची पुजा बांधणे सुरू केले. ज्ञानाची आराधना सुरू केली. परंतु वेद, उपनिषदांतील रूषींना जे अनुभवास आलं आणि सर्वसामान्य माणसाचा समजून घेण्याचा अवाका यात दरी निर्माण होत गेली. म्हणून उपनिषदात "नेती नेती' म्हणून सत्य कथन करण्यास रूषी नकार देताना दिसतो. लाओत्सेंनीही असंच काहीसं म्हटलं आहे.
"नेती नेती'चा अर्थ असा होतो की हेही खरे नाही अन्‌ तेही खरे नाही. सत्य तिसरे काहीतरी वेगळेच आहे. त्यानंतर झालेल्या शांडिल्य रूषींनी तर "येती येती' म्हणून थोडी सकारात्मकता दाखविली. "येती येती' म्हणजे हेही खरं आहे नि तेही खरं आहे. जे आहे ते सगळं खरंच आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास रात्रही खरी आहे आणि दिवसही आहे. काळाही खरा आहे आणि पांढराही खरा आहे. कुठलीतरी एक बाजू पकडून त्यावर कायम राहण्यासाठी तो सत्य काय आणि ते कसे व्यक्‍त करायचे, ही अडचण निर्माण झाली. कारण शब्दांच्या दोन्ही बाजूचे समर्थन करताना त्याचा गोंधळ उडणारच. भाषेच्या अस्थैर्यामुळे अनेक गोष्टीत तात्विक पातळीवर गैरव्यवहार आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

अडिच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्‌धांनी मात्र सर्वसामान्य माणसाची ही अडचण दूर केली. बुद्‌धांनी मध्यम मार्ग स्वीकारल्यामुळे हा गोंधळ निकालात निघाला. त्याने "नेती नेती' आणि "येती येती' या दोहींना खोडून काढले आणि "सम्यक' निती लोकव्यवहारात उतरविली. माणसाला भाषेतून स्थैर्य मिळाल्यामुळे आता कुठे त्याची धडपड थांबली होती. बुद्‌धांच्या "सम्यक 'नितीतून त्याला विज्ञानाचा मार्ग सापडला. कारण बुद्‌धांनी सर्व बाबी बुद्‌धीच्या कसोटीवर घासून जे योग्य उरते तेच स्वीकारण्याचा सल्ला दिला. प्रत्येक गोष्टीला "सम्यक' शब्द जोडून बुद्‌धांनी "बॅलेंस' साधला. बुद्‌धाच्या काळानंतर अडिच हजार वर्षांनी मात्र माहिती आणि ज्ञानात दरी पडू लागली. जागतिकीकरण, नवनवीन शोध,आर्थिक व्यवहाराला आलेलं महत्व आणि अनेक घटनेतील अनुभवाचा पसारा व्यक्‍त करण्यासाठी माणसाला भाषा अपुरी वाटू लागली. तो बुद्‌धीवादी असल्यामुळे त्यानं परिश्रमानं ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या. पण आजच्या काळात मात्र मनुष्य भाषा आणि शब्दांपासून दूर होत चालला आहे. शब्द गुळगुळीत होत आहेत. हवा असलेला आशय हरपत आहे. बदलत्या काळानुरूप अनुभव आणि शब्दांची गर्दी वाढलीय. भावना व्यक्‍त करायला नेमके शब्द सापडत नाहीत. माध्यमांच्या भाउगर्दीत शब्दांचं महत्व कमी होत चाललं. माध्यमांद्वारे माहितीचा मारा माणसाच्या डोक्‍यावर सतत चोविस तास सुरू असतो. युवकांची मोबाईलवरची सांकेतिक भाषा वेगळी होत चालली आहे. "जनरेशन गॅप' म्हणून आपण युवकांच्या या प्रश्‍नाकडे पाहात असतो. म्हणूनच कविवर्य सुरेश भट भाषेच्या बाबतीतील खंत व्यक्‍त करताना एका गझलेच्या या शेरातून म्हणतात
कशी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेउनी येणा-या पिढयांची बोलतो आम्ही !!
सर्व महान संत कवि आणि विचारकांनी जे सांगायचं होतं त्याचा खजानाच काव्यात्मक रूपाने आपल्यापुढे ठेवला. परंतु काव्याची भाषा व्यक्‍तीपरत्वे पाहिजे तशी वाकविता येत असल्यामुळे गोंधळ झाला. आपल्या मगदूराप्रमाणे व्यक्‍तीपरत्वे अर्थ निघत गेला आणि अनाचार माजला. आजचे भौतिकशास्त्र किंवा विज्ञानशास्त्रे काटेकोरपणा आणण्यासाठी शब्द आणि भाषेचा वापर टाळून प्रतिके आणि सुत्रांपर्यंत येउन पोहचलेली आहेत. पुढच्या काळात तर भौतिकशास्त्रे आणि एकंदर सगळी विज्ञानशास्त्रे केवळ सुत्र आणि प्रतिकांच्या माध्यमातून हव्या त्या बाबी सांगतील, अशी परिस्थिती आहे.
शास्त्रज्ञांनी पुढील काळातील हा धोका वर्तविला असल्याचं डॉ.देवी यांनी सांगीतलं आहे. उत्क्रांतीत मानवाच्या मेंदूत बदल घडत असून मेंदूच्या डाव्या भागाचा केंद्रबिंदू भाषा नव्हे तर प्रतिकांकडे सरकत चालला आहे. त्यामुळे भाषा मृतवत होउन रूपक आणि प्रतिकांची आभाषी भाषा विकसीत होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
*******

मंगलवार, 7 अप्रैल 2015

माणूस जगतो कशासाठी?


                                                                          विजयकुमार राउत
मरण येत नाही म्हणून माणूस जगतो का? की जगण्या- मरणापुढे असहाय म्हणून माणूस जगत असतो? की जीवनात आणखी काही महत्वाचे असावे म्हणून माणूस जगत असावा काय?
"to be or not to be' या शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटसारखाच दोलायमान अवस्थेतील प्रश्‍न आयुष्यात कधी ना कधी सगळयांना पडत असतो. उत्तरही खूप मोठं आणि त्यापेक्षा प्रश्‍नही समजून घेणं जिकरीचं आहे. "माणूस जगतो कशासाठी?' ही ना.सी.फडके यांची लघुकथा कधीकाळी पाठयपुस्तकात वाचली होती. त्यातील मध्यमवर्गिय नायक हा रोजच्या कटाकटीला कंटाळून आत्महत्त्या करण्याचा टोकाचा विचार करतो. रस्ता ओलांडताना एक इवलीसी बेडकी कारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टुन्‌कन उडी मारून रस्त्याच्या पलीकडे जाउन स्वतःला वाचवून घेण्यात धन्यता मानते. यासारख्या अगदी छोटया छोटयाशा प्रसंगापासून कथा फुलत जाते. शेवटी या घटनांमधून नायक जगण्याची प्रेरणा घेतो आणि पुनश्‍च जगण्याचा निर्धार करतो. इथं कथा संपते. माणसाच्या हाती जगणे नाही आणि मरणेही नाही, म्हणून तो कसा तरी जगत असतो. जीवनाला ओझं समजून ते ओढत नेताना आपण इतरांवर उपकार करतो, असं त्याला वाटतं.
या विषयावर माझया काही मित्रांनी नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रत्येक जण यावर अगदी भरभरून बोलून गेला. काहींनी यथेच्छ बोलण्याचं सुख मानून गंगेत घोडं न्हाउन घेतलं तर काहींनी आपण कसे जगतो आणि त्यापासून इतरांनी काय प्रेरणा घ्यावी, याबद्‌दल चर्वितचर्वण केलं. अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा परिसरातील पहिला प्रयत्न होता, म्हणून त्यातील उणिवांचा भाग अलहिदा ! परंतु असे कार्यक्रम घेण्याची सद्‌सद्विवेकबुद्‌धी जागृत होणं, हे अतिशय महत्वाचं आहे. बबनराव पडोळे, जीवन जवंजाळ यासारख्या नवविचारांचे स्वागत करणा-या मित्रांनी हा उपक्रम हाती घेतला हेही बरे झाले. माझयाही मनात ही संकल्पना होती. योगायोगाने पडोळेंच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी पुढाकार घेतला, ही बाब स्वागर्ताहच म्हणावी लागेल.
यामागे कुठली विचारक्रांती वेैगरे मोठमोठे शब्द लावणे मला पसंत नाही.
माणूस जगतो कशासाठी ? या प्रश्‍नाचं उत्तर वरवरचं असता कामा नये. इतर रोजच्या घरगुती प्रश्‍नासारखं नुसतंच" टाईमपास' उत्तर देताना या महत्वाच्या प्रश्‍नाला बगल देणेही योग्य नव्हे. खरं तर जन्म घेणे आणि मरणे या दोन्ही क्रिया माणसाच्या हातात नसतात. मात्र या दोहींच्या मध्ये असलेलं जीवन, ते मात्र कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ते सुंदर करता यावं आणि आपण आपल्या अवतीभवतीचं जगही कसं सुंदर करता येईल, हे आपल्या हातात आहे.
माना के इस जहॉं को गुलजार न कर सके
कुछ खांर तो कम किये निकले जिधर से हम !!
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही. तोही समाजाचं एक "बायोप्राडक्‍ट' असतो. म्हणून तो घडत असताना समाजाकडून अनेक गोष्टी शिकत असतो. संस्कार त्यापैकीच एक. परंतु जगताना तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगत असतो. स्वतःला म्हणजे "मी'ला तो अधिक विस्तारण्याऐवजी संकुचित करीत जातो. मी आणि माझे यातच तो धन्यता मानतो.
भगवान बुद्‌धांपासून ते अलीकडे गाडगे महाराज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत माणसाला दिशादिग्दर्शन करणारे महात्मे माणसाला सुधारताना मुळीच हरले नाहीत किंवा थकले नाहीत. या प्रश्‍नाचं नुसतं त्यांनी उत्तरच शोधलं नाही, तर त्यांनी कृतितून प्रत्यक्षात उतरविलं आणि समाजाला दाखवून दिलं. त्यांच्यापासून काही घेण्याचीही आपली ऐपत नाही. म्हणून झोळी खाली राहिली ती आपणासारख्या कपाळकरंटयांचीच ! जगण्यापासून माणूसपण दूर करता कामा नये. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण "माणूस' तरी होण्याचा प्रयत्न करतो का? सुप्रसिद्‌ध साहित्यीक प्र.के.अत्रेंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिताना एका अग्रलेखात एक ग्रीक कथा दिलेली आहे. एकदा एका राणीकडे एक देवता येते. तिच्या बाळाला देव बनविण्यासाठी बाळाचे कपडे काढून त्याला विस्तवावर धरण्यास मागते. हा जिवघेणा उपक्रम कित्येक दिवस सुरू असतो. परंतु एके दिवशी राणीला पहावत नाही. चटकन ती पुढे होउन बाळाला विस्तावावर धरण्यापासून रोखते व देवतेच्या हातातील बाळ हिसकावून घेते. ती राणी म्हणते की, मी ही कृती करून बाळाला "देवता' होण्यापासून रोखलं आणि त्या बाळाचा माणूस होण्याच्या रस्त्यातली अडचण त्या स्त्रीने दूर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना माणूस होण्यासाठी लढण्याचं बळ दिलं. माणसाचं दैवतीकरण करण्यापेक्षा माणूस होणंच कठीण काम आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही. परंतु हे दुःख पेरणारे दुसरे तिसरे कुणीच नसून आपण स्वतःच तर असतो. म्हणून तथागत भगवान बुद्‌ध एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमीकेतून अखिल मानव जातीला विकृत होण्यापासून रोखतात. माणसानं या जगात नेत्रदीपक प्रगती केली. पण या प्रगतीबरोबर तो सुखी होण्याऐवजी अधिकाधिक दुःखी का होत गेला? एका जमान्यात माणसाला मन असते. यावर विज्ञानाचा विश्‍वासच बसत नव्हता. सिग्मंड फ्रायडने माणसाला "मन' नावाचा अदृश्‍य अवयव असतो, हे अथक प्रयत्नांती सिद्‌ध करून दाखविलं. आता मनाच्या पातळीवर ज्या अतिशय गुंतागुंतीच्या विचाराच्या प्रक्रिया असतात याचा मुळाशी गेलो तर तिथे सर्वसामान्य माणसाला कसलाही ठाव लागत नाही. गोंधळ उडतो. "मन' हे शरिराची "नॅनो' आवृती होय, असं अलीकडे विज्ञानही मानायला लागलं. मनात जे काही विचाराच्या रूपाने निर्माण होउन पाठलाग करते तेच रोगाच्या रूपाने शरिरावर पसरते. म्हणून मी भगवान बुद्‌धांना मानसोपचारतज्ज्ञ म्हणतो. कारण बुद्‌धांनी माणसाच्या या दृश्‍य अदृष्य मनोव्यापाराचा खूप चिकित्सक अभ्यास केला होता. आजचं विज्ञानही तेच म्हणते. मग मला सांगा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही विपरित परिस्थितीत विचाराच्या बाबतीत स्वतःला कसे
"पाजेटीव्ह' ठेवतात... "बरे झाले देवा निघाले दिवाळे...बरी या दुष्काळे पीडा गेली...अनुतापे तुझे राहिले चिंतन ! जाला हा वंमर संवसार !!' किवा "निंदकाचे घर असावे शेजारी' असे अभंगातून सांगून ते मोकळे होतात. आपल्या अवतीभवती सुखाच्या अमर्याद खाणी आहेत. आनंद देणारे ठिकठिकाणी असंख्य इवले इवले झरे आहेत. या निसर्गाने अनंत हाताने तुमच्यावर सुखाची उधळण केलेली आहे. ते सोडून आपण देवदर्शनासाठी सगळीकडे नुसते भटकत असतो. काही जण हा गुरू सोड तो धर असा उपद्‌व्याप करीत असतात. "जगण्याचा मार्ग' शोधत असतात. मंत्र तंत्राच्या आहारी जातो. म्हणून तुकाराम म्हणतात की "तुझे आहे तुजपाशी परि तू भूललासी वरलिया रंगाशी' तुकाराम असो, बुद्‌ध असो नाहीतर एखादा महत्वाचा शोध लावणारा संशोधक असो. हे सगळे जीवन सुंदर करणारे वेलीवरची सुगंधित फुलेच आहेत. सजिव सृष्टीही एक शाळा आहे. सर्वात आधी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे होणे आवश्‍यक आहे. तुकडोजी महाराज उगाच नाही "माणूस द्या, मज माणूस द्या' म्हणत माणसाच्या शोधत फिरतात. त्यांना माणूस मिळाला असावा का?
                                                                                               विजयकुमार राउत

 
Blogger Templates