Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 7 अप्रैल 2015

माणूस जगतो कशासाठी?


                                                                          विजयकुमार राउत
मरण येत नाही म्हणून माणूस जगतो का? की जगण्या- मरणापुढे असहाय म्हणून माणूस जगत असतो? की जीवनात आणखी काही महत्वाचे असावे म्हणून माणूस जगत असावा काय?
"to be or not to be' या शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटसारखाच दोलायमान अवस्थेतील प्रश्‍न आयुष्यात कधी ना कधी सगळयांना पडत असतो. उत्तरही खूप मोठं आणि त्यापेक्षा प्रश्‍नही समजून घेणं जिकरीचं आहे. "माणूस जगतो कशासाठी?' ही ना.सी.फडके यांची लघुकथा कधीकाळी पाठयपुस्तकात वाचली होती. त्यातील मध्यमवर्गिय नायक हा रोजच्या कटाकटीला कंटाळून आत्महत्त्या करण्याचा टोकाचा विचार करतो. रस्ता ओलांडताना एक इवलीसी बेडकी कारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टुन्‌कन उडी मारून रस्त्याच्या पलीकडे जाउन स्वतःला वाचवून घेण्यात धन्यता मानते. यासारख्या अगदी छोटया छोटयाशा प्रसंगापासून कथा फुलत जाते. शेवटी या घटनांमधून नायक जगण्याची प्रेरणा घेतो आणि पुनश्‍च जगण्याचा निर्धार करतो. इथं कथा संपते. माणसाच्या हाती जगणे नाही आणि मरणेही नाही, म्हणून तो कसा तरी जगत असतो. जीवनाला ओझं समजून ते ओढत नेताना आपण इतरांवर उपकार करतो, असं त्याला वाटतं.
या विषयावर माझया काही मित्रांनी नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रत्येक जण यावर अगदी भरभरून बोलून गेला. काहींनी यथेच्छ बोलण्याचं सुख मानून गंगेत घोडं न्हाउन घेतलं तर काहींनी आपण कसे जगतो आणि त्यापासून इतरांनी काय प्रेरणा घ्यावी, याबद्‌दल चर्वितचर्वण केलं. अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा परिसरातील पहिला प्रयत्न होता, म्हणून त्यातील उणिवांचा भाग अलहिदा ! परंतु असे कार्यक्रम घेण्याची सद्‌सद्विवेकबुद्‌धी जागृत होणं, हे अतिशय महत्वाचं आहे. बबनराव पडोळे, जीवन जवंजाळ यासारख्या नवविचारांचे स्वागत करणा-या मित्रांनी हा उपक्रम हाती घेतला हेही बरे झाले. माझयाही मनात ही संकल्पना होती. योगायोगाने पडोळेंच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी पुढाकार घेतला, ही बाब स्वागर्ताहच म्हणावी लागेल.
यामागे कुठली विचारक्रांती वेैगरे मोठमोठे शब्द लावणे मला पसंत नाही.
माणूस जगतो कशासाठी ? या प्रश्‍नाचं उत्तर वरवरचं असता कामा नये. इतर रोजच्या घरगुती प्रश्‍नासारखं नुसतंच" टाईमपास' उत्तर देताना या महत्वाच्या प्रश्‍नाला बगल देणेही योग्य नव्हे. खरं तर जन्म घेणे आणि मरणे या दोन्ही क्रिया माणसाच्या हातात नसतात. मात्र या दोहींच्या मध्ये असलेलं जीवन, ते मात्र कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ते सुंदर करता यावं आणि आपण आपल्या अवतीभवतीचं जगही कसं सुंदर करता येईल, हे आपल्या हातात आहे.
माना के इस जहॉं को गुलजार न कर सके
कुछ खांर तो कम किये निकले जिधर से हम !!
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही. तोही समाजाचं एक "बायोप्राडक्‍ट' असतो. म्हणून तो घडत असताना समाजाकडून अनेक गोष्टी शिकत असतो. संस्कार त्यापैकीच एक. परंतु जगताना तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगत असतो. स्वतःला म्हणजे "मी'ला तो अधिक विस्तारण्याऐवजी संकुचित करीत जातो. मी आणि माझे यातच तो धन्यता मानतो.
भगवान बुद्‌धांपासून ते अलीकडे गाडगे महाराज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत माणसाला दिशादिग्दर्शन करणारे महात्मे माणसाला सुधारताना मुळीच हरले नाहीत किंवा थकले नाहीत. या प्रश्‍नाचं नुसतं त्यांनी उत्तरच शोधलं नाही, तर त्यांनी कृतितून प्रत्यक्षात उतरविलं आणि समाजाला दाखवून दिलं. त्यांच्यापासून काही घेण्याचीही आपली ऐपत नाही. म्हणून झोळी खाली राहिली ती आपणासारख्या कपाळकरंटयांचीच ! जगण्यापासून माणूसपण दूर करता कामा नये. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण "माणूस' तरी होण्याचा प्रयत्न करतो का? सुप्रसिद्‌ध साहित्यीक प्र.के.अत्रेंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिताना एका अग्रलेखात एक ग्रीक कथा दिलेली आहे. एकदा एका राणीकडे एक देवता येते. तिच्या बाळाला देव बनविण्यासाठी बाळाचे कपडे काढून त्याला विस्तवावर धरण्यास मागते. हा जिवघेणा उपक्रम कित्येक दिवस सुरू असतो. परंतु एके दिवशी राणीला पहावत नाही. चटकन ती पुढे होउन बाळाला विस्तावावर धरण्यापासून रोखते व देवतेच्या हातातील बाळ हिसकावून घेते. ती राणी म्हणते की, मी ही कृती करून बाळाला "देवता' होण्यापासून रोखलं आणि त्या बाळाचा माणूस होण्याच्या रस्त्यातली अडचण त्या स्त्रीने दूर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना माणूस होण्यासाठी लढण्याचं बळ दिलं. माणसाचं दैवतीकरण करण्यापेक्षा माणूस होणंच कठीण काम आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही. परंतु हे दुःख पेरणारे दुसरे तिसरे कुणीच नसून आपण स्वतःच तर असतो. म्हणून तथागत भगवान बुद्‌ध एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमीकेतून अखिल मानव जातीला विकृत होण्यापासून रोखतात. माणसानं या जगात नेत्रदीपक प्रगती केली. पण या प्रगतीबरोबर तो सुखी होण्याऐवजी अधिकाधिक दुःखी का होत गेला? एका जमान्यात माणसाला मन असते. यावर विज्ञानाचा विश्‍वासच बसत नव्हता. सिग्मंड फ्रायडने माणसाला "मन' नावाचा अदृश्‍य अवयव असतो, हे अथक प्रयत्नांती सिद्‌ध करून दाखविलं. आता मनाच्या पातळीवर ज्या अतिशय गुंतागुंतीच्या विचाराच्या प्रक्रिया असतात याचा मुळाशी गेलो तर तिथे सर्वसामान्य माणसाला कसलाही ठाव लागत नाही. गोंधळ उडतो. "मन' हे शरिराची "नॅनो' आवृती होय, असं अलीकडे विज्ञानही मानायला लागलं. मनात जे काही विचाराच्या रूपाने निर्माण होउन पाठलाग करते तेच रोगाच्या रूपाने शरिरावर पसरते. म्हणून मी भगवान बुद्‌धांना मानसोपचारतज्ज्ञ म्हणतो. कारण बुद्‌धांनी माणसाच्या या दृश्‍य अदृष्य मनोव्यापाराचा खूप चिकित्सक अभ्यास केला होता. आजचं विज्ञानही तेच म्हणते. मग मला सांगा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही विपरित परिस्थितीत विचाराच्या बाबतीत स्वतःला कसे
"पाजेटीव्ह' ठेवतात... "बरे झाले देवा निघाले दिवाळे...बरी या दुष्काळे पीडा गेली...अनुतापे तुझे राहिले चिंतन ! जाला हा वंमर संवसार !!' किवा "निंदकाचे घर असावे शेजारी' असे अभंगातून सांगून ते मोकळे होतात. आपल्या अवतीभवती सुखाच्या अमर्याद खाणी आहेत. आनंद देणारे ठिकठिकाणी असंख्य इवले इवले झरे आहेत. या निसर्गाने अनंत हाताने तुमच्यावर सुखाची उधळण केलेली आहे. ते सोडून आपण देवदर्शनासाठी सगळीकडे नुसते भटकत असतो. काही जण हा गुरू सोड तो धर असा उपद्‌व्याप करीत असतात. "जगण्याचा मार्ग' शोधत असतात. मंत्र तंत्राच्या आहारी जातो. म्हणून तुकाराम म्हणतात की "तुझे आहे तुजपाशी परि तू भूललासी वरलिया रंगाशी' तुकाराम असो, बुद्‌ध असो नाहीतर एखादा महत्वाचा शोध लावणारा संशोधक असो. हे सगळे जीवन सुंदर करणारे वेलीवरची सुगंधित फुलेच आहेत. सजिव सृष्टीही एक शाळा आहे. सर्वात आधी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे होणे आवश्‍यक आहे. तुकडोजी महाराज उगाच नाही "माणूस द्या, मज माणूस द्या' म्हणत माणसाच्या शोधत फिरतात. त्यांना माणूस मिळाला असावा का?
                                                                                               विजयकुमार राउत

गुरुवार, 5 फ़रवरी 2015

ज्याचा त्याचा धर्म


                                                                     विजयकुमार राउत


मित्रहो, अगदी स्वतःची शपथ घेउन सांगतो की माझा तसा कुठलाच धर्म नाही. कुठलाच पंथही नाही. ना कुठली जात ना पोटजात. तसा मी एकटाच माझया धर्माचा संस्थापक आहे आणि एकटाच माझया धर्माचा अनुयायी. माझया धर्माची शिकवण आहे बंधूभाव, म्हणून माझया धर्मात कुठल्या दंगली नाहीत वा वादही नाहीत. माझया धर्माने कुठली उपासना पद्‌धती स्वीकारलेली नाही... ना कुठली साधना. या भूतलावरील प्रत्येक धर्मात ज्या ज्या गोष्टी माणसासाठी उदात्त आहेत, उन्नत आहेत, माणूस म्हणून माझया हिताच्या आहेत, त्या सर्व गोष्टी माझया धर्माची शिकवण आहेत,असे मला वाटते. सर्व धर्माचे पवित्र ग्रंथ हेच माझे धर्मगुरू आहेत. माझया धर्माचे कुठले कुलदैवतं नाही. तर सर्व धर्मातील महात्मे ज्यांनी या पृथ्वीवरील सबंध मनुष्य जातीला घडविण्याचा विचार जन्माला घातला ते सर्व भगवान श्रीकृष्ण, मोहम्मद पैगंबर, महावीर जैन, प्रभू येशू, गौतम बुद्‌ध, गुरूनाकदेव, लाओत्से अगदी सॉक्रेटीससुद्‌धा, असे सगळे माझे दैवत आहेत. "सर्व विश्‍वाचे भले होओ, सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना आरोग्य, सुख संपत्ती लाभो... आणि जो जे वांछील तो ते लाहो.. संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान हे माझया धर्माची प्रार्थना आहे. स्व-उपकारातून परोपकार हा माझया धर्माचे वैशिष्ट आहे. कविवर्य केशवसुत म्हणतात.....ना मी कुठल्या पंथांचा...' तसा मी धर्मनिरपेक्ष वगैरे मुळीच नाही. माझया विचारातून घडलेला... मला जगण्यासाठी लागणारा अतिशय आवश्‍यक असलेला एक धर्म आहे. त्याचे कुठले नाव नाही. तो जगातील कुठल्याच धर्माविषयी निंदा किंवा टिका करीत नाही..
स्वधर्म फारच सुखकारक असतो तर परधर्म मात्र फारच पिडादायक असतो, असं म्हणतात. कारण स्वतःच्या धर्मात कुठल्याच दंगली नसतात. देवाधर्माचा वाद नसतो. माझया स्वतःच्या धर्माने मला हे शहाणपण शिकविलं आहे. धर्माच्या नावावर होणारी आजची भयावह स्थिती पाहिली तर स्वतःलाच ग्लानी येण्याची शक्‍यता अधिक आहे. "यदा यदाही धर्मस्य ग्लार्नीभवती भारत, अत्भ्यूथानां अधर्मस्य तदांत्माना सुजाम्यहम' भगवान श्रीकृष्णांनी असं धर्माबद्‌दल सांगीतलं आहे. जेव्हा जेव्हा धर्म लोप पावतो, जेव्हा जेव्हा धर्मावर अधर्माचं आक्रमण होतं, तेव्हा तेव्हा मी जन्म घेउन धर्माचं रक्षण करेन, असं खुद्‌द भगवंत सांगतात. म्हणून मला गीतेच्या रूपातून मिळालेली शिकवण प्रिय वाटते. भगवान श्रीकृष्णाचा भागवत धर्म आजच्या तथाकथीत हिंदू धर्मापेक्षा निश्‍चितच भिन्न असावा, असं वाटायला लागतं. प्रत्येकाचा एक वेगळा धर्म असतो. प्रचलित धर्मात अर्थाचा अनर्थ झाल्यावर नवीन धर्म म्हणजेच नवीन स्वतःची विचारधारा किंवा टिका करण्याचं काम धर्मसंस्थापकांनी केलेलं आहे. नदी प्रदुषित झाल्यावर तिची साफसफाई करण्याचं काम धर्मसंस्थापकांनी केलेले आहे. धर्माला तावून सलाखून शुद्‌ध करण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं. तथाकथित धर्मात प्रत्येक अनुयायानं मुळ विचारधारेला प्रदुषित करण्यासाठी सर्व शक्‍ती पणाला लावलेली आहे. माझा धर्म निखळ, पारदर्शी आहे पाण्यासारखा. तो डोळस आहे. म्हणून तो अंधश्रद्‌धाळू नाही . अंधद्‌धा, जाचक रूढी, विकृत संस्कृती अशा काळात खरा विज्ञाननिष्ठ म्हणून मी माझया धर्माकडे पाहतो. जो कोणी सत्याच्या वाटेवर घेउन जातो त्याच्या वाटेवर मी चालत जातो.
सामूहिक धर्म हा माझा नव्हताच कधी. त्याला गर्दीचं मानसशास्त्र लागू पडत नाही. परंतु गर्दीचे सगळे नियम मात्र सामूहिक धर्माला लागू होतात. गर्दीच्या धर्माचं एक फायदयाचं एक अर्थशास्त्र असंत आणि व्यवहारशास्त्रही. "गर्व से कहो हम है... किंवा धर्म विरोधी वर्तण झाल्यानंतर "फतवा' , धर्मातून बहिस्कृत करणे असे प्रकार फक्‍त "बळी तो कान पिळी' या सदरात मोडतात. अल्पसंख्यंकावर दबाव ठेवण्यासाठी अशा कृल्पत्या योजन्याचे प्रयत्न राजकीय सुडबुद्‌धीतून सतत होत असतात. अशा राजकारणाचे अड्‌डे राजकारण किंवा मठ, मंदिरे असतात. तिथूनच धर्माचं भरपूर पोषण होतं.
जन्मतः समाजानं, कुटूंबानं माझयावर लादलेला धर्म हा माझा असूच शकत नाही, याचं मला भान आहे. प्रचलित धर्म माणसांना माणसांपासून दूर लोटण्याचं पाप करीत असेल तर तो धर्म कसा काय माणसाला उन्नत करणार? परंतु दुर्देैवानं आजच्या स्थितीत अशाच नकली नाण्यासारखी धर्माची चालती आहे. मला नेहमी एक प्रश्‍न पडतो की माणसाचं जीवन सुखकारक करण्याऐवजी पिडादायक करणारा धर्म माझा कसा असू शकतो? प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारा माझा धर्म कसा असेल? धर्म शोषण कसा शिकविणार?
दलाई लामां आपला धर्म सांगताना धर्माची किती सहज व्याख्या करतात, ते म्हणतात this is my simple relisions....there is no need temple....no need for complicated philosophy.our own brain--our own heart is our temple-the philosophy kindness. कुणी देवावर हक्‍क सांगून त्याला कितीही छोटेपण बहाल करो. मी मात्र तसे करणार नाही. कारण "तो' सर्वव्यापीा आहे. तो भारताचा आहे नी पाकिस्थानचा नाही, असे होत नाही. तो अमिराचा आहे आणि गरीबाचा नाही, तो हिंदूचा आहे आणि मुस्लीमांचा नाही, असे कसे? सगळया धर्मातील सत्य सांगणारी दैवते माझीा आहेत.
महात्मा गांधी म्हणतात देवाचा कुठलाच धर्म नसतो. उत्सव हाच माझा धर्म...प्रेम हाच माझया धर्माचा संदेश आणि मौन हेच माझया धर्माचं सत्य असल्याचं ओशो म्हणतात, तेव्हा मलाही वाटतं की माझा धर्म मी असेपर्यंत तरी जिवंत राहिल.

                                                                               विजयकुमार राउत



रविवार, 1 फ़रवरी 2015

जुनी बाटली ,नवीन दारू


                                                                                            विजयकुमार राउत

प्रजासत्ताक दिनाचे कार्यंक्रम आटोपल्यानंतर नागपूर जिल्हयातील ग्रामीण भागात फिरण्याचा मोह झाला. म्हणून पाच मित्रांसोबत एका मित्राच्या कारने जाण्याचा योग आला. नेहमीच्या कोलाहलापासून दूर जाउन थोडी मौज करण्याचा छंद आता काहींना वाटू लागला. परंतु एखादया निर्जन ठिकाणी जात असताना मोजक्‍या लोकांच्या सोबतीने वारंवार गेल्यानंतर अल्पावधीत तेथे खूप गर्दी व्हायला लागते .. आणि हळूहळू तेही ठिकाण गर्दीच्या कोलाहलाने व्यापून जाते. अशा एक ना अनेक ठिकाणी गर्दीचे अतिक्रमण होत गेले आहे. मग त्या ठिकाणचे सौंदर्यच हळूहळू लोप पावत जाते...आणि उरतो केवळ कोलाहल. कानाला बोचणा-या कोलाहलातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा, पुन्हा त्याच कर्णकर्ककश आवाजाने माणसाचा पाठलाग करावा अशी स्थिती आहे. छोटी मोठी पर्यटनस्थळे अशीच शांततेचा खून करून गर्दीच्या "मार्केटींग'वर उभी राहात आहेत. तर असो. ज्या शिवारात आम्ही गेलो ते शिवार काही खूप प्रसिद्‌ध नव्हतं. परंतु जंगलाच्या सहायान वेळ मिळाल्याने थोडी भ्रमंती करून घ्यावी व थोडे मनाचे आवडीचे क्षण जगून घ्यावे, अशी सर्वांचीच इच्छा असल्यामुळे तेथे गेलो होतो. जंगलाच्या शेजारी असलेल्या गावात तर सण असल्यासारखी स्थिती होती. कारण शहरातून येणा-यांनाही "मोह' घालणारी "तहान' भागविण्याचं ठिकाण असतं. बरं तिथंही हौस म्हणून नेहमी बारमधली "इंग्लिश' पिण्यापेक्षा "गावठी' बरी म्हणून तिची चव घेण्यासाठी गावात घराघरांसमोर गर्दी पहायला मिळते. गाववालेही मोठे हुशार असतात. अशा प्रसंगी तेही तयारीनेच असतात. अगोदरच ही दारू विकण्याचा "कोटा'ही ते तयार ठेवतात. कुणी दारूचा आस्वाद घेतल्यानंतर खमंग कच्चा चिवडयाचा आस्वाद घेतात. या निमित्ताने डोंगरकपारीतील गावक-यांनाही नवीन गृहउद्योग मिळतो.
डोंगरकपा-यातील फिरस्तीदरम्यान एक नवीनच परंपरा निर्माण होत असल्याचं लक्षात आलं. म्हणून गावात शिरून चौकशी केली. अवैधपणे दारू विक्री करणे नेहमीच कायदयाच्या विरोधात आहे. "ड्राय डे' ला गल्लीबोळांतून दारूची गंगा वाहणेही समजू शकतो. या गावांमध्ये कोंबडया, बक-या कापण्यावर अघोषित बंदी असल्याचं आढळलं. यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर ग्रामस्थांनी सांगीतलेलं सत्य ऐकूण थोडा धक्‍काच बसला. "स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिनी ग्रामीण भागात कोंबडे, बकरे कापले जात नाहीत. कारण आजचा दिन हा महत्वाचा असल्यामुळे कुणाची हत्या करू नये, असा या गावक-यांनी अंधविश्‍वास पोसला आहे. माझया डोक्‍यात एकाच वेळी अनेक प्रश्‍न निर्माण झाले. या लोकांना कुणी सांगीतलं की स्वातंत्र दिन किंवा प्रजासत्ताक दिनी हत्या करू नये म्हणून? महात्मा गांधी जयंती, हिंदू किंवा जैन धर्मियांसाठी असलेल्या पवित्र दिनी मासांहार वर्ज्य करणे, हे समजू शकतो. या दिवशी हत्या होत नसेल तर उत्तम. परंतु त्याला एक वेगळेच परिमाण लागू पाहातेय. धार्मिक अंधश्रद्‌धा पोसण्यासारखं स्वरूप या गोष्टीला येउ पाहतेय, हे कितपत योग्य?
जुन्या बाटलीत नवीन दारू ठेवण्यासारखं आहे. शिक्षणाबरोबर नवीन अंधश्रद्‌धा निर्माण होत असल्याचं दिसतं. आपण प्रतिकांची पुजा करायला लागलो की असेच धोके संभवतात.
                                                                                   विजयकुमार राउत
 
Blogger Templates