Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 7 अप्रैल 2022

जीवनात उरावा ‘राम’

-विजयकुमार राऊत ‘श्रीरामा’चे महत्व आपल्या जीवनात अधिक मोठे आहे. आपल्या रोजच्या जगण्यात ‘राम’ असेल तोच मनुष्य यशस्वी जीवन जगू शकतो. सहज बोलताना आपणच म्हणतोच की, आता जीवनात ‘राम’च उरला नाही. त्यात काहीच ‘राम’ नाही. मला डॉक्टरने आ‘राम’ करायला सांगितले. दोन व्यक्ती भेटल्यानंतर ‘राम राम’ म्हणताना त्यांच्या भेटीमध्ये एकमेकांत ‘राम’ पाहणे असा त्याचा अर्थ होय. आईच्या उदरातून जन्म घेतल्यानंतर हळूहळू रामाशी परिचय होत जातो आणि एका वेळी मग ‘राम नाम सत्य है’ असे म्हणतच शेवटच्या प्रवासाला निघावे लागते. तुम्ही भलेही या जन्मात नकारा अथवा स्वीकारा. म्हणून ज्याला त्याला आपल्या जगण्यातला ‘राम’ शोधायचा आहे. त्यासाठीच हा जगण्याचा प्रवास आहे. रामाला मर्यांदाचे बंधन ओलांडता येत नसल्यामुळे समाजाने, निसर्गाने आखून दिलेल्या नियमांनुसारच आपले वर्तन ठेवावे लागले. मर्यादा पुरुषोत्तम राम होता होताच ‘कृष्ण’ ही जीवनात आपोआप उतरणे हेच मोठे होण्याचे गमक आहे. या जगतात ‘द्वैत’ असल्यामुळे रामाबरोबरच प्रत्येकाला कृष्णही स्वीकारणे अपरिहार्यच ठरते. कारण मी शरीराने मर्यादीत असलो तरी बुद्धी आणि ह्दयाने मात्र अमर्यादच आहे. एक माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असल्यातरी मी अनादी आहे, अनंत आहे, या तत्वापर्यंत पोहचणे हा खऱ्या अर्थाने प्रवास आहे. म्हणून एका अर्थाने ‘जय जय रामकृष्ण हरी’ हे केवळ शब्द नव्हेत, तर तो मानवी जीवनातील अद्वैताचे नाते सांगणारा मोठा मंत्र आहे. आपण अमर्याद विचार करु शकतो, पण समाजाचे नितीनियम सोडून अमर्याद वागलो तर अनेक समस्यांत अडकून पडू शकतो. या सृष्टीने स्वतःला नियमांत बांधून ठेवले आहे. ‘निसर्गाचे नियम’ (law of nature)म्हणून ते प्रचलित आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करताच येत नाही. करण्याचा प्रयत्न केला की निसर्ग आपल्यालाच त्यातून बाद करतो. तसेच जीवनाचेही आहे. आपण मानव म्हणचे पुरुष आहोत, परंतू आपल्याला ‘पुरुषोत्तम’ व्हायचे असेल तर मर्यादा पाळणे हे अपरिहार्यपणे आलेच. मात्र आज अशक्य वाटणारे आणि काल्पनिक ठरू पाहणारे ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार जर माझ्या ठिकाणी असतील तर ते कधीतरी साकार होऊन तुम्हाला ‘जिनियस’ करु शकतात. आपण नित्य रुपाने करीत असलेल्या कामातही ‘राम’ पाहावा असे म्हटले जाते. आणि मग केलेले काम श्रीकृष्णचरणी अर्पण केल्यानंतर फळाची अपेक्षा उरत नाही आणि मग माणसाला दुःखीही होत नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदांचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ यात दोन गोष्टी एकाच वेळी सहज साध्य होतात. कामात ‘राम’ पाहणे म्हणजे ‘फुल्ल कॉंसंट्रेशन’ने तुम्हाला काम हे कामच न वाटणे. कामात तुम्ही एकरुप झाल्यानंतर ते काम ‘मी’ केले, असा भावही मागे न उरणे. मग पुढची गोष्ट करा, अगर करु नका, तुमचे एकाग्र चित्ताने झालेले काम पाहिजे ते फळ देऊन जाते. म्हणचे राम मोठा की कृष्ण हा प्रश्‍नच उरत नाही. येथे सारे द्वैत मिटते. दोन्ही एकच होऊन जातात. आपला सगळा खटाटोप एकरुप होण्यासाठीच असतो. त्यासाठी भांडणे उद्भतात. एकरुप झाले की सगळे वादविवाद संपून जातात. पत्नी, मुले, मित्र, जग, आईवडील या सर्वांशी आपले वाद कशासाठी? आपल्या विचाराशी सहमत होण्यासाठी किंवा आपल्याशी एकरुप होण्यासाठीच ना ! म्हणून आपल्या ऋषीमुनींनी याचे सार आधीच सांगून ठेवले आहे. द्वैतवाद, अद्वैतवाद, एकेश्‍वरवाद, अनेकवाद असे अनेकानेक वाद या जगतात दिसतात. यात वाद जरी दिसत असले तरी सगळेच वाद एकमेकांशी फारकत घेतल्यामुळे उद्भभवतात. स्वामी चक्रधरांच्या लिळेतील त्या आंधळ्याप्रमाणेच असतात सगळे वाद. वादात अडकणाऱ्यांना द्वैत दिसते. पण हे सगळे समाजपुरुषाचे एकेक अवयव असून संपूर्ण समाजपुरुष या अंगापासून बनलेला आहे, हे अंजन घालणारा कोणीतरी महापुरुषच त्या आंधळ्यांचा वाद मिटवू शकतो.

मंगलवार, 1 जून 2021

बुद्धाची करुणा हवी, करोना नको !

 
रोना या महामारीने संपूर्ण जगाला हादरुन सोडले आहे. एखाद्या सूक्ष्म, अदृश्‍य, विध्वंसकारी शक्तीने मानसाला वेठीस धरून संपूर्ण जगाला नकोसे करुन सोडावे, चंद्र आणि मंगळावर पोहचलेल्या माणसाल हतबल करुन सोडावे, पाहता पाहता जगण्याचे सर्व संदर्भ बदवून टाकावे इतकेच नव्हे तर उपचाराअभावी माणसाची केविलवाणी अवस्था करुन टाकावी, अशा विपत्तीच्या वेळी माणसापासून माणूस दूर व्हावा, माणसाच्या ताटातली त्याच्या श्रमाची भाकर खाण्याचा हक्कही हिरावून घ्यावा, आपला जिवाभावाचा माणूस आपल्यापासून निदर्यतेने कोणीतरी हिरावून न्यावा, लॉकडाउनच्या कोंडीत त्याचा श्‍वास निघेपर्यंत कोंडून घ्यावे, पोटाची भूक अस्वस्थ करेपर्यंत पाय घासून मरायला भाग पाडावे, कोरोनाचा संसर्ग होताच त्याला जगापासून तोडून जीव निघेपर्यंत त्याच्या मरणाची प्रतीक्षा केल्यानंतरही मृत्यूच्या क्षणी मात्र त्याच्या चितेला स्पर्श होण्यापासून त्याच्या प्रिय जणांना रोखण्यात यावे, त्याच्या कलेवराचे अंतीम दर्शन करु न देण्यापर्यंत सगळे एकापेक्षा एक कटू अनुभव या मानवजातीने गेल्या वर्षभरात घेतले आहेत. करोनाची पहिली लाट थोडी ओसरल्यानंतर दुसरी लाट पहिलीपेक्षा भयंकर अनुभवास मिळाली. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि अशा किती लाटा नशीबात पेरून ठेवाव्या, याचे उत्तर आजतरी कोणाचजवळ नाही. त्याच्या संसर्गावर कोठला उतारा काम करेल, याचे उत्तरही सद्या कोणत्याच विज्ञानाजवळ नाही. अशा भयंकर महामारीला आळा घालेल, असा कोणताच उपाय नसल्यामुळे मानवाच्या मर्यादाही या महामारीसमोर स्पष्ट झाल्या आहेत. अशा अंधारलेल्या सद्याच्या जगात शेकडो वर्षांपासूनची तथागताची ‘करुणा’च सगळ्या विश्‍वाच्या अस्तित्वाला पुरुन उरली आहे. गेल्या अडीच हजार वर्षात अशा कितीतरी महामाऱ्या या जगाने अनुभवल्या आहेत. काही मानवनिर्मित संकटे, काही नैसर्गिक संहार या आणि अशा संकटांनी सत्यावर बेमुर्वतपणे हल्ला चढविल्याचा इतिहास आहे.
मित्रहो, अडीच हजार वर्षाचा कालावधी काही थोडाथोडका नव्हे. इतक्या वर्षात अनेक वादळे आलीत आणि गेलीत. परंतु तथागतांची करुणा मात्र माजही अख्ख्या विश्‍वावर मायेची पाखर घालते आहे. माणूस कितीही बुद्धीमान झाला तरीही ही ‘करुणा’च त्याच्या मदतीला धावून आली. ही करुणाच जगण्याचा आधार ठरली. या करुणेनेच सगळ्या दुनियेला जवळ केले आहे. एवढी मोठी महामारी आल्यानंतरही ही ‘करुणा’च मदतीचे रुप घेउन मानवाच्या मदतीला आली. एवढी निष्ठूरता असतानाही वाळवंटात पाण्याचा झरा मिळावा तसे करुणेचे शिलेदार माणसांच्या मदतीला धावून आल्याचे दृश्‍य अवतीभवती दिसले. जशी वेळ आली, जशी गरज भासली तसतसी ही


मंडळी कसलीही अपेक्षा न करताना माणूसकी जपायला पुढे आली. कुणी अन्नधान्याच्या किट्स,
कुणी ऑक्सिजन सिलिंडर, कोणी रुग्णवाहिकेतून गंभीर रुग्णाला ने-आण करणे, स्थानिक नेत्यांनी कोविड सेंटरच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे आदी मदतीची कामे जीव धोक्या घालून पार पाडली. यातून करुणेचे दर्शन महामारीच्या काळोखाने झाकोळले गेले असले तरी मानवी मनातील ‘करुणे’ची ताकद मात्र पुन्हा नवे जग, नवीन आशा निर्मितीचे बळ ठरणार आहे. सोशल डिस्टनसिंग, होम क्वॉरंटाइन, आयसोलेशन, ऑक्सिजनची गरज, म्यूटेशन, इम्यूनिटी पॉवर यासारखे अनेक शब्द नव्यानेच कानावर पडले. त्या त्या शब्दांची गरज जाणिव निर्माण करुन गेली. परंतू त्याचबरोबर ‘करोना’ या शब्दसाधर्म्यामुळे ‘करुणा’ या महाशब्दाला कमीपणा आणण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा क्षणभर भ्रम निमाण व्हावा, अशी स्थिती आहे. परंतू कितीही झाले तरी शेवटी ‘करुणे’चाच विजय होईल हे नक्की.
यानंतरही असाच संकटांचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे, ही खुणगाठ मनाशी बांधून आपल्याला आपल्या कुटुंबाला हा प्रवास करावाच लागणार आहे. बुद्धांच्य करुणेला शरण जाऊन मानवामागे लागलेल्या या करोनारुपी राक्षसाला पराभूत करावेच लागेल. त्यासाठी थोडे धैर्य ठेवावे लागेल. संपूर्ण जगाला ‘महाकारुणिक’ तथागतांनाच शेवटी शरण जावे लागणार आहे. नमो बुद्धाय !!

गुरुवार, 29 अगस्त 2019

विज्ञानातील स्थितंतर

विज्ञानातील उत्क्रांती म्हणा वा स्थित्यंतरे हे विशिष्ट टप्प्यांवर पदोपदी घडत जातात. कारण विज्ञान परिवर्तनशिलता मानते. भौतिकशास्त्र घटनांकडे एकेका "फ्रेम' मधून पाहत असल्यामुळे प्रत्येक घटनेमागचे रहस्य समजून घ्यायचे असेल तर त्या त्या फ्रेममधून एकेक बाबी स्पष्ट होउ पाहतात.
ठळक टप्प्यात विज्ञानाची कार्यशैली समजून घ्यायची असेल तर वीसच्या दशकात विज्ञान प्रामुख्याने दोन गटात विभागले जाउ लागल्याचे आपल्या निदर्शनास येते. पहिला गट म्हणजे पदार्थ मानणारा, तर दुसरा पदार्थांच्या पलिकडे जाउन त्यातील "एनर्जी' च्या रूपातून निर्माण होणा-या "वेव्ह' स्वरूपात जाणणारा. या "वेव्ह' किंवा लहरी कशा बनतात, यामागचे रहस्य पुढे समजून घेउ. सदयाच्या मुद्‌दयावर ऐवढेच समजून घेउ. विज्ञानाच्या भाषेत बोलायचे झाले तर पदार्थांवर संशोधन करून भौतिकातील काटेकोर नियम सांगणारे क्‍लासीकल फिजीक्‍स व दुसरा गट क्‍वॉंटम फिजीक्‍स. क्‍वॉटम फिजीक्‍स जाणण्यासाठी दृष्टी व जाणिव अधिकाधिक सूक्ष्म करावी लागते. तिथे स्थुल स्वरूपात वेगळा तर सूक्ष्म रूपात वेगळा असा द्विअंगी अनुभव येतो. जरी हा अनुभव प्रत्यक्ष डोळयांनी दिसत नसला तरी त्यातील घडामोडी मात्र अगदी सुक्ष्मातिसूक्ष्मरित्या समजतात. म्हणजे ख-या अर्थाने अणूरेणूचे एकंदर वागणे "डयुयॉलिटी' स्वरूपाचे असते, असे लक्षात येते. म्हणजे पदार्थ एकतर अणूरूप तसेच लहरी असा दोन स्थितीत अनुभवायला मिळतो.
वैज्ञानिक विश्‍वातील परिभाषांना नवी दृष्टी देणारे वर्नर हेईजनबर्ग यांनी ख-या अर्थाने "अनसर्टीनिटी प्रिंसीपल' सांगून मानवजातीची अख्खी दृष्टीच बदलून टाकली. त्यांनी 1927 मध्ये अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत प्रतिपादीत करताच सगळयांची बोबडी वळली. त्यावेळी अल्बर्ट आईनस्टाईनचा सापेक्षततेचा सिद्‌धांत बराच लोकप्रिय झाला व तो सद्‌सदविवेकबुद्‌धीच्या कसोटीवर खरा ठरला होता. सृष्टीचे एकूण तत्व हाती लागल्याचा जगाला अतिव आनंद झाल्यामुळे सगळीकडे आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्‌धांताचा उदोउदो सुरू होता. जणू स्वर्ग दोन बोटे उरल्याचाच मानव जातीला आनंद झाला असावा. त्याच्यामागचे कारणही तसेच होते. सापेक्षता सिद्‌धांत इलेक्‍ट्रान, प्रोटान, न्यूट्रानच्या एकंदर स्थितीवर सापेक्ष भाष्य करणारा होता. म्हणजे सृष्टीत घडणा-या प्रत्येक पदार्थाचे भविष्य कसे असेल, याबद्‌दल अणूंच्या गतीवरून ते सिद्‌ध करता येत असल्याचा अविर्भाव दाटून आला होता. यातील विनोद म्हणजे सापेक्षतावाद जर एखाद्या मच्छराच्या बसण्यावरून त्याची पुढील स्थिती सिद्‌ध करीत असेल तर मग पुढे तो मच्छर जर मरणार तेव्हा तो नेमका कशाने मरणार आहे, मस्कीटोमॅटने की एखाद्याच्या अंगावर बसल्यामुळे त्याच्या थापेने? असा प्रश्‍न हेडजेनबर्ग याने केला होता. वास्तविक पाहता दोघेही आपापल्या ठिकाणी अगदी योग्य होते.
जर्मनशास्त्रज्ञ वर्नर हाईजनबर्ग यांचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांतावरून आईनस्टाईन यांच्यात नंतरच्या काळात बरेच वादविवाद झाले. हेईजनबर्गच्या सिद्‌धांतावरून क्‍लासिक फिजीक्‍समध्ये अख्खे विज्ञान दोन गटात विभागल्या गेले. कालपरवापर्यंत या मतभेदातील दरी कायम राहिली. मात्र आता केवळ तार्किक बुद्‌धीचेच परिमाण न लावता शास्त्रज्ञ वेगळया दृष्टीतून बघायला लागले आहेत. म्हणून आधुनिक विज्ञान आता तर्काची भाषा सोडून वेगळी भाषा बोलायला लागले आहे. या वादातून आईनस्टाईन यांच्या संशोधनाला त्याकाळी तथाकथीत विज्ञानवादी "यहुदी विज्ञान' म्हणून हिणविले जायचे. सृष्टीचा व्यापार निसर्गानेच निर्माण केलेल्या "परफेक्‍ट' नियमानुसार चालतो, असा आईनस्टाईचा दावा होता. तो नियम कोणता तर "सापेक्षतावाद' यानुसार चालतो, असे आईनस्टाईनचे म्हणणे होते. अनेकदा निसर्गाच्या घटनांबाबत भाकीत करणे किंवा आपण पाहतो त्याप्रमाणे त्यांची योग्य स्थिती समजून घेता येणे शक्‍य नाही, थोडक्‍यात यालाच अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत म्हणतात.
हाईजनबर्गचा अनिश्‍चिततेचा सिद्‌धांत समजून घेण्यापूर्वी आईनस्टाइनचा सापेक्षता वाद समजावा लागेल.

जग हे अनिश्‍चितीतेचे

uncertentity principal
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते' अशी आपल्याकडे म्हण आहे. दैनंदिन जीवनात त्याचा पदोपदी प्रत्ययही येतो. निश्‍चित हे जग कसे आहे, कशाने बनले आहे, यामागचे सत्य स्वरूप कसे असावे, हा प्रश्‍न शेवटी माणसाला पडतोच. त्याचा शोध आजपर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आताही तेच करीत आहेत. उद्याही त्यांचा प्रवास असाच सुरू राहिल. तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्‍तींनी वर्षानुवर्षे जगाच्या मागचे रहस्य उलगडण्याचा आपापल्या त-हेने प्रयत्न केला आणि करताहेत. जग हे नेमके कसे असते, याचा उलगडा कुणालाच होउ शकला नाही, असेही म्हणता येणार नाही. दुर्दैवाने म्हणावे तर त्यामागचे रहस्य आपल्यालाच पूर्णपणे कळू शकले नसावे, कदाचित ! यामागचे कारण असे की ज्या महापुरूषांना जग जसे दिसले, तसे सांगण्याच्या त्यांनी प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या भाषेपर्यंत किंवा त्यांनी घेतलेल्या अनुभवांपर्यंत पोहचण्यात आपणच कमी ठरत असावे, हे सुद्‌धा त्यामागचे कारण असू शकते. आजच्या विज्ञानातील "कॉम्प्यूटर सिम्यूलाईजेशन हायपरथेसिस' या सिद्‌धांताप्रमाणे महापुरूषांच्या अनुभवातील "ब्रम्ह सत्य, जगं मिथ्या' हा उपदेश पुरेसा असू शकतो. किंवा होलोग्राफिक प्रिंसीपलप्रमाणे प्रोजेक्‍टरमधील प्रकाशाच्या एका बिंदूतून पुढे जगाच्या अफाट विस्तारापर्यंत विकास पावलेल्या स्थितीपर्यंतही जगाचा प्रवास असू शकतो. आनंदने केलेल्या प्रश्‍नावर बुद्‌धाने दिलेल्या उत्तरातून जग क्षणोक्षणी प्रसरण पावत आहे, असा उपदेश करण्यामागे बुद्‌धांचे विज्ञानच नाही का?
हजारो वर्षांपासून भारतीय अध्यात्मशास्त्रातील "पिंडी ते ब्रम्हांडी' या सुत्रातूनही नेमके हेच अधोरेखित होते. म्हणून कुठेच उणेपणा न येता बुद्‌धपुरूषांची वचने आजही सर्वश्रेष्ठच ठरतात. ज्या महापुरूषांना हे कळले ते यातील "माईलस्टोन' म्हणून जगापुढे सिद्‌ध झाले. परंतु कुठल्याच संकल्पना पूर्णपणे समजून न घेता आपण निव्वळ विरोधाच्या पातळीवरच जाउन आपण स्वतःचे नुकसान करून घेण्यास कारणीभूत असतो. प्रत्येक धर्माने जगाचे स्वरूप कसे असते हे सांगण्याचाच प्रयत्न केला. परंतु आपण मात्र त्याचा मर्थितार्थ समजून घेण्याऐवजी धर्माच्या बाहयरूपातच मग्न झालो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञानातील भांडण वर्षानुवर्षे हे असेच सुरू राहणार आहे. खरे म्हणजे स्वतःला पदोपदी बदलविण्यात विज्ञान दिवसेंदिवस विनम्र मानत असते. दिसणा-या भ्रामक कल्पनांमधून बाहेर पडा, असा संदेश अध्यात्म देते. त्यावेळी आपण कधीच "सिरियस' नसतो. एकंदर कसे की आपण धड अध्यात्मीक किंवा विज्ञानविषयी जाणून घेण्यास दोन्ही पातळीवर अंधश्रद्‌धच असतो. मार्क्‍स म्हणतो त्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. पण सदासर्वकाळ काही मूठभर लोकांसाठीच धर्म ही अफूची गोळी राहू शकतो. सगळयांसाठीच नाही. अनेकांसाठी तो सन्नमार्गावर चालण्यासाठी प्रेरक ठरत असतो. धर्म हा माणसाला नितीतत्वाशी जोडतो व एका उदात्त अशा ध्येयाकडे घेउन जातो. सरतेशेवटी आईनस्टाईनसारखा शास्त्रज्ञही म्हणून गेला की विज्ञानाशिवाय कुठलाही धर्म (कॉस्मीक रिलीजन) नसावा आणि धर्माशिवाय विज्ञान नसावे. कट्‌टरता ती धार्मिक असो वा पुरोगामी यातील कुठलीच गोष्ट योग्य नाही. म्हणून जे प्रत्यक्ष डोळयांनी दिसते आहे, ते तसेच असावे का, याबद्‌दल शंका घेणे ही आज खरी वैज्ञानिक बाब म्हणून पुढे येत आहे. यासाठी अनेकानेक सिद्‌धांत मांडण्यात आले. हे सर्व सिद्‌धांत समजून घ्यावे लागतील. उलट त्यांना टाळतो म्हटले तर सत्यापासून दूर जाण्यासारखे किंवा अंधारात जगण्यासारखी चूक कुठलीच ठरणार नाही.
विजयकुमार राउत 

मंगलवार, 2 अक्टूबर 2018

माणूस होण्याच्या मार्गातील "उत्कलनबिंदू' तथागत


विजयकुमार राउत


बुद्‌ध म्हणजे गर्भअंधारयुगात भारतवर्षाला पडलेले एक तेजोमय, स्वयंपूर्ण, सर्वांगसुंदर असे स्वप्न. तथागत म्हणजे संधीकाळात गवसलेले शांती, करूणेचे स्वच्छ, कोरे क्षितीज. तथागत म्हणजे शंभर टक्‍के अस्सल माणूस होण्याची शाश्‍वती आणि उपलब्ध असलेली संधी. भारताच्या पदरात असंख्य युगानंतर पडलेला "डायमंड' म्हणजे तथागत. माणसाच्या जगण्याचे एका सुंदर फुलात रूपांतरण घडवून आणणारे एक चमत्कारीक रसायण म्हणजे तथागत. माणूसपण गोठलेल्या मातीत माणूस होण्याची शक्‍यता होउन सर्वदूर प्रसरण पावणारा सर्वोच्च असा "उत्कलनबिंदू' तथागत भगवान बुद्‌ध.
खुद्‌दनिकायाच्या इतिवुत्तकपाळीमध्ये स्वतः तथागतांनी "तथागत' या शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, हे भिख्खूंनो, तथागत जसे बोलतो, तसे करतो, आणि जसे करतो तसे बोलतो. तो यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी म्हणून "तथागत' म्हटल्या जातो. "तथागत' हे बिरूद स्वीकारण्याचा बुद्‌धांचा जो विचार आहे, तो स्वयंपूर्ण आहे. या शब्दाचा अर्थ समजावून घेताना अधिकाधिक सकारात्मकतेने थोडेसे संतुलीत होउन सैल व स्वैर फुलपाखरासारखे स्वच्छंद व्हावे लागते. परंपराचे अवजड ओझे झिडकारून द्यावे लागते. तेथे आपला "स्व' म्हणजे निरर्थक "इगो'चा तनाव विसर्जित करावा लागतो. मनाचा गोंधळ आणि बडबड शांत करावी लागते. "तथागता'चा अर्थ आहे, जसे आहे तसे पाहणारा, जसे आहे तसे स्वीकारणारा, जसे आहे तसे सांगणारा, आणि जसे आहे तसे वागणारा ! आता हे "जसे' आहे "तसे' म्हणजे याचा नेमका अर्थ तरी काय? ते आपल्या विचार-अविचारंच्या तथाकथीत ज्ञानाच्या कक्षेत बसते काय? "तथागत' या अर्थाने गौतम बुद्‌ध "मल्टीडायमेंशनल' आहेत, यात वादच नाही. सर्वांत अगोदर आपल्याला आपली दृष्टी, बुद्‌धी व त्यानंतर इंद्रीयोगोचर जे कमीअधिक अनुभव वाटयाला येतात, त्याकडे निरपेक्ष बुद्‌धीने बघावे लागेल. त्याचे निर्दोषत्व तपासावे लागेल. आपल्या धारणा ज्या गोष्टींवर अवलंबून असतात, त्याची क्षमता बुद्‌धत्वाच्या सम्यक ज्ञानावर घासावी लागेल. सर्वप्रथम आपल्याला हे विचारात घ्यावे लागते की आपल्याला दिसते ते सत्य की तथागतांनी म्हटलेले सत्य? तथागत हा शब्दच "डायमेंशनल' आहे. ऑरिस्टाटल, प्लेटो किंवा साक्रेटीसपूर्वी सत्य बुद्‌धाने शोधले होते.
निसर्गातील वस्तूंबद्‌दल विश्‍लेषण करण्याची परिपूर्णता सम्यक ज्ञानातून उपलब्ध होते आणि ती प्राप्तच करावी लागते. येथे ख-या अर्थाने प्रयत्नवादी व्हावे लागते. म्हणून भगवान बुद्‌ध आणि त्यांचा धम्म विचारवंताच्या दृष्टीने शुद्‌ध विज्ञानवादी ठरतो.
"सम्यक' म्हणजे balance हा शब्द देणारा बुद्‌ध हा पृथ्वीतलावरील पहिला आणि शेवटचा ज्ञाता होय. आजच्या काळात balance या शब्दाचे किती महत्व आहे, हे आपल्या जीवनात पदोपदी ध्यानात येते. कट्‌टर धार्मिकतेच्या काळात एक सम्यक व संतुलित भाषा देणारे बुद्‌ध म्हणून कोणलाही सहज भावतात. सुख आणि दुःख या केवळ मानसिक अवस्था होत, हे सांगणारा पहिला मानसशास्त्रज्ञ बुद्‌धच आहे. धर्माचा गवगवा करणा-यांना तो सांगतो की धम्म हे केवळ आपल्या उद्‌दीष्टपूर्तीचे साधन होय, असे सांगणारा पहिला तत्वज्ञानी बुद्‌धच ठरतो. विश्‍व नित्य प्रसरण पावते, हे सांगणारा पहिला वैज्ञानिक बुद्‌धच ठरतो. आईनस्टाईन आणि "ऍपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्जही हे मानतो. बुद्‌धत्वाला सत्याच्या मार्गात अंतिम आणि अढळ असे स्थान आहे. म्हणून देश, काल आणि परिस्थितीच्याही सिमा ओलांडून दीर्घ काळ बौद्‌ध धम्म टिकून राहतो. बुद्‌ध जगात सत्य, अहिंसा व करूणेच्या बळावर स्थायीत्व मिळवितो. बुद्‌धाच्या जागरूक मार्गाने "निब्बान' अवस्थेपर्यंत पोहचल्यानंतर जीवनाची फलश्रृती होते. बुद्‌धाला वैशाख शुद्‌ध पौर्णिमेला ज्ञान प्राप्त होते, यात निसर्गाची भूमीका फार मोलाची ठरते. याचा प्रत्यय आपल्याला एखादा चित्रपट पाहताना येतो. चित्रपटाचा दिग्दर्शक ज्याप्रमाणे कथेला साजेसी पार्श्‍वभूमी निर्माण करून ते अधिक प्रभावकारी होण्याच्या दृष्टीने वातावरणाचा backgraoundच्या सहायाने दृश्‍याची उभारणी करतो, तशीच बुद्‌धाच्या जन्माच्या वेळी निसर्गाने केलेली पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची योजना सुचक आणि दिशादर्शकच नव्हे तर "क्‍वॉंटम' दुनियेत खरी ठरते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्‌ध जेव्हा आपल्या पाच सहका-यांना उपदेश करायला वाराणसीकडे निघाले, तेव्हा उरवेला आणि गया या प्रांतामध्ये उपक अनिषक बुद्‌धाला आश्‍चर्याने म्हणतो,
तुझी इंद्रीये विशेष प्रसन्न आहेत, तुझी कांती परिशुद्‌ध आणि उजळ आहे. ज्ञानातून येणारी एक विशेष चकाकी बुद्‌धांच्या कांतीला तेजस्वीता प्रदान करीत होती. दैनंदिन जीवनात एखादया वेळी काही सुचले की तर आपल्याला कोण आनंद होतो. आपल्या चर्येवर ज्ञानाची कवडसे पसरतात. तसेच बुद्‌धाचेही झाले. बुद्‌धाला तर सर्वज्ञान प्राप्त झाले होते. त्यांची अवस्था कशी असेल ! असे म्हटल्या जाते की ते ज्या मार्गाने चालत जायचे, तेथे अवकाळीच "कमळे' फुलायची.
एक साधे सत्य कळायचे असेल तर अख्खे आयुष्य उधळून लावायची तयारी असायला हवी, अशी शिकवण बुद्‌धांच्या जीवनातून मिळते. सत्य हे "मल्टीडायमेंशनल' असते. त्याला एक नव्हे तर असंख्य बाजू असतात, असे आजचे विज्ञान सांगते. म्हणून बुद्‌धाला पूर्णपणे समजणे हे कोणालाच जमत नाही. अलीकडे "क्‍वॉंटम थेअरी' मुळे सगळया विचारधारा भराभर ढासळायला लागल्या. आधुनिक विज्ञान आतापर्यंत केवळ दहा "डायमेंशन'वर पोहचले. इतर देशातील तज्ज्ञ हे समजत आहेत. अडिच हजार वर्षांपासून बुद्‌धाच्या तत्वज्ञानात कुठेच कमतरता येत नाही. बुद्‌धांच्या समकालीन असलेले वर्धमान महावीरही मात्र पंचेविस "डायमेंशन' जाणत होते. म्हणून आपण म्हणतो ते सत्य आणि बुद्‌ध ज्या परिपूर्ण दृष्टीतून मांडतात "ते सत्य' यात जमिन आसमानचा फरक आहे. आपण जे काही बोलत जातो ते अर्धसत्यच ठरतं. व्यक्‍ती जितकी मोठी, तितकी सर्वसामान्य जनतेची समजण्याची पात्रता कमी, तितके त्यांचे पंथ, उपपंथ अधिक. मतामतांचा गलबला फार. बुद्‌धांना अडिच हजार वर्षांनंतर कितीही जाणले तरी ते अपूर्णतेकडेच घेउन जाणारे ठरते. बुद्‌धाच्या मार्गाने प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभत नाही.
विजयकुमार राउत
8888876462

गुरुवार, 21 दिसंबर 2017


मी'ज्ञान

* विजयकुमार राउत
..........
ज्ञान, विज्ञानाच्या कक्षा रूंदावत गेल्या. माणसाने कर्तृत्वाच्या सगळया दिशा पादाक्रांत केल्या. सगळे शोध लागले. तरीही काहीतरी राहूनच गेल्याचे शल्य हातात उरले. काय आहे ते? सिकंदर, सम्राट अशोक आणि अलिकडचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांना जीवनात संघर्ष करून काय मिळाले? यांच्या विजयाला अपयशाची काळी किनार का?मोबाईल, इंटरनेट सारखी साधने हाती लागूनही संवाद का होत नाही? असे अनेक प्रश्‍?न दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. दुनियेतल्या सगळया ज्ञानाची ओळख झाली परंतु "मी' तरीही कायमच उरला आहे. "मी' जाणल्याशिवाय माझं जिवन कसं असेल, याचे उत्तर मिळणार नाही.
***********************
"मी' आणि "माझे' या चक्रव्यहात आपण आजन्म गुंतलेले असतो. मी आणि माझया पलिकडे काही नाहीच, अशी आपली ठाम धारणा असते. मला कोण काय समजते, यावर आपल्या जीवनाची अख्खी इमारत उभी राहते. स्वतःची स्तुती करताना सुप्तावस्थेत असलेला "मी' अधूनमधून डोके वर काढतोच काढतो. आयुष्यभर खोटया समजूती , खोटया कल्पनेत वावरताना आपण सत्यापासून खूप दूर गेलेले असतो. जीवनभर ज्याला आपण ज्ञान संबोधतो मुळात ते जसे समजतो तसे नसतेच. आपण एकमेकांची स्तुती करतो, म्हणजे नेमके काय करतो? याचं उदाहरण म्हणजे इसापनितीतील जिराफला कावळा म्हणतो काय तुमची सुंदर मान आहे ! आणि मग कावळयाला खुश करण्यासाठी जिराफही त्याची भरभरून स्तुती करतो. म्हणतो, काय मस्त तुमचा आवाज आहे ! फार सुंदर गाता तुम्ही !' या दोघांचीही स्तुती खरी आहे का ? दोघांनाही बरं वाटावं त्यासाठी हा सगळा खटाटोप असतो.समाजाचा व्यवहारही असाच चालतो. खोटं खोंटं जगणं नशिबी येतं. शेक्‍?सपिअरने म्हटल्याप्रमाणे आपण दुनियेच्या विशाल रंगमंचावरील केवळ एक पात्र ठरतो. समाजात वावरताना अनेक भूमीका पार पाडत जातो. बरं भूमीकेचं जाउ द्या, खर तर आपण जीवन जगतो का?दुभंगलेले व्यक्‍?तीमत्व घेउन आपण जगत असतो. क्षणात एक विचार, दुस-या क्षणात दुसरा विचार. कधी राग, कधी क्रोध या दोन टोकांवर आपण विभागलेले असतो.
सिद्‌?धार्थ ऐश्‍?वर्याचा त्याग करून सत्य शोधायला गेले आणि बुद्‌?धत्व प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा सगळा शोध संपला. सत्य शोधण्यासाठी योग्यता कमवावी लागते. त्यासाठी बुद्‌?ध देवत्व नाकारतात आणि आचरणाला महत्व देतात. देवत्वाठी आग्रह धरण्याऐवजी पंचशिल पाळण्याचा नियम सांगतात. या नियमातूनच मग खरा माणूस घडण्याची किमया घडत असते. "तथागत' शब्दाचा अर्थ होतो तथ्यागत...तथ्य, सत्य असेल तेच बोलणार. किंवा जसं आहे तसं स्वीकारणे. सत्याच्या पलिकडे काहीच नाही. सत्याच्या थोडयाफार अंशाला आपण सत्य समजून असतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग असल्यामुळे विज्ञान असं म्हणतं, विज्ञानात तमकं सांगीतले आहे. आपल्या विधानाला सत्याचा आधार मिळाला किंवा समोरच्याने ते ग्राहय मानावे, यासाठी सुरू होते आपली अहमहिका. सायंटीफिकली ते सिद्‌?ध झालेले आहे, बरं का, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अंतिम सत्य सांगीतल्याचा आपला समज असतो. देशात विज्ञान , तंत्रज्ञान अधिकाधिक उन्नत व्हावे, असे कुणाही सुज्ञ व्यक्‍?तीला वाटणार. परंतु समाजात जो विज्ञानाचा दावा करतो त्यानं तरी विज्ञानाची किती माहिती घेतली? स्वतःला कधी "अपडेट'केलं का? विज्ञान दररोज नवनवी क्षितीजे व्यापत आहे. जुने आणि नवे याचा संगम विज्ञानात पहायला मिळतो. म्हणून विज्ञानही अंतिम दावा कधीच करीत नसते. मात्र जे विज्ञानाविषयी अल्पज्ञानी असतात, ते मात्र विज्ञानाच्या नावावर भांडायला तयार होतात. वाद घालतात. स्वतःला पुरोगामी समजून स्वतःचीच हेटाळणी करतात. त्यालाच नकली पुरोगामित्व असे म्हणतात. विज्ञानात काम करणारे अनेक शास्त्रज्ञ अगदी विनम्रपणे आपल्या मर्यादा आणि सत्याचे अमर्यादीत्व ओळखून झटत आहेत. केवळ अल्पांशाने सत्य हाती लागले आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मानतात. परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या नकली पुरोगामीत्ववादाने पछाडलेल्यांनी केलेल्या दाव्यात फक्‍?त "मी' असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात सत्याचा अंशही सापडणे कठीण असते. जसे पुरोगामी तसेच प्रतिगामी. दोन्ही निव्वळ बुडबुडे. दोघेही दावे देत भांडत बसणार. लिळाचरित्रातील "चार आंधळया'सारखी यांची गती.
सत्य जाणणारा साक्रेटीस तर म्हणतो , "आय क्‍?नो, आय डोंट नो', "सत्यम शिव सुंदरम'...आपले जीवन सुंदर असायला हवे, असे वाटत असेल तर सत्याने जगायला शिकले पाहिजे. अलिकडे शब्दांचा वापर जास्त प्रमाणात होउ लागला आहे. संवाद साधण्यासाठी मोबाईल, इंटरनेट सारखे विविध उपकरणे आपल्या हातात आली आहेत. तरीही संवादातील " गॅप' अजूनही आपल्याला भरून काढता आली नाही. भाषेने नवनवीन शब्द शोधून काढले तरी सत्यापर्यंत ती नेउ शकली नाही. कधी नव्हे इतकी समाजात दरी निर्माण झालेली आहे. प्रत्येकाला काहीतरी सांगण्याची घाई झालेली आहे. जगण्यातला वेग वाढतो तसतसे आपण विनाशात्वाच्या दिशेने फार वेगाने सरकत जातो. कुणाला श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे. कुणाला स्वतःची प्रतिमा तयार करण्याची घाई झालेली आहे. ही घाईच सर्व बाजूंनी व्यापून अक्राळविक्राळ समस्येचे रूप धारण करीत आहे.
"मी' किंवा माझी ओळख झाल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही. सगळे दावे खोटे ठरतात. सगळया कल्पना ,सगळया व्याख्या फोल ठरतात. भगवान श्रीकृष्णाने स्वतःला "अहं ब्रम्हास्मी' म्हटलं. त्यामुळे समाजात घोळ निर्माण झाला. प्रत्येक जण स्वतःला "ग्रेट' समजायला लागला. दुस-याला तुच्छ लेखण्याशिवाय त्याचे "मीत्व'अपूर्ण राहू लागले. अडिच हजार वर्षापूर्वी मात्र बुद्‌?धाने "अत्त दीप भव' म्हणजे "तूच तुझा प्रकाश हो' म्हटलं तेव्हा त्याला भाषेतलं आणि एकूणच जगण्याचं सत्व कळलं. मित्रांनो, माणूस होण्याची वाट सरळ नाही. आणि सत्य जाणल्याशिवाय मनुष्य प्राण्यातील अपूर्णत्व कायमच राहणार. मानवी जिवनातील पूर्णत्व जाणून घेतल्याशिवाय संत साहित्यातील सत्व कळत नाही. कुणाला वगैरे नाव ठेवणं तर सगळयात छोटी गोष्ट. "मी' शिवाय जे कळायला लागते ते ज्ञान . ज्यात "मी' म्हणजे अहंभाव असतो, ते केवळ अज्ञानच !
"मी' पण ज्याचे पक्‍व फळापरी
अलगद गळून पडले हो !
जीवन त्यांना कळले हो !
असे कविवर्य बा.भ.बोरकर म्हणतात ते उगाच नाही !

गुरुवार, 23 मार्च 2017

डोळे उघडा "वि'ज्ञानेश्‍वरा !


विजयकुमार राउत

अवघ्या 18 वर्षात ज्ञानेश्‍वरी सारखा ग्रंथ लिहून जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा संत ज्ञानेश्‍वर 700 वर्षापूर्वी होउन गेला, यावर कुणाचा विश्‍वास बसत नसेल. इवलंस रोप आणि त्याच्या प्रतिभेचा वेलू केवढा? तर गगनाला भिडणारा...सगळया ज्ञात अज्ञात जगताचं कोडं त्यानं आपल्या प्रतिभेच्या उत्तुंगतेतून उघडं केलं, हा वागविलासाचा केवढा मोठा प्रताप !
"मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा' अशी ज्ञानेशाची हळूवार समजूत काढताना लहानगी बहिण मुक्‍ताई आईची ममता अंगी शिरवून दुनियेची रितभात सांगते. तेव्हा ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभावंतालाही आपल्या कर्तृत्वाची जाण यायला वेळ लागत नाही. मित्रहो असे "ज्ञानेश्‍वर' जेव्हा जेव्हा जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या वाटयाला सा-या जगाचा उपहासच येत असतो. हा निसर्गनियमातील विरोधाभास, आणि तो निसर्गमान्य आहे, हेच खरे. उजेडाला व्यक्‍त व्हायला शेवटी काळोख हवा असतो !
ैहम घरमे जब दीप जलाने लगते है !
घरके अंधेरे शोर मचाने लगते है!!
कधी कधी चिंतातूर जंतूचं मात्र हसू येतं. त्यांची शंका अशी की सोळा वर्षाचा कोवळा मुलगा अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी काय लिहितो.....21 व्या वर्षी समाधी काय घेतो.. इत्यादी..इत्यादी..(आमचा घोडया दहावीची परीक्षाही निट पास होत नाही. नापास झाल्यानंतर राजकारण किंवा क्रिकेटशिवाय त्याला काही येतही नाही...म्हणून)कविवर्य गोविंदाग्रजांची शपथ घेउन त्यांची माफी मागतो. असा विरोध करणे हेच चिंतातूर जंतूंचं एकमेव आणि पोष्टीक खाद्य असावं, अशी मलाही नाईलाजाने शंका यायला लागली! कदाचित निव्वळ विरोधावरच या जंतूचं पोषण उत्तमरित्या होत असावं, त्यामुळे त्यांना अनेक युगाचं आयुष्य आहे. जिते रहो...!!
सदया असे शंकासुर आणि चिंतातूर जंतूच समाजात युगेयुगे इतिहासाचं उत्खनन स्वतःच्या फायदयासाठी करताना दिसतात. आपल्या आपल्या कुवतीनुसार जातीपातीत संत, महापुरूषांची विभागणी करून त्यांना जातीच्या कोंदनात बसवून पुजा बांधली जाते.
मित्रहो, हा देश युवकांचा देश म्हणून सा-या जगात गणल्या जातो. परंतु येथील युवकाचे जगणे खरेच युवकासारखे आहे का? त्यांचे मानसिक वय किती वर्षाचे? असे प्रश्‍न निर्माण होतात. जी विद्याशाखा पुढे येते, युवक करिअरसाठी मोठया संख्येने त्या शाखेत प्रवेश घेतात, ती विद्याशाखा कालांतराने बेरोजगार करण्याइतकी पांगळी कशी काय होते, हेच कळत नाही. कुठलीही विद्याशाखा विस्ताराने खुप मोठी असते. तिथपर्यंत िंकंवा तिच्या आसपासही आपण पोहचू शकत नाही. आपण आपल्या प्रतिभाशक्‍तीच्या जोरावर त्या शाखेला अधिकाधिक समृद्‌ध करू शकतो, हे आमच्या गावीही नसते. म्हणून नवनविन संशोधनावर काय फक्‍त पाश्‍चात देशाचीच मक्‍तेदारी असावी?
ज्या समाजात प्रतिभावंत शास्त्रज्ञ , विचारवंत, कवी, कलावंत, खेळाडू जन्माला यायला हवेत, त्या समाजात जास्तीत जास्त संख्येने आता केवळ आणि केवळ "एकसारखे'च जन्माला येताहेत. जागोजागी मेंढराचे कळप तयार होताहेत. म्हणून आजचे "ज्ञानेश्‍वर' बेरोजगार होउन गल्लोगल्ली भटकताना दिसतात. त्यांच्या हाताला काम नाही. पुस्तकांच्या ठिकाणी मोबाईल आला आणि आमचे "ज्ञानेश्‍वर' आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवरून आपल्या कर्माच्या सुसाट ओव्या लिहित सुटले आहेत. या नवीन ऍप्सवरून नवीन नवीन अफवांचे पिक घेण्याचा मौसम अनुकूल होत आहे. नवनवीन शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या फायदयासाठी एखादया विषयावर "जावई शोध' लावून एखादयाच्या चारित्रयावर शिंतोडे उडविण्यातच सगळी उर्जा वाया घालविली जात आहे. कट्‌टयावर बसून फालतू चर्चांत वेळ दवडू लागले आहेत. संशोधनाची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याऐवजी "कॉपी पेस्ट' करून त्यात "मास्टरकी' मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात पुस्तकांची आवड कमी झाल्यामुळे मोबाईलवर "गेम' खेळून आपल्याच जीवनाचा"गेम' करण्याकडे आपला "इस्ट्रेस्ट' वाढत आहे. पुस्तकाला "गुगल' हा पर्याय असूच शकत नाही, असे शहाणीसुरती माणसं म्हणतात.
आपली विज्ञानाविषयीची समजूतही फारच बाळबोध. शाळेत शिकत असताना जेवढे विज्ञान आपण आत्मसात केले त्यापुढे काकणभरही न सरकण्याची शपथ आपण शिक्षण पूर्ण होताच घेउन टाकतो. सदयाच्या काळात विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यापैकी आपल्याला काय माहिती आहे. नवनवीन संशोधनांची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत केल्या जाताहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादालाही "क्‍वॉंटम थेरी'तून चॅलेंज मिळत आहे. अख्खे जीवनाचे संदर्भ बदलून टाकणारा अतिवेगवान क्‍वॉंटम कॉम्प्यूटर जन्मास येत आहे. भविष्यकाळात भौतीक शास्त्रातील अनेक सिद्‌धांत "ब्लॅक होल' किंवा कृष्ण विवरांमुळे मोडीस निघतात की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तरीही आपण मात्र वैज्ञानिक अहंकार जोपासतो आहोत. विज्ञानाचा अहंकार सांगून आपले "पुरोगामित्व' पुढे करण्याचा नवीन अंधविश्‍वास तयार होत आहे. मुळात बदलण्यापेक्षा अहंकार जोपसणे आपल्याला महत्वाचे वाटते. परंतु शास्त्रज्ञ मात्र आम्ही शून्य पॉईंट शून्यावर आहोत, अजून काही ठामपणे सांगू शकत नाही, असे प्रामाणिक कबुल करतात.
थोर शास्त्रज्ञ न्युटनला एकदा त्याच्या मित्राने विचारले की, तू हे सर्व शोध कसे काय लावतोस ? त्यावर न्युटन उत्तरला की मी महासागरातील अथांग पाण्यातील एक थेंब आहे. मी माझ्या मोकळ्या वेळात येशु ख्रिस्ताचे चिंतन करीत बसतो. आम्ही शास्त्रज्ञ शोध कसे लावले सांगू शकत नाही. आम्ही केमीकलमध्ये केमिकल मिसळतो. वायरला वायर जोडतो व त्या निष्काम प्रयत्नातून अचानक आमच्या डोक्‍यातून वीज चमकल्यासारखा लख्खकन प्रकाश पडतो व नकळत आमच्या हातून शोध लागून जातो. पण या क्रियेच्या पाठीशी एकमेव ईश्‍वर असतो, असे न्युटन म्हणतो तेव्हा आमच्या बुद्‌धीची किव करावीसी वाटते.
अलीकडे शे-दिडशे वर्षापूर्वी जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्याचे मुळ ज्ञानेश्‍वारीत सापडते, म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरणार नाही. सुर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरते. हा शोध कोपर्निकसने दिडशे वर्षापुर्वी लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोध असल्यामुळे धर्ममार्तंडांनी त्याचा छळही केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सुर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्‍वरीत सातशे वर्षापुर्वीचे पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. आणि उदो अस्तुतेनि प्रमाणे। जैसे न चालता सुर्याचे चालणे। तेसे नैष्कर्मत्व जाणे।
उदय आणि अस्त होत असल्यामुळे सुर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सुर्याचे न चालता भ्रम निर्माण होणे हा ज्ञानेश्‍वरांचा क्रांतीकारक शोध नाही का?
असे ज्ञानेश्‍वर पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत. तेव्हाच आम्ही "आता विश्‍वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे' अशा पसायदानातून सा-या जगात विश्‍वाचा महागुरू होण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकतो. म्हणून ज्ञानेश्‍वरांवर टिका करणा-यांनी ते आपल्या गोड भाषेत काय सांगतात, याकडे लक्ष द्यावे.
माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आईवडिल कसे असावेत, हे माझया हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्‌दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्‍कीच सुखी करू शकतो. मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करीत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल ती संधी मी गमाविता कामा नये.
विजयकुमार राउत
8888876462


गुरुवार, 9 फ़रवरी 2017

अक्‍कल नाय? डोन्ट वरी.....


                                                                                                                 *विजयकुमार राउत
अक्‍कल नावाची काही गोष्ट आहे का तुझयाकडे? थोडी अक्‍कल तर वापरत जा ! परमेश्‍वराने अक्‍कल वाटली तेव्हा कोठे होतास रे?अशी वाक्‍ये नेहमीच्याच परिचयातली. अक्‍कल म्हणजेच सर्वस्व. थोडी चूक झाली की अक्‍कलेत कच्चे असलेल्यांना अक्‍कलवानांकडून टोमणे खाणे ठरलेलेच. बरं जो अकलेवरून इतरांना कमी लेखतो त्याने किती अकलेचे दिवे पाजळले याचा हिशेब मागायचा कोणी? काही जण दिवसरात्र "अकलेचेच तारे' तोडत बसतात. मित्रहो, सचिन तेंदुलकरने कुठली डिग्री घेतली? टाटा, धीरूभाई अंबानीनी कुठल्या "एमबीए'त गोल्ड मेडल मिळविले ? लता मंगेशकर यांनी गायनात कुठल्या विद्यापीठातून "पीएचडी' केले. देशविदेशात प्रत्येक मैफलीत "वाह उस्ताद' ही दाद घेण्यापूर्वी उस्ताद जाकीर हुसेन यांनी कुठल्या कॉलेजमधून "मेरीट' घेतले नाही. अशी अनेक उदाहरणे मिळतील. मग आपल्याजवळ "ती' नसली तर काय बिघडतं? असं कदाचित अक्‍कलशून्य माणसाला एखादवेळेस वाटू शकेल. परंतु अकलेच्या महाभागांना मात्र दुस-याजवळ नसलेल्या कुठल्यातरी नेमक्‍या अकलेबद्‌दल मरदुमकी वाटत असते आणि मग त्याच्या बुद्‌धीमत्तेवर अगदीच तोंडसुख घेणे म्हणजे शहानपणा समजतात. अक्‍कल नसली तर समाजात जगणंच अशक्‍य. बरं अक्‍कल आहे किंवा नाही हे कोणी ठरवावं?
बरं आज बुद्‌धीचे मापन करणा-या "आयक्‍यू'सारख्या "टेस्ट' खूप मागे पडल्याचे दिसून येते. एखाद्या क्षेत्रातील जेमतेम ज्ञान असणे आता "आउटडेट' होत आहे. आता नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होत आहेत. शैक्षकि मानसशास्त्रात आणखी नउ बुद्‌धीमत्ता जोडण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस नवनविन संशोधनातून पुढे येणा-या बाबीनुसार आता बुद्‌धीच असून चालत नाही. केवळ बुद्‌धी आणि बुद्‌धीच्या भरवशावर जगणारे पदोपदी मागे पडताना दिसतात. जुन्या संकल्पना नव्याने तपासून बघीतल्या जात आहेत. जुन्याला नवीन संकल्पनांची जोड देण्यात येत आहे. या संकल्पना नविन चष्म्यातून पाहण्यात येत आहेत. एवढच काय ते नाविण्य ! एरवी भारतासारख्या देशात या संकल्पना खूप खूप वर्षापूर्वीही होत्याच, हे आपण जाणतोच. या देशात तथागतांच्या बाबतीत "महाकारूनिक' आणि भगवान शंकराच्या बाबतीत "करूणावतारम' म्हटल्या जातं. "थर्ड आय' आणि "सम्यक ज्ञान' या अगदी समान संकल्पना. समाजातील असामान्य माणसं केवळ बुद्‌धीच्या भरोशावरच पुढे गेलीत का, याचा कित्येक दिवसापासून आढावा घेतला. असं लक्षात आलं की ज्या निसर्गानं आपल्याला मेंदू , ह्रदय यासारखी इंद्रीये दिली, त्याचा वापर कशासाठी करायचा? प्रत्येकाचं एक मर्यादित क्षेत्र आहे. प्रत्येकाचं कामही वेगवेगळं आहे. " IMGINATION IS GRATER THAN KWOLADGE* असं म्हणणारा असामान्य बुद्‌धीमत्तेचा धनी असलेला अर्ल्बटही आईनस्टाईनही काहीसं हेच सांगतो.
काल परवापर्यंत शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगाच "स्मार्ट' समजल्या जायचा. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमधील निसर्गरम्य ठिकाणी मातीत खेळणारे विद्यार्थी असोत नाही तर अमिर खानच्या "तारे जमिनपर' चित्रपटातील मंदबुद्‌धी समजला जाणारा विद्यार्थी. मंदबुद्‌धी म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या "न्यूटन'चेच उदाहरण घ्या. या देशात महान प्रतिभेचा शोध घ्यायचा असेल तर शेवटच्या बाकावरून घ्यावा लागेल, असे वक्‍तव्य डॉ.अब्दुल कलाम करतात,
"आयक्‍यू' सोबत आता तुमच्यात "ईक्‍यू' भावनिक बुद्‌धीमत्ता त्याचबरोबर "एसक्‍यू' आध्यात्मिक बुद्‌धीमत्ता नसेल तर बौद्‌धीक बुद्‌धीमत्ता कामाचीच नसल्याचे सिद्‌ध होत आहे. व्यक्तीच्या विकासात तार्किक बुद्धीइतकंच भावनेचंही महत्वव पुढं लक्षात येऊ लागलं आणि त्यातून भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन यांची संकल्पना पुढं आली. "इ' म्हणजे एनर्जी आणि मोशन म्हणजे गती यातून "इमोशन'शब्द आला. व्यक्‍तीच्या अवचेतन मनातील विचारांना सकारात्मक भावनांची जोड दिली तर स्वप्नांनासुद्‌धा पाहिजे तो आकार देता येतो, हे आजवरच्या महान प्रतिभावंताच्या कृतीतून दिसून येते. परंतु एवढयावरच संपले नाही तर आणखी एका बुद्‌धीमत्तेची गरज निर्माण झाली. त्याच्यापाठोपाठ गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर बहुविध बुद्धिमत्ता ही हॉवर्ड गार्डनर यांची संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्रात प्रचारात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बुद्धिमत्तेच्या नऊ वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर "एसक्‍यू'ही नव्याने आलेली संकल्पना सदया अख्ख्या जगात रूळली आहे. डॅना झोहर, सिंडी विगल्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी आध्यात्मिकता हा विषय केवळ धार्मिक अथवा तात्विक स्वरूपाचा नसून, मानसशास्त्रीय असल्याचं सांगून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा आधार दिला. त्यासंबंधीच्या मेंदूविषयक संशोधनाची जोड दिली आणि त्यातून माणसाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शास्त्रशुद्ध वेध घेतला.
लता मंगेशकर, पं.जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन आदी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या प्रकारात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्‍लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल. भावनिक बुद्‌धीमत्ता वाढविण्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणे, संगीत ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे यासारखे छंद जोपासता योत. प्रत्येक माणूसच संवेदनशिल असतो. परंतु त्याला आपल्या भावनांना निकोप बनविणे सहसा जमत नाही. भावनेच्या आहारी जाउन तो स्वतः कमकुवत करीत असतो. चित्रपट, नाटकातून अभिनय करणारा कलावंत काय करतो? भूमीकेत शिरून आपली भावनिक बुद्‌धीमत्ता पणाला लावूनच तो यशस्वी होत असतो. कला क्षेत्र भावनिक भूक भागविण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर अध्यात्मिक बुद्‌धीमत्ता कुठल्या धर्माशी जोडत नाही, तर आपले आपल्याशीच, आपल्या अस्तित्वाशी जोडत असल्यामुळे व्यवहारासोबतच जीवनातील प्रत्येक प्रसंगात यशस्वी होण्याचा मंत्र देते. प्रत्येक व्यक्‍ती काही ना काही वैशिष्टये असतात. ती शोधली तर आपल्याच "विक प्वाईंट'वर स्वार होउन यशाच्या दिशेने पुढचा प्रवास करता येतो. म्हणून आपल्याकडे काहीच नाही...म्हणून कुढत बसण्यापेक्षा तुमच्यातील उत्तम, सर्वोत्तम शोधले तर तुम्हीही जगात अप्रतिम होउ शकता. हे केवळ मी सांगत नाही, तर अलीकडचे संशोधन सांगते.
gazalesathi.blogspot.com

गुरुवार, 20 अक्टूबर 2016

सुफींचा स्वच्छंद


परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. या निसर्गापासून आपण जसजसे दूर होऊ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न निर्माण करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. निखळ हास्य ही मानवाला मिळालेली अप्रतिम अशी देणगी आहे, आणि तोच त्याचा स्वभावही. वेद-उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे अन्नकोष, मनकोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असा तो प्रवास आहे. "अन हल हक'ची साद देत रस्त्याने मस्तीत नाचत सुटलेला सुफी संत मंसूर खऱ्या धर्माचे अंतरंग उलगडतो. सुफी संप्रदायाचे तत्वज्ञान जीवनाच्या लयीशी तादात्म्य साधण्याचा एक छंद आहे, असं म्हटलं तरी चालेल.
प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते.
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी.
निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्‍स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्‍य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल्‌ फरिद, इब्न अल्‌ अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्‍वराच्या भक्‍तीकडे जाण्याची निवडली.
शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्‍चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
"इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे.

विजयकुमार राउत
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा रोड , नागपूर
8888876462

गुरुवार, 13 अक्टूबर 2016

सुफींचा सर्वेश्‍वरवाद


                                                                                           विजयकुमार राउत

परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे " पिंडी ते ब्रम्हांडी' असा तो मामला आहे. एक मात्र खरे या निसर्गापासून आपण जसजसे दूर होउ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न मग ते मानसिक असो वा शारिरीक पातळीवर निर्माण होत जातात. पुढच्या काळात समाजात अधिकाधिक मानसिक समस्याच उद्‌भवणार, असे एकंदर संशोधन सांगते. या सर्व समस्यांवर आध्यात्मिक जिवन जगणे हेच अचुक उत्तर असू शकते, हे एकंदर महात्म्यांच्या जीवन जगण्याच्या पद्‌धतीवरून लक्षात येईल. वेद उपनिषादतील "अहं ब्रम्हास्मी' असो किंवा सुफी संत मंसूर यांनी ईश्‍वर भक्‍तीत बेधुंद होउन दिलेली "अन हलक' ही हाक किंवा बुद्‌धांचे "अत्त दीप भव' तिन्हीचा अर्थ एकच. फक्‍त शब्दांचा काय तो फरक !
अध्यात्म हे शरिर आणि मनाच्या पलिकडे जाउन थेट शुद्‌ध आत्म्यापर्यंत घेउन जाणारे एकमेव शास्त्र आहे. त्यासाठी मानवनिर्मीात देवाची पुजा किंवा अंधश्रद्‌धेत गुरफटण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. कुठलाही धर्म असो वा संप्रदाय हेच तत्व नेहमी सांगतो आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. म्हणून अनेक संकटातून ताठ उभा राहणारा समाजपुरूष निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. थोडक्‍यात काय तर विज्ञान म्हणजे नास्तीकांचं अध्यात्म आणि आस्तिकांचं विज्ञान म्हणजे अध्यात्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे.
भक्‍तीचे विविध प्रकार प्रत्येक पंथात व धर्मात पहायला मिळतात. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप पाडली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते.
वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकारापर्यंची नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे फकिरी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ; ऑर्थोडॉक्‍स होता, असे म्हटल्या जाते. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथी इसमांच्या विचारांना व मतांना इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनी हाच सर्वेश्वरवाद ; पॅनथीइझम प्रस्थापित केला. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे, असं संशोधकांचं मत आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे, असे म्हणता येत नाही. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो, असे सुफी लोक मानतात व तद्‌नुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात.
सुफी मत किंवा तसव्वुफ याची व्याख्या त्याच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली आहे. हे मत मान्य असणा-यांनाही "सुफी' म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. अभिजात सुफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सुफी गुरुच्या म्हणण्यानुसार सुफी मत म्हणजे दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे, हे सांगणारे शास्त्र होय. विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सुफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सुफी त्याला "मत' समजत नाही. परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सुफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्म हा अंधश्रद्‌धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज नेहमी चमत्कारांपुढे नतमस्तक होत असल्यामुळे मुळे प्रवाह गढुळ होउन जातो. तेव्हा ख-या अर्थाने धर्म मरतो आणि मग उरते फक्‍त धर्माचे निष्प्राण कलेवर.
विजयकुमार राउत

8888876462

रविवार, 11 सितंबर 2016

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

.....

                                                                                        *विजयकुमार राउत

"मी निर्गुण, निराकार आहे...मी अनादी अन्‌ मी अनंत आहे..असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण असोत किंवा फळ झाडावरून खालीच का पडते, असं विचारणारा न्युटन असो, जेव्हा तत्कालीन समाजाच्या डोक्‍याचा भूगा पाडून विचारांचा जळजळीत निखारा डोक्‍यात पेरून जातात तेव्हा ती माणसं हमखास विद्रोहीच ठरविली जातात. त्यांचे विचार काही लोकांसाठी उपहासात्मक जरी ठरले तरी त्या विचारांची नाड मात्र या मातीतून कदापी उखळून फेकता येणार नाही, हेच खरे. म्हणून ओशो रजनिशांना बुद्‌धाप्रमाणे जेवढे नाकारले जाते, तेवढेच समाजात स्वीकारलेही जाते, हेही सत्य आहे.
ओशो रजनिश एक विद्रोही व्यक्‍तीमत्व म्हणून 11 डिसेंबर 1931 रोजी जन्माला आले खरे.. परंतु त्यांच्या विचारांच्या शलाका शेकडो वर्षे भविष्यात प्रकाशमान होताना दिसतात. ओशो विश्‍वाच्या क्षितीजावर अलौकिक दिव्यत्वाने तेजाळून उठतात. फक्‍त व्यवहाराच्या चौकटीत फिट बसलेली भाषा समाजाच्या डिएनएत सुप्त वास करीत असते. तेव्हा मात्र अख्या पिढीची बौद्‌धीक आणि एकंदरीत शरिर रचनाच क्‍लिष्ट झालेली असते. यातील विरोधाभास असा की ती सर्वसामान्यांना कळणारी भाषाही कालांतरणाने लोकमान्य झाली तरी त्यातील अर्थ मात्र मेलेलाच असतो. मग आपण निष्प्राण झालेलं कलेवर खांदयावर घेउन वावरत असतो. म्हणून वारंवार बुद्‌ध, कबीर, ज्ञानेश्‍वरासारखे संत येउन माणसाच्या जगण्यातील गर्भितार्थ उलगडून जातात.
ओशोंनी केलेली वक्‍तव्ये मात्र एका नव्या वादास जन्म देणारी ठरली नाही, तरच नवल! "संभोगातून समाधी' असो किंवा त्यांच्या गुढ व्यक्‍तीमत्वाचा एकूण भाग असो. कृष्ण जसा पूर्ण पुरूष असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती लागत नाही तसेच ओशोचं व्यक्‍तीमत्वही पा-यासारखं हातून निसटून जातं. हेच असामान्य माणसाचं जीवन असतं. मग व्यक्‍तीमत्वातली गुढता येते कुठून? याचा विचार केला तर जीवन सरळ असते,..समजणा-याच्या मनातील आणि एकूण त्याच्या जगण्यातला गोंधळच मग व्यक्‍तीमत्वाची गुंतागुंत करून ठेवते. मेंदूतील न्यूरॉन्सच्या निर्मीतीतील प्रक्रियाच क्‍लिष्ट करून ठेवल्यामुळेच आपणंही "मल्टी डायमेंशनल' न होता "मल्टी सायकीक' झालेले असतो. मग अशा वेळी ओशोंसारख्यांच्या वक्‍तव्यात विरोधाभास शोधून त्यांच्यावर टिका होते. म्हणूनच महापुरूषांचे विचार तत्कालीन समाजव्यवस्थेला पचनी पडत नाही. महापुरूषांच्या हयातीत ते रूजताना पाहण्याची संधी त्यांना मिळत नसते. ओशो रजनिशांच्या बाबतीत नेमके तेच झाले.
खरं म्हणजे ओशो रजनिश मनाच्या कुठल्याशा कप्प्यातून मुक्‍त श्‍वासासोबत आपल्या अंतरंगात प्रवेश करतात. हळूच ऑक्‍सीजनसारखे रक्‍तातून मेंदूपर्यंतचा मार्ग शोधत जातात. नसानसात शितलता पेरून गार हवेसारखे संपूर्ण अंतरंगात झिरपणे हा त्यांचा स्वभाव असतो. हळूहळू मग मनाचा प्रदेश काबिज करून डोक्‍यातील मेंदूच्या प्रदेशावरही कब्जा मिळवितात. त्यांच्या बुद्‌धीची तेजस्विता अनेक वाद उकरून मेंदूतील कारस्थान झिडकारून लावते. जुनाट परंपरा नाकारून नवीन सृजनात्मकतेशी धागे जोडून देते. नास्तीक आणि आस्तिकेची मूळं अलगद खोदून काढते. ओशो एकंदर अस्तित्वाशी एकरूप होण्याचं वारंवार निमंत्रण देतात. बुद्‌धाप्रमाणे स्वयंदीप होण्याचा कानमंत्र देउन जातात. त्याबद्‌दल त्यांना जगाचे आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागतात. कुठल्या धर्माचं अनुयायीत्व न स्वीकारता कट्‌टरता सोडून स्वतःचा धर्म जागृत करण्यास सांगतात.
प्रज्ञेचं सळसळतं तेज घेउन ओशो नावाचं रसायन ब्रम्हांडातील अचेतन मनाच्या कृष्णविवरात अनेक दडलेल्या गुपितांचे एकेक पापुद्रे उलगडत जातं. असंख्य युगांपासून अस्तित्वाची ताटातूट झालेल्या अज्ञात विश्‍वाशी मग आपला परिचय व्हायला लागतो. आपल्याशी स्वतःला मिळवून देण्याचे अभिवचन देउन ते स्वतंत्र दृष्टी प्रदान करतात. तेव्हा गुरूजीएफप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा आपला अख्खा "गेस्टॉलच चेंज' झालेला असतो. दूर खोलवर पसरणारी मुळं आपल्या अपरिचित व्यत्मित्वातील दिव्यत्व शोधण्याकरीता स्वतःच स्वतःचं खोदकाम करतात. म्हणूनच जगाच्या पाठीवर त्यांना प्रवेश नाकारला जातो. शब्दात कितीही सांगीतले तरी त्याचा परिणाम होणारच नाही, हे जेव्हा कळायला लागते तेव्हा बुद्‌धाप्रमाणे ते सावधगीरी बाळगतात. जगातील महान पुरूषांनी वापरलेली मौनाची ताकद सर्वश्रेष्ठ असल्याचं मान्य करतात. कालांतराने ओशो निःशब्द होउन मौनात शिरतात ते यासाठी. त्यातून समाधीतील शून्यत्वाला अस्तित्वाशी एकरूप, एकसंध करून निराकारापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा करतात. " आय नो .. आय डोन्ट नो' असं म्हणणारा सॉक्रेटीस किंवा "जो जानता है वो बोलता नही.. और जो बोलता है वो जानता नही' हे सत्य सांगणारा चिनचा लोओत्सु ओशोच्या तत्वज्ञानातून थेट मूकसंवाद साधताना दिसतो.
जगाच्या व्यासपिठावर ओशो रजनिश एक अलौंकिक व्यक्‍तीमत्व असल्याचं आपल्याला थोडं उशीराच कळायला लागतं. त्यांच्या गूढवादी व्यक्‍तिमत्त्वाशी परिचय होण्यासाठी आपण त्यांना अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसंतसे ओशो क्षितीाजाच्या पलिकडे घेउन जाण्याचा स्पष्ट इशारा करतात. दृष्य आणि द्रष्टा यांच्याशी असलेलं तादात्म्य संपल्यावर एका अमर्याद अशा निराकाराशी तदृप होण्याच्या आनंदात ते शुन्यत्वाचं दर्शन घडवितात.
शब्दांची साथ सोडून शब्दांच्या पलिकडे पाहण्याचा वारंवार संकेत देतात. तरी हा संकेत कळण्याइतकी माणसं उत्क्रांतीतही एका अर्थानं उत्क्रांत झालेली नसतात. मग जगातल्या एकंदर कलांचा जन्म ज्या तत्वातून झाला त्या तत्वाची जडणघडण समजायला लागते. यासाठी ओशो कविता आणि शायरीचा आधार घेतात.

"संभोग से समाधी तक' या पुस्तकावर होणारे वाद-विवाद, समज गैरसमज किंवा आरोप-प्रत्यारोप हा पारंपरिक बुद्‌धीचे कारस्थानच असल्याचे सिद्‌ध होते. फ्राईड असो वात्सायन.. किंवा मायथॉलॉजीत संभोग हा विषय उपेक्षित म्हणूनच त्याचे विकृतीकरण केले जाते. "संभोगातून समाधी'पर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी पुस्तक न वाचता त्यांना दुषणं देणं अशा मेंदूचं काम असतं. हयात असतानाही आणि नसतानाही ओशो नावाचं गारूड जगातील असंख्य चाहत्यांच्या डोक्‍यातून काही केल्या उतरत नाही. बुद्‌ध, कृष्ण, महाविर, सुफी संत मंसूर , लाओत्से, कबिर ,मीरा, कन्फयूशिएस, गुरूजीएफ, खलील जिब्रान अशी कितीतरी नावं सांगावीत, त्या सर्वांशी रजनिश नाते सांगत जातात. ओशो समजने तर खुप दूरचे पण साधे वाचनेही पचनी पडत नाही. परमात्मा कही खोजने की चिज नही है . परमात्मा तो जानणे की चिज है' असं सांगत असताना आपल्यातील परम्यात्म्याशी जवळीक साधण्याचं बळ देउन जातात. म्हणून त्यांच्या समाधीवरील या ओळी आजही जिवंत वाटतात..
ओशो नेव्हर बॉर्न..नेव्हर डेथ्ड
ओनली व्हीजीटेड ऑन अर्थ प्लॅनेट !!
VRAUT90@YAOO.COM

सोमवार, 29 अगस्त 2016

ससा, कासव पुन्हा नव्याने

विजयकुमार राउत


ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहान असताना कित्येक वेळा ऐकलेली आहे. त्यात नवीन असे काहीच राहिलेंले नाही. अगदी कथेचा चौथा पडेपर्यंत आपण चर्वितचर्वण केलेले आहे. अतिआत्मविश्‍वास बाळगाल तर तुमची सदैव हारच होईल, हा बोध घेण्यापलिकडे आपण त्या कथेच्या वाटेला गेलेलो नसतो. रूपकं आणि प्रतिकं वापरून दिलेला संदेश नेमका आपल्यापर्यंत पोहचावा हा त्या कथेमागचा उद्‌देश असतो. तो किती पोहचतो, हेन बोललेले बरे. परंतु समाजात नेमके तसे होताना दिसत नाही. ससा हा भित्रा आणि वेगाने पळणारा प्राणी आहे, हे आपल्याला माहित आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात ससाच्या चालीने चालणारे आपण अधिक वेगवान कसे होउ याचाच प्रत्यक्ष आपल्याला ध्यास लागलेला असतो. म्हणून आपल्या जगण्यातला वेग दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टीत घाई करणे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वेगातून शरिराकडे दुर्लक्ष आणि असंख्य ताणतनाव व बेसुमार आजारांना सोबतीला घेउन आपण पुढच्या काळात कुढत कुढत जग असतो. ससा हा वेगवान आयुष्याचे प्रतिक आहे. आजच्या काळात तोही कदाचित मागे पडेल, असे आपले एकंदरीत जीवनमान झाले आहे.
फार वर्षापूर्वी वेगवान सशाची व मंद गतीने चालणा-या कासवाची शर्यत लागते. अन्‌ स्वभावाप्रमाणे ससा हरतो. सशाला वाटते आपण निश्‍तिच जिंकणार अशा भ्रमात तो विसावा घेता आणि कासव त्याच्या पुढे जाउन जिंकतो. परंतु यातील मर्म असे की ससा जसा वेगवान आहे तसेच त्याला आयुष्यही लाभलेले असते. बहुतांश त्याचे वय कासवाच्या तुलनेत खूप खूप कमी. ससा बहुतेक हा सुमारे 15 ते 20 वर्षच या पृथ्वीतलावर जगतो. तर कासवाचे आयुष्य चारपाचशेच्या घरात असते. या चारपाचशे वर्षाच्या काळात त्याच्या जीवनाचे घडयाळही अती मंद असते. कासवासाठी काळ मंद तर सशासाठी तो वेगवान. सशाच्या जीवनाचे घडयाळ अतिशय वेगाने धावणारे असते. त्यावरून ससाच्या ह्रदयाचे ठोके फारच गतीमान तर कासवाच्या ह्रदयाची धकधक फारच मंद. ह्रदयाच्या या गतीबरोबर त्याच्या जीवनाचा सर्व संकल्प, स्वप्न, आशा-आकांक्षांचा कालावधी ठरलेला असतो. या जगात एक दिवस जगणारे जीवही आपल्या संपूर्ण आयुष्याचे वतुर्ळ पूर्ण करूनच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू असे हे वर्तुळ ठरलेले असते. हे वर्तुळ निसर्गाच्या नियमाप्रमाणे फिरत असते. परंतु त्याचा फिरण्याचा काळ आणि वेग मात्र निसर्गाने निश्‍चित केलेला असतो. प्रत्येक जिवाचे घडयाळ वेगवेगळे असते. चिमूरडया मुंग्याही आपले आयुष्य वर्तुळ पूर्ण करून जगत असतात. माणसाला कदाचित सुमारे 80 वर्षाचे आयुष्य वाटयाला येते. यात सर्व टप्पे ओलांडायचे असतात. कासवाला लाभणारे आयुष्य माणसाच्या तुलनेत फार लांब असते. तर सशाचे त्याहूनही अल्प. अल्पशा कालावधीत संपूर्ण आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरिराची एकंदर रचनाच निसर्गाने करून ठेवलेली असते. कासवासाठी मात्र आयुष्याचा पल्ला लांब असतो. त्याला ससाच्या तुलनेत फार दीर्घकाळात प्रवास पूर्ण करायचा असतो. या कथेपासून माणसाने खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्या जीवनातील काळही आता वेगवान झाल्याचे दिसून येते. ताळतंत्र सोडून सगळया गोष्टी कमी श्रमात , कमी वेळात मिळविण्याकडे आपला कल असतो. प्रत्येक पिढीत यश हस्तगत करण्याचा वेग वाढला आहे. त्यातून माणसाच्या वाटयाला काय येत आहे? तर भविष्याची चिंता, त्यातून येणारी अस्वस्थता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळत आपल्या हाती येतो शार्टकटचा मार्ग. आपल्या आजूबाजूची गतीमान होत जाणारी धावपळ आणि त्यातून आलेली अस्वस्थता याकडे आपण कधी डोळेभरून पाहतो का?
विजयकुमार राउत

गुरुवार, 31 मार्च 2016

निसर्ग, कविता आणि आपण !!


                                                                              * विजयकुमार राऊत

वितेतील लय गमाविणे म्हणजे आपल्या शुद्‌ध मनाचे तंत्र बिघडून बसणे. आपण जन्मतो तेव्हा हे तंत्र घेउनच जन्माला येतो. परंतु जसजसं आपण मोठे होत जातो.. तसे तसे मनाने खोटेही होत जातो आणि छोटेही. हळूहळू बाहेरचा गोंगाट कानात वाढत जातो. आपण आपली लयबद्‌धता हरवून बसतो. एक वेळ अशी येते की आपण स्वतःला निसर्गाच्या एकंदर व्यवहारापासून खुप दूर नेउन ठेवतो. मग कालांतराने पुन्हा सर्वसामान्य माणूस शेवटी हतबल झाल्यावर हरविलेल्याचा शोध घेण्याच्या फंदात पडून "हे' ना "ते' बरे म्हणत निसर्गाचा शोध घेण्यासाठी सहलीला जातो, देव दर्शनासाठी शेकडो किलोमिटरची यात्रा करीत तिर्थस्थळांना भेटी देतो. हे सगळे उपद्‌व्याप केले तरी त्याच्या मनाला शांती मिळत नाही. हो, फक्‍त तो इतरांना दाखविण्यासाठी शांत असल्याचं पदोपदी नाटक करीत असतो. जीवन जगण्यात व्यस्त असताना तेव्हा खूप खूप भानगडी करीत असतो. त्याला तेव्हा जीवनातील काव्याचा शोध घेण्याचं अजिबात भान नसतं. कविता म्हणजे फालतू उद्योग म्हणून तो हेटाळणी करतो. मग जीवनाच्या शक्‍तीहिन टप्प्यावर त्याला "कविते'चा किंवा अन्य कलांचा शोध लागतो. कुणी सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य कसं जाईल, याचा विचार करीत या धंदयाला जवळ करतात. त्यातील अनेक जण "रसिक' होण्याच्याच खर्चिक भानगडीत पडत नाही. कारण ते फार परिश्रमाचे असते. काही चांगल्या कविता, चांगले कवी न वाचता.. "डायरेक्‍ट' कवी होण्याची सोय असल्यामुळे कविंचं अमाप पिक समाजात वाढीला लागले आहे. मग त्यांना शब्दांची हगवण लागण्याचाच धोका अधिक असतो. या देशात एक चांगलं आहे की कवडीचं वाचन, मनन न करताही विद्‌वान होता येतं. कवितेची घसरण करण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्यामुळे वर्तमानपत्रातूनही कविता आता आपली जागा गमावून बसली आहे.
कविवर्य सुरेश भटांना "मेंदीच्या पानावर'....सारख्या अनेक कविता पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली, हे सत्य आहे. "उचलला पेन की लावला कागदाला..' आणि मग तेच रसिक या तथाकथित कविंना "सुंदर, अप्रतिम' म्हणत त्याला बिघडविण्याचा जिवघेणा खेळ खेळतात. दोघेही एकमेकांशी ठोकून देण्याचा धंदा करतात. ते कवी महाशयांच्या लक्षात येत नाही. कविता वर्तमानपत्रात छापून येण्याची लायकी नसलेलेही मग गल्लीतले एका रात्रीतून महाकवि होतात. त्यासाठी धन्यवाद "फेसबुक' आणि त्याच्या सोशल भावंडांचा.
कविता ही साधना आहे. ती तपश्‍चःर्या आहे. ती फुलत, बहरत जाण्याची अखंड प्रक्रिया आहे. तिला खूप वेळ द्यावा लागतो. त्यात संयम, समतोल, जगण्यावरचा विश्‍वास आणि सगळयात महत्वाचं की आतली लय ऐकण्याची सवय महत्वाची आहे. एक उर्दू कवि म्हणतो की....
गझल मे बंदीशे, अल्फाजही नही काफी
जिगर का खूनभी चाहिऐ असर के लिये !!
तंत्र गवसले की आपण नैसर्गिक लयीशी एकरूप होतो...निसर्गाला बनवेगीरी चालत नाही. म्हणून केशवसुत कवितेला आकाशातील विजेची उपमा देतात. लय सापडणे म्हणजे आपण आपल्याला गवसणे... बाकी कितीही लिहिले तरी त्यात काव्य नसून ती कवितेची केवळ टरफले असतात. ते असतात फक्‍त "ट' ला "ट' जोडण्याचे फालतू उद्योग ! "टाईमपास' म्हणून उचललेली लेखणी अखेर जीवनाला अर्थहिन बनविते. एकंदर आपल्या अस्तित्वाची तहान लागणे आणि त्याचा सतत ध्यास घेणे म्हणजे जीवनातील कविता शोधणे होय.......!!

                                                                                             * विजयकुमार राऊत


सोमवार, 1 फ़रवरी 2016

जग जिंकण्याऐवजी स्वतःलाच जिंका !

* विजयकुमार राऊत

जगात ज्या गोष्टी दिसतात, त्या एक दिवस संपणारच असतात. कारण त्या कालौघात नष्ट होण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. कुठलीही गोष्ट नित्य नसतेच. जगातील सगळया गोष्टी अनित्य असल्याचे भगवान बुद्‌धांनीही म्हटले होते. भौतिक यशाचेही तसेच असते. आपल्या यशाचे गणितच मोठे विचित्र असते. आपण मिळविलेले यश चुकीच्या समजूतींवर आधारित असल्यामुळे अपयशानंतर यश, पुन्हा यशानंतर अपयश अशा वर्तुळात आपल्या जीवनाचे मार्गक्रमण होत असते. स्पर्धेतून आलेले यशच प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. कारण ते मोठया कष्टानं मिळालेले असते. ते मिळविण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा कस पणाला लावलेला असतो. इतरांशी संघर्ष करीत आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले असतो. साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून विजयश्री आपल्या पायाशी लोळण घालत असते. आज तर स्पर्धा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मित्रांनो, दुस-याच्या पराभवाच्या इमारतीवर जर तुमचं यश उभं राहात असेल तर असं यश तुम्हाला आवडेल का? अनेकांच्या शारिरीक, मानसिक, भावनीक कत्तली करून मिळालेले यश मला आनंद देत असेल तर त्या यशाला काय म्हणावं? हे क्षणिक समाधान मला कायम पुरणार आहे का?

जगाच्या व्यवहारात आपण केलेली स्पर्धा स्वतःशी निकोप नसते. आपण कळत न कळत दुस-याशीच स्पर्धा करीत असतो. परंतु मित्रांनो, दुस-याशी तुलना करून स्वतःला कमी अधिक जोखू नये. ख-या अर्थानं त्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं मी माझया दुःखास कारणीभूत आहे, तसाच माझया अपयशास दुसरा कोणी जवाबदार राहू शकतो का? परंतु आपणं सगळंच अगदी विरूद्‌ध दिशेने जगत असतो. आपलं यश हे दुस-याचा पराभव करण्यावर अवलंबून असतं. म्हणून ते टिकाउ नसतं. पूर्ण काळ सुख देणारं नसतं. दुस-याला कुठल्याही स्थितीत पराभूत करून स्वतःच्या विजयाचा झेंडा मिरविणे यालाच आपण यश म्हणतो. हे यश दिखावू असतं. इतरांनी माझं वर्चस्व कबुल करावं यासाठी या यशाचा उपयोग करता येतो. या विजयाला मिरविण्यासाठी आपल्याला इतरांचं प्रमाणपत्र लागतं. दुस-याचा पराभव करणे म्हणजे एक प्रकारची मानसिक हिंसाच असते, हे सांगतं ते अध्यात्म. जगज्जेता सिकंदर, हिटलर किंवा सम्राट अशोकाचे काय झाले? यांनी तर अमाप यश संपादीत केले होतं ना ! परंतु शेवटच्या क्षणी अख्खं विश्‍व जिंकूनही ते पराभूत का झाले? कारण त्यांच्या यशापयशाच्या संकल्पनाच मुळात नैसगिक नव्हत्या. त्या एकंदर मानवतेच्या विरोधात होत्या.

चिनी तत्वज्ञ लाओत्सेला कुणीतरी विचारलं की, आपण नेहमीच म्हणता की कोणीच मला हरवू शकत नाही. ते कसं काय? यावर लाओत्सने उत्तर दिलं की मला कुणीच शेवटपर्यंत हरवूच शकत नाही. कारण मी कुणाशीच स्पर्धा करत नाही. मी अशा ठिकणी बसतो की जेथून मला कोणी उठ म्हणत नाही. त्यामुळे कुणालाच अडचण होत नाही आणि मी माझया जागेवर कायम असतो.

आपण अध्यात्माला धार्मिकतेच्या जोखडात बंद केलं असल्यामुळे चुकीच्या संकल्पना तयार होत गेल्या. या जगात अध्यात्म हे माझयासाठी नाहीच, असं ठाम मत बनतं. भगव्‌तगीता, महाभारत किंवा ज्ञानेश्‍वरी, वेद-उपनिषद आदी ग्रंथ हे केवळ पुजेसाठी नसतात. त्या ग्रंथातून जगण्यातील सर्व तत्वज्ञान मांडलेलं असतं. मानवतेचं दिशादिग्दर्शन त्यात मिळतं. परंतु आपण प्रतिकांत अडखळतो. म्हणून तर आपण सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. "आय विल चेंज, डे बाय डे' असं म्हणत कालच्यापेक्षा आज मी किती उत्तम झालो, हे सांगायला दुस-याची गरज नसते. तिथे आपणच न्यायालय असतो आणि आपणच आरोपी. आज मिळालेल्या भौतिक यशाच्या मिरवणूकीचा बाज जर लोकांच्या नजरेत भरणारा असला तरी हा बाज आपला माज उतरवून केव्हा बर्बाद करेल हे सांगता येत नाही. कारण सृष्टीचा नियमच परिवर्तनाचा असतो. आज आहे ते उद्या नाही. जीवन एका वर्तुळाकार गतीने चालत असते. कधी पाण्यावर नाव तर कधी नावेत पाणी, असं वर्तुळ नको असेल तर स्पर्धेची दिशा बदलायला हवी. स्पर्धा बहिर्गम असली तर ती एक दिवस अपयशात परिवर्तीत होणारच. इतरांच्या नजरेत भरणारं यश हे एक दिवस संपणारच.. मग सदासर्वकाळ तुम्हाला यश हवं असेल तर अंतर्मुख होउन स्वतःशी स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. मग मनावर विजय मिळविणा-या यशस्वी माणसाचे यश कधी कुणाला दिसणारं नसतं. कारण ते पाहण्याइतकी सर्वांची दृष्टी परिपक्‍व झालेली नसते...त्या यशाला कधीच मरणही येत नाही.

                                       * विजयकुमार राऊत


शनिवार, 23 जनवरी 2016

भाऊ, अजून कविता सरली नाही....

                                                              * विजयकुमार राउत


सायंकाळी कळले मजला, वहीत पाने उरली नाही
किती जणांनी लिहिली कविता, अजून कविता सरली नाही !!

भाऊंचे जाणे मनातील आसमंतात काळाभोर अंधार पेरून गेले. कोण जाणे ! काही माणसं अशीच असतात आपल्या अवतीभवतीच्या अस्तित्वाला सुन्न करून जाणारी. वातावरणात निःशब्दता पसरून पलिकडच्या प्रवासाला निघणारी. भाऊंचे जाणेही भली मोठी पोकळी निर्माण करून गेले. कवितेतील त्यांची "भाईगिरी' थेट व्यवस्थेलाच हलाल करून जाणारी, तर कवितेतला "भाऊ' मात्र संपर्कातील माणसांना बंधुत्वाचा साक्षात्कार घडविणारा. अबे, नालायक, हरामखोर, मुर्ख आणि अशा कितीतरी शिव्या त्यांच्यावर प्रेम करणा-या माणसांना ऐकणेच भाग पडायचे. नंतर मात्र भाउंच्या वागण्यातून समोरच्या व्यक्‍तींबद्‌दलचा त्यांच्या मनातील प्रेमाचा झरा नुसताच कोसळत राहाण्याचा अनुभव माझयासारख्या नवख्या माणसांना अनेकदा आला. कविवर्य सुरेश भटांशी त्यांची "केमिस्ट्री' तंतोतंत जुळताना मी पाहिली. पृथ्वीवरच्याच अज्ञात बेटासारखी ही माणसं कुणाला कळतच नाहीत. भाउंचे जाणेही असेच न कळणारे....
व्यवस्थेच्या छाताडावर बेधडक चढून क्रांतीचे गीत गाणारा "जिंदादिल' भाउ खरा माणूस, खरा गझलकार आणि खरा मित्र. आंबेडकरी कवितेच्या पानांवर त्याने निळया अक्षरात नेहमीसाठी आपली स्वाक्षरी कोरून ठेवली. सुप्रसिद्‌ध गझलकार नीलकांत ढोले यांच्याकडे आल्यानंतर भाउ सगळयांच्या मनावर बेमोसमी पावसासारखा धो-धो बरसायचे. कुटूंबातील सगळयांवर त्यांचा लडा. थेट स्वयंपाकघरातही त्याच्या पावलांची दणदण ऐकूण कविवर्य ढोलेंचं अख्खं घर गझलमय झालेले मी पाहिलं. जगण्यातील तत्वज्ञान ते बेमुर्वतपणे मांडायचे. भाउंच्या वागण्यांतून बुद्‌धाचे सौंदर्यशास्त्र स्पष्ट झळकायचे, तर बोलण्यातून आंबेडकरी क्रांतीच्या धगधगत्या ज्वाला. कविता आणि जगणं त्याच्यापासून वेगळे नव्हतेच कधी. म्हणून लिखाणातून व्यक्‍त होताना हातचं काही लपविले नाही. कुणाचीही भिडमुर्वत केली नाही. ते लिहिता लिहिता शब्दांत जगत गेले. आंबेडकरी साहित्यात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले असले तरी ते माणसांच्या दुनियेतला "धृवतारा'च होते.
या गावातील बेमानांना, किती उशीरा कळले होते !
आम्ही जळलो तेव्हा कोठे, त्यांचे गाव उजडले होते !

फक्‍कडपणे बोलणा-या भाउंच्या शब्दांत एखाद क्षणी मला "दर्द' दिसायचा. भाउंच्या जगण्यातील बेफिकीर वृत्ती बोलण्यातून झळकायची. स्वभावातील दोन्ही पैलू टोकाचेच...एक प्रेमाचा तर दुसरा ताडामाडासारखा कठोर. "विजू, याले समजाउन सांग ... तुहया पोराचं नाव दिक्षांत कशाला ठेवतोस? दुसरं काही शोध...' असाच काहीसा सल्ला देउन जाणारा...आणि ह्रदयनाथ मंगेशकरांनी "उषःकाल होता होता' भटांच्या या गीताला लावलेली चाल आवडली नसल्याचं मित्रांमध्ये स्पष्ट बोलणारा.. " निलू, आता घरी गेलं पाहिजे यार...' असं म्हणत एखादया नटखट बालकासारखं कविवर्य ढोलेंच्या गालाचे चुंबन घेउन स्कुटरला "किक' मारून निघून जाणारा आमचा लाडका "भाई' आता पुन्हा कधीच दिसणार नाही.

                                                                                               * विजयकुमार राउत

8888876462

बुधवार, 6 जनवरी 2016

काळोखात उजेड पेरणा-यां माणसांची गोष्ट


                                                                                            विजयकुमार राउत

थॉमस अल्वा एडिसन ही असामान्य बुद्‌धीमत्तेची व्यक्‍ती. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावून काळोखात उजेड पेरण्याचे काम केले. एके ठिकाणी त्याच्या बालपणातील एक छोटीसी गोष्ट वाचनात आली. एडीसन लहान असताना त्याला दररोज शाळेत त्याची आई सोडून द्यायची. एके दिवशी एडीसनला शाळेत सोडण्यास ती गेली असता शाळेचे मुख्याध्यापक प्रवेशद्वाराकडे तरातरा चालत आले आणि तिच्या हातात एक चिठ्‌ठी दिली. आईने घरी जाउन ती वाचली आणि ओक्‍साबोक्‍सी रडायला लागली. लहानग्या एडिसनला काय झाले ते कळेना. सगळं काही कळण्याइतकं त्यां वयही नव्हतं. त्याने आईजवळ जाउन चौकशी केली. आईने त्याला जवळ घेउन चिठ्‌ठी वाचायला दिली. चिठ्‌ठीवर लिहिले होते, तुमचा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा आहे. त्याला आमची शाळा पाहिजे त्या सोयीसुविधा पुरवू शकत नाही. आमची शाळा त्याच्या योग्यतेची नाही. त्याला दुसरीकडे न्या' एडिसनला मात्र आईच्या रडण्याचा अर्थ कळला नाही. त्याने खोदून खोदून आईला रडण्याचे कारण विचारले. आई म्हणाली, माझा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा असल्याचे प्रमाणपत्र खुद्‌द शाळेने दिल्यामुळे माझया डोळयात आनंदाश्रृ आलेत.
काही वर्षानंतर एडीसन खूप मोठा होतो. विजेच्या दिव्याचा शोध लावल्यामुळे त्याचे नाव सगळीकडे झाले होते. मानसम्मान त्याच्या पायाशी लोळण घेतात. आईचे मात्र देहावसान झालेले असते. त्याला घडविणा-या आईची त्याला आज खूप उणिव जाणवू लागते.
एका सायंकाळच्या निवांत क्षणी तो आईचे कपाट उघडून तिच्या एकेक वस्तू न्याहाळतो. आईच्या एकेक स्मृती जागवू लागतो. एका डब्यात त्याला एक चिठ्‌ठी ठेवलेली दिसते. एडिसन कुतूहलाने ती चिठ्‌ठी उघडून वाचू लागतो. त्यात लिहिलेला मजकूर असतो... "तुमचा मुलगा फार मठ्‌ठ आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सरासरीइतकीही त्याची बुद्‌धीमत्ता नाही. त्यामुळे त्याला उद्यापासून या शाळेत पाठवायचं नाही ' एडिसनला त्याच्या बालपणची ती आठवण होते. शाळेतून परत येताना आई हंबरून रडल्याचं आठवतं. त्याला आता हळूहळू सगळं कळायला लागतं. एका सर्वसामान्य बुद्‌धीमत्तेच्या मुलासाठी आयुष्यात खचके खाउन तिने आपल्याला घडविल्याचा आईबद्‌दलचा सार्थ अभिमान जागृत होतो आईने लहानपणी दाखवलेली चिठ्‌ठी खरी नसते हेही त्याला कळते.. आज सापडलेली चिठ्‌ठी मात्र खरी आहे, हे समजल्यानंतर त्याच्या डोळयांतून आईविषयीचे अश्रृं गालावरून ओघळतात.
काळोखात उजेड पेरणा-यांच्या थोर माणसांच्या जीवनातील ही गोष्ट आहे. माणसांचं मुल्यमापन करणारे शेवटी कोण असतात? कधी कधी पारंपरिक मापांत कुठलं व्यक्‍तीमत्व मोजणे शक्‍य आहे का? रविंद्रनाथ टागोरांनी "शांतीनिकेतन' सुरू केलं. तिथे निसर्गाच्या खुल्या शाळेत विद्यार्थी ज्ञानार्जन करायला जात. एकदा शाळेची तपासणी करायला कुणीतरी आले. त्यावेळी वर्गातील सगळी मुले अभ्यास करण्यात मग्न होती. मात्र वर्गापासून काही अंतरावर दोन विद्यार्थी मातीत खेळताना पाहून मान्यवरांनी रविंद्रनाथांना विचारले. सगळी मुलं अभ्यास करत असताना ही मुले खेळतात , त्यांना तुम्ही शिस्तीने अभ्यास करायला का लावत नाही? त्यावर रविंद्रनाथ म्हणाले, खरंतर अभ्यास करणा-या मुलांचीच मला जास्त काळजी वाटते. त्या मातीत खेळणा-या मुलांचा मात्र मला अभिमान वाटतो. कारण ते निसर्गाच्या शाळेत शिकत आहेत. त्यांचं इमान मातीशी असल्यामुळे या मातीतूनच जीवनाचा मार्ग शोधतील. डॉ.अब्दुल कलाम म्हणायचे की या देशात प्रतिभा शोधायची असेल तर शेवटच्या बाकावरून सुरवात करावी लागेल. अमीर खान यांचा "तारे जमीपर' किंवा "थ्री इडिएट्‌स' हे सिनेमे पाहिले तर त्यातही त्याने हेच सुत्र मांडलें आहे. जी माणसं जीवनात खूप मोठी झालेली आपण पाहतो ती जगापेक्षा असामान्य बुद्‌धीमत्तेचीच होती. फक्‍त मोजणा-यांची मापे पारंपरिक होती. ही माणसं आगळयावेगळया उंचीने उठून दिसतात. जीवनात उजेड पेरणा-या माणसांना सलाम...!!

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

माणसाचा शोध


                                                                          विजयकुमार राउत
"माणूस द्या मज माणूस द्या'! हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ब्रिद... ग्रीसमधील डायग्नोसिस हा मोठा तत्ववेत्ता. अंगावर एक कापडही न घालता चोविस तास डोक्‍याजवळ कंदील घेउन झोपत असे. दिवसा त्याच्याजवळ कंदील पेटलेला पाहून अनेकांनी त्याला वेडयात काढलं होतं. कुणी विचारल तर तो सांगायचा की कधीपासून मी माणसाचा शोधच घेत आहे. परंतु मला अद्याप माणूसच मिळाला नाही. माणसाला शोधण्यास दिवसाचा उजेड कमी पडू नये म्हणून तो कदाचित कंदील बाळगत असावा.
झांजस हा इसापचा मालक. गुलामांच्या बाजारातून त्याने इसापला खरेदी केलं होतं. अतिशय कृशाग्र बुद्‌धीच्या इसापच्या प्रतिभेची झलक अनेक कथांमधून दिसून येते. एकदा झांजसला विहिरीवर उघडयावर स्नान करण्याची हुबक येते. त्यांने इसापला विहिरीवर माणसे किती आहे हे, पाहून यायला सांगीतलं. इसाप जेव्हा विहिरीवर गेला तेव्हा त्याला विहीरीवर अंघोळ करणा-यांची खूप गर्दी दिसली. तो दूर जाउन एके ठिकाणी उभा राहिला. अंघोळीला येत असलेला प्रत्येक जण रस्त्यात असलेल्या दगडाला ठेच लागून जात होता. विहिरीवर झालेली गर्दी पाहून तहानेने व्याकुळ झालेला एक भिकारी कितीतरी क्षणांपासून उभा होता. इतक्‍यात एक व्यक्‍ती घाईघाईने विहिरीवर अंघोळ करायला आली. त्याला दगडाची ठेच लागताच त्याने मार्गातील दगड हाताने उपटून दुरवर फेकून दिला. मग त्या भिका-याकडे वळला. बादलीने विहिरीतील पाणी काढून त्याने तहानलेल्या भिका-याला पाजले. इसाप घरी गेला. विहिरीवर गर्दी आहे का? किती माणसं आहेत? झांजसचा प्रश्‍न. लगेच इसापने उत्तर दिले की विहिरीवर केवळ एकच माणूस आहे. झांजस खूश झाला. अंघोळ करायला अडचणी नाह म्हणून तो लगबगीने विहिरीकडे निघाला. पाहातो तो काय विहिरीवर गर्दीच गर्दी होती. इसाप खोटा बोलला असं समजून झांजस फार चिडला. इसापला त्याने बेदम झोडून काढले. मारणे झाल्यावर त्याने इसापला विचारले. तू खोटं का बोललास? इसाप म्हणाला आपण मला किती माणसं आहेत, हे पाहून यायला सांगीतलं होतं. परंतु मला त्या गर्दीत केवळ एकच माणूस दिसला. त्याने त्याच्याठिकाणी माणूसकी होती म्हणून मार्गातला दगड उपटून फेकला. इतर सारे स्नान करण्यात मग्न होते. त्यांना तहानेने व्याकुळ झालेला भिकारी दिसला नाही की रस्त्यातला दगड दिसला नाही. परंतु या माणसाने त्या भिका-याला विहिरीचे यथेच्छ पाणी पाजले. त्याची तहान भागविली. असं म्हणतातच झांजसला खूप दुःख झाले. माणूस म्हणून जन्माला आलो तरी माणूस म्हणून जगणेच बहुतेकांना जमत नाही. या छोटया छोटया कहाण्यांतून माणसाचा शोध सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते.


 
Blogger Templates